कोल्हापुरात पावसाचा पुन्हा जोर
सकाळ वृत्तसेवा
Thursday, July 29, 2010 AT 01:01 AM (IST)
कोल्हापूर - आज पुन्हा पावसाचा जोर वाढल्यामुळे पंचगंगेने 42 फुटांची पातळी ओलांडली. राधानगरी धरण 98 टक्के भरले असून, धरणाचे स्वयंचलित दरवाजे केव्हाही उघडण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. जोरदार पावसामुळे 63 गावांना फटका बसला असून, शहरात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. अद्यापही अनेक मार्ग पाण्याखाली असल्यामुळे जिल्ह्यातील वाहतूक विस्कळित झालेली आहे.
वारणेतून विसर्ग
वारणा धरणात 28 टीएमसी पाणीसाठा भरला असून, धरणातून वीजनिर्मितीसाठी प्रतिसेकंद 12 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यात पूरस्थितीचा धोका आहे. अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग होत नसल्याने राधानगरीचे दरवाजे उघडल्यास पंचगंगेच्या पातळीत वाढ होऊन महापुराचा धोका निर्माण होऊ शकतो.
कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरील आंबेवाडीच्या पुढे रस्त्यावर पाणी आल्यास रेडेडोह फुटतो. पंचगंगेची पातळी सध्या 42 फूट 1 इंच आहे. राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यास मध्यरात्रीनंतर केव्हाही रेडेडोह फुटण्याची शक्यता आहे.