भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांची राहुल गांधींवर टीका
नवी दिल्ली - मुलायमसिंह, लालूप्रसाद यादव यांच्यापाठोपाठ भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आता थेट कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनाच लक्ष्य केले. कलावतीच्या घरी जाऊन जेवणाऱ्या कॉंग्रेसच्या या राजकुमाराला तिच्यासारख्या गरिबांचे महागाईने चाललेले हाल दिसत नाहीत काय, अशी टीका त्यांनी केली.
राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या एका भाषणावरून गडकरी यांनी महागाईवरून त्यांच्यावर "राजकुमार'सारखी विशेषणे वापरत तोफगोळे टाकले आहेत. राहुल यांनी संसदेत हे भाषण केले, त्या वेळी गडकरी यांच्या कल्पनेतही दिल्ली नसेल, असा सूर राजधानीत उमटला. विशेषतः गडकरी यांनी महागाईवरून आताच राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यामागे उत्तर प्रदेशात वाढत जाणारा कॉंग्रेसचा प्रभाव व त्यामागे राहुल गांधी यांच्या प्रतिमेचा व परिश्रमांचा सिंहाचा वाटा हेच मुख्य कारण मानले जाते.
राहुल गांधी यांनी 2008 च्या पूर्वार्धात लोकसभेत भाषण केले होते. त्यात त्यांनी विदर्भाच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी कलावती बांदूरकर व शशिकला या दोन गरीब महिलांकडे आपण गेल्याचे सांगितले होते. त्याचा संदर्भ देत आज येथे झालेल्या कार्यक्रमात गडकरी म्हणाले, की राजकुमाराने (राहुल) कलावतीच्या घरी जेवण घेतले; पण तिच्या घरचे दारिद्य्र त्यांना दिसले नाही काय? कॉंग्रेस "गरिबी हटाव' अशी घोषणा देते. प्रत्यक्षात गरिबांनाच नेस्तनाबूत करण्याचे सरकारचे धोरण आहे. चुकीच्या आर्थिक धोरणांमुळेच महागाई जीवघेणी झाली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य मोबदला मिळत नसल्याने ते आत्महत्या करीत आहेत. देशात साठवण सुविधा नसल्याने लाखो टन धान्याच्या नासाडीची सर्वोच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. धान्याचा एक दाणाही वाया जाता कामा नये, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले. मात्र, सरकार महागाई कमी करण्याबाबतचा विषय गांभीर्याने घेत नाही.
आज राष्ट्रपतींना निवेदन
"सीबीआय'चा गैरवापर व महागाई यावरून देशभरात भाजप "जेल भरो' आंदोलन करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. गडकरी यांनी प्रदेशाध्यक्ष व वरिष्ठ पक्षनेत्यांची बैठक आज दिल्लीत बोलावली होती. महागाईने पिचलेल्या नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन भाजप उद्या (ता. 29) राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना देणार आहे. दुपारी साडेबाराला पक्षनेते लालकृष्ण अडवानी, सुषमा स्वराज व गडकरी आदी नेते विजय चौकातून पदयात्रेने राष्ट्रपती भवनात जातील व निवेदन देऊन महागाई कमी करण्यासाठी सरकारला आदेश द्यावेत, अशी विनंती राष्ट्रपतींना करतील.
Follow
Us on
Twitter