आपल्या मातीतून बाहेर पडून नव्या मातीत रुजण्याचं धाडस ज्यांनी दाखवलं, अशा मराठीजनांची ही 'आकाशभरारी'...या मातीत ते केवळ रुजलेच नाहीत; तर छान बहरले. इतरांनाही आधार बनले. मराठीची ही 'आकाशभरारी' दर गुरूवारी ई सकाळवर प्रसिद्ध होत आहे...
लहानपणापासून मला अमेरिकेचं अतिशय आकर्षण. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना इतर मित्रांप्रमाणे परंपरेला अनुसरून "जी.आर.ई.', "टोफल'चे फॉर्म भरले. माझे प्रोजेक्ट वर्क पाहून दोन विद्यापीठांमध्ये स्वीकृतीही मिळाली, पण सिंगापूरमध्ये पेपर फुटल्याचे कळल्यावर सगळेच मुसळ केरात गेले. अखेर डिसेंबर 1991 मध्ये नोकरीची संधी चालून आली आणि मी बफेलो शहरात येऊन थडकलो. पहिला पाऊस, पहिलं प्रेम अशी पहिल्याची क्रेझ काही औरच असते, त्याप्रमाणे अमेरिकेत गेली सोळा वर्षे राहत असलो, तरी या पहिल्या शहराबद्दलचं आकर्षण काही आगळंच! अजूनही बफेलोतील वास्तव्याची आठवण झाली, की मन त्यात रमून जातं. वयाच्या बाविसाव्या वर्षी अमेरिकेत आलो. भारतात नोकरीचा अनुभव जेमतेम सहा महिन्यांचा. त्यामुळे कॉर्पोरेट अमेरिकन कल्चरमध्ये चटकन समरस होऊ शकलो.

94 मध्ये लग्न झालं व डेलवेअरला बस्तान बसविलं. जगभरातील लोकांना अमेरिकेतील समृद्धी दिसत असली, तरी कॉर्पोरेट कल्चर, वर्क एन्व्हायर्नमेंट, डेडलाइन्स, डिलिव्हरेबल्स पाहिल्यावर अमेरिकेला आर्थिक महासत्ता का म्हणतात, हे ध्यानात येतं. खेळ माणसांना एकत्र आणतात, हे लक्षात घेऊन मी मात्र अमेरिकन फुटबॉल, बास्केटबॉल, आइस हॉकी, बेसबॉल या खेळांकडे लक्ष देऊ लागलो. ऑफिसच्या लीगमध्येही खेळू लागलो. त्यामुळे कोणताही गट न करता मी हळूहळू त्यांच्यातलाच एक होऊन गेलो.
मूळचा सांस्कृतिक माहेरघरचा म्हणजे पार्ल्याचा. त्यातूनही पार्ले टिळक विद्यालयाचा असल्यामुळे लहानपणापासूनच वक्तृत्व स्पर्धा, नाटकं यात भाग घेत असे. इथे आल्यावर नोकरी, घर-संसार इत्यादीमध्ये इतका गुरफटून गेलो, की या सुप्त गुणांकडे लक्ष द्यायला संधीच मिळाली नव्हती. बाकीच्या गोष्टींमध्ये स्थिरावल्यावर या सुप्त बाबी हळूहळू वर येऊ लागल्या. आपली माती, मराठी संस्कृती यांच्याशी परत नाळ जोडण्याचा प्रयत्न करू लागलो. "मायमराठी'सारखे कार्यक्रम अमेरिका, कॅनडात केलेच, शिवाय "सुयोग'च्या बॅनरखाली मुंबईतही प्रयोग केले.
पूर्वी रॉडनी डॅंगरफील्डचा "बॅक टु स्कूल' सिनेमा पाहिला होता. त्यात तो उतारवयात त्याच्या मुलाबरोबर कॉलेजमध्ये प्रवेश घेतो. मग आपण का नाही, या भावनेनं मला शिकण्याची ऊर्जा व ईर्षा दिली. माझ्या वडिलांनी एक्केचाळिसाव्या वर्षी पीएच.डी. केल्याचा आदर्शही समोर होताच. गेल्या महिन्यात युनिव्हर्सिटी ऑफ डेलवेअरमधून मी एम.बी.ए. झालोदेखील. अल्झामायर फाउंडेशन, अपंगांसाठी स्पेशल ऑलिंपिक्स यासारख्या संस्थांमध्येही आपुलकीने काम करीत राहिलो. कदाचित यामुळेच गेली चार वर्षं अमेरिकेच्या अध्यक्षांनी "प्रेसिडेंट्स व्हॉलंटिअर ऍवॉर्ड'ने सन्मानित झालो. अर्थात या साऱ्यामध्ये आई-वडिलांचे आशीर्वाद, पत्नी आश्लेषाचं सहकार्य असतं, हे नमूद करायलाच हवं.

"कोलाज'मधील प्रत्येक फोटोला स्वत:चं व्यक्तिमत्त्व असतं, त्याप्रमाणे तुमच्या इच्छाशक्तीवर तुम्ही येथे खरोखरच स्वत:चा असा ठसा उमटवू शकता. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, "रंगुनि रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा'!
('आकाशभरारी' मालिकेतील यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी 'ई सकाळ'च्या सर्च बॉक्समध्ये टाईप करा akashbharari)