मुंबई - ऑर्थर रोड कारागृहातील हल्ला लोणावळ्यातील मालमत्तेच्या वादातून झाला, हा गॅंगस्टर मुस्तफा डोसाने केलेला आरोप सपशेल फेटाळत, डोसाचा आरोप कपोलकल्पित आहे, असे सालेमने म्हटले आहे; तसेच पोलिसांकडूनच धमकी येत असून, "एन्काऊंटर करू,' असे धमकाविल्याचा आरोपही सालेमने केला आहे.
सालेमला आज जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. त्या वेळी त्याची भेट त्याचे वकील राजा ठाकूर यांनी घेतली. या भेटीमध्येच सालेमने वाशीमधील एका पोलिस अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार केली आहे. ज्या वेळी पोलिसांबरोबर बाचाबाची झाली त्या वेळी मी तिथे नव्हतो; पण सालेम उद्या याबाबत न्यायालयात तक्रार करणार आहे, असे ठाकूर यांनी "सकाळ'ला सांगितले.
डोसाने काल न्यायालयात सांगितलेल्या सालेमच्या मालमत्तेसंबंधीही सालेमने स्पष्ट नकार दिला आहे. अशी कोणतीही लोणावळ्यातील जमीन मला घ्यायची नसून, मी कधीही डोसाकडे 30 कोटी रुपये मागितले नाहीत, असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले. डोसाने सालेमवर केलेले आरोप म्हणजे केवळ स्वतःला वाचविण्यासाठी केलेला बनाव आहे, असेही त्यांनी सांगितले.
कारागृहातही मला पोलिसांकडून धमकाविले जाते आणि गृहराज्यमंत्री रमेश बागवे मात्र "सालेमची बडदास्त ठेवली जाते' असे विधान करतात, याबद्दलही सालेमने नाराजी व्यक्त केली आहे. याबाबतही न्यायालयात दावा करणार असल्याचे ऍड्. सबा कुरेशी यांनी सांगितले.
Follow
Us on
Twitter