अर्थतज्ञ शिक्षक प्रा. किशोर कुलकर्णी

अमेरिकेतील कोलोरॅडोमधील "मेट्रोपोलिटन स्टेट कॉलेज ऑफ डेनव्हर'ने अलिकडेच प्राध्यापक किशोर कुलकर्णी यांचा उल्लेखनीय कार्यासाठी 2010 वर्षासाठीचा पुरस्कार देऊन गौरव केला. अर्थशास्त्राचे प्राध्यापक असलेले प्रा. कुलकर्णी "इंडियन जर्नल ऑफ इकॉनॉमिक्स अँड बिझनेस'चे मुख्य संपादक देखील आहेत.
"मेट्रोपोलिटन स्टेटसाठी प्रा. किशोर कुलकर्णी सातत्याने करत असलेल्या दर्जेदार कार्याचा आणि उल्लेखनीय सेवेचे महत्त्व या पुरस्कारामुळे अधोरेखित झाले आहे,'' असे "मेट्रोपोलिटन स्टेट कॉलेज ऑफ डेनव्हर'चे अध्यक्ष डॉ. स्टीव्हन जॉर्डन यांनी म्हटले आहे.
या पुरस्काराच्या निमित्ताने आपल्या ज्ञानाची आणि गुणवत्तेची पताका फडकावणाऱ्या आणखी एका मराठी माणसाची ओळख जगाला झाली आहे.
प्राध्यापक किशोर कुलकर्णी हे पक्के पुणेरी! त्यांचा जन्म आणि शिक्षण पुण्यातच झाले. शनिवार पेठेतील मेहुणपुऱ्यात असलेल्या आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग या शाळेत दाखल झाले. तेथे मॅट्रिकपर्यंतचे म्हणजे त्यावेळची 11वीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या कॉलेजमधून बी.ए.ची पदवी घेऊन ते एम.ए.च्या शिक्षणासाठी गोखले इन्स्टिट्यूट या नामंकित संस्थेत दाखल झाले. प्रा. कुलकर्णी यांचे पुण्यातील वास्तव्य या काळात पुलाची वाडी आणि त्यानंतर नळस्टॉप परिसरात होते. 1974 मध्ये बी.ए. परिक्षेत त्यांनी पहिल्या क्रमांक पटकावला. अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते 1976 मध्ये दुसऱ्या क्रमांकाने एम.ए. झाले. त्यानंतर ते अमेरिकेत स्थायिक झाले. पिट्सबर्ग विद्यापीठातून त्यांनी 1982 मध्ये पी.एच.डी. प्राप्त केली.
प्रा. कुलकर्णी यांनी आत्तापर्यंत 8 पुस्तके लिहिली असून सुमारे 100 लेख विविध जर्नलमधून प्रसिद्ध झाले आहेत. "मायक्रोइकॉनॉमिक्स', "इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स अँड मॉनिटरी इकॉनॉमिक्स'या विषयांवरील त्यांची काही पुस्तके भारत आणि अमेरिकेतील महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये क्रमिक अभ्यासक्रमासाठी ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये हार्वर्ड विद्यापीठाचाही समावेश आहे. याशिवाय आपल्या तीन दशकांच्या शैक्षणिक कारकिर्दीत देशविदेशात त्यांची असंख्य व्याख्यानेदेखील झाली आहेत.
"गोल्डन की इंटरनॅशनल ऑनर सोसायटी'ने 2001मध्ये सर्वोत्कृष्ट शिक्षक म्हणून पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे. याशिवाय त्यांना 1997 मध्ये सर्वोत्कृष्ट संशोधक, 2004 मध्ये महाविद्यालयीन शिक्षणच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी सिनेटचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
हाडाचे शिक्षक असलेले प्रा. किशोर कुलकर्णी जगभर प्रवास करत असतातच पण, पण ते वेळात वेळ काढून टेनिस कोर्टावर हजेरी लावतात. त्यांनी स्थानिक आणि प्रादेशिक स्तरावरच्या अनेक टेनिस स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावले असून प्रा. कुलकर्णी "युएसटीए' टेनिस लीगचे 4.5 मानांकनप्राप्त सदस्य आहेत. त्यांची पत्नी जयश्री गोखले या देखील राष्ट्रीय खो-खो खेळाडू असून एक वर्ष महाराष्ट्राच्या संघाच्या उपकर्णधार होत्या. ते दोघेही दहा वर्ष सन्मित्र संघाच्या खो-खो संघात होते. सौ. जयश्री या देखील उच्चशिक्षित असून त्यांनी अकाऊंटिंग विषयात एम. कॉम. आणि सेन्ट्रल अर्कान्सास विद्यापीठातून एम.बी.ए. केले आहे. त्या सध्या "मेट्रोपोलिटन स्टेट कॉलेज ऑफ डेनव्हर'मध्ये अकाउंटिंग इन्स्ट्रक्टर आहेत. प्रा. कुलकर्णी यांना लिना आणि अदिती अशा दोन कन्या असून लिना या दंततज्ञ असून त्यांनी या विषयात एम.एस. केले आहे.
प्रा. कुलकर्णी यांनी देशविदेशातील अनेक संस्थांमध्ये शिक्षक म्हणून काम केले आहे तसेच अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय सूक्ष्मअर्थशास्त्र (मायक्रोइकॉनॉमिक्स), जागतिक अर्थशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध, आर्थिक विकास, चलन आणि बॅंकिंग अशा अर्थशास्त्राच्या विविध शाखांचा त्यांचा अभ्यास असून याच विषयांचे ते जाणकार शिक्षक आहेत.