Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

"फुटबॉल संघटनेने मला फसविले'
वृत्तसंस्था
Friday, July 30, 2010 AT 12:00 AM (IST)

ब्युनॉस आयर्स  -  अर्जेंटिनाचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक दिएगो मॅराडोना यांनी फुटबॉल संघटनेवर टीका केली आहे. संघटनेने आपली खोटेपणाने फसवणूक केली आणि यामागे राष्ट्रीय संघव्यवस्थापक कार्लोस बिलार्डो यांचा हात आहे, असा आरोप त्यांनी केला.

मॅराडोना यांची प्रशिक्षकपदावरून बुधवारी हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या मॅराडोना यांनी फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष ज्युलिओ ग्रोंडोना यांनाही धारेवर धरले. "प्रशिक्षक म्हणून माझ्या भवितव्याबद्दल ग्रोंडोना खोटे बोलले. जर्मनीविरुद्ध हरल्यानंतर संघ निराश झाला होता. तेव्हा ग्रोंडोना "ड्रेसिंग रूम'मध्ये आले आणि त्यांनी इतर अनेक जण तसेच खेळाडूंच्या उपस्थितीत माझ्या कामगिरीविषयी समाधान व्यक्त केले. मी प्रशिक्षकपदावर कायम राहावे, अशी इच्छा असल्याचेही त्यांनी जाहीरपणे सांगितले. संघ मायदेशी परतल्यानंतर मात्र विचित्र गोष्टी घडू लागल्या. सोमवारी मी ग्रोंडोना यांची भेट घेतली. पाच मिनिटांत त्यांनी सांगितले की, मी कायम राहावे; पण माझे सात सहकारी बदलावे लागतील. प्रत्यक्षात मी जावे, असेच त्यांना म्हणायचे होते. कारण, माझ्या सहकाऱ्यांशिवाय मी काम करू शकणार नाही, हे उघड आहे. त्यांना हे ठाऊक होते आणि म्हणूनच त्यांनी अशी अट घातली.'

ग्रोंडोना यांनी नंतर सांगितले की, "मॅराडोना यांनी पदावर राहावे, अशीच आमची भूमिका होती; पण त्यांचे सहकारी बदलण्याची गरज होती. यात त्यांची कशी काय फसवणूक होते, हेच मला कळत नाही. मला मॅराडोना यांच्यापासून सुटका करून घ्यायची नव्हती, फक्त त्यांचे काही सहकारी बदलायचे होते.'

अध्यक्षांना दुःख
दरम्यान, अर्जेंटिनाच्या अध्यक्षा क्रिस्टिना किर्चनर यांनी मॅराडोना यांना पद सोडावे लागल्याबद्दल दुःख व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ""संघ बिकट स्थितीत असताना मॅराडोना यांनी प्रशिक्षकपदाची धुरा स्वीकारली. तेव्हा विश्‍वकरंडक स्पर्धेला आपण पात्र ठरू शकणार नाही, असे भाकीत अनेकांनी वर्तविले होते. वास्तविक आपल्या संघाने फार अभिमानास्पद कामगिरी केली. त्यामुळे मॅराडोना यांना जावे लागणे निराशाजनक आहे. ग्रोंडोना आणि त्यांच्यात काय घडले हे मला ठाऊक नाही; पण त्यांनी एकत्र येऊन मार्ग काढायला हवा.''

बॅटिस्टाकडे जबाबदारी
दरम्यान, युवक संघाचे प्रशिक्षक आणि मॅराडोना यांच्या बरोबरीने खेळलेले सर्जिओ बॅटिस्टा यांना हंगामी प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आले आहे. 1986च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत हे दोघे खेळले होते. तेव्हा अर्जेंटिनाने विश्‍वकरंडक जिंकला होता. तेव्हा बिलार्डो हेच संघव्यवस्थापक होते.
 
 


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: