स्वाईन फ्ल्यूने सोलापुरातील महिलेचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
Friday, July 30, 2010 AT 12:00 AM (IST)
सोलापूर - शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू पावलेल्या पंचवीस वर्षीय महिलेला स्वाईन फ्ल्यू झाल्याचा पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. त्याचबरोबर एका महिलेला या रोगाची लागन झालू असून तीच्यासह आणखी एका संशयित महिलेवर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी सुरेश देवकर यांनी दिली.
वर्षानंतर स्वाईन फ्ल्यूने एका महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृत महिला नऊ महिन्या गरोदर होती. अशक्तपणा व ताप आल्याने 22 जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता ती उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात दाखल झाली. त्या वेळी तीची परिस्थिती अतिशय गंभीर होती. उपचारासाठी दाखल झाल्यानंतर त्याच दिवशी दोन तासातच तीचा मृत्यू झाला. त्या महिलेच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल गेल्या मंगळवारी (ता. 27) रोजी प्राप्त झाला. 23 तारखेला उपचारासाठी दाखल महिलेचा अहवालही आज पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्या महिलेंवरही प्रतिकात्मक उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर माढा तालुक्यातील बेंबळे येथील एक संशयित महिला उपचारासाठी दाखल झाली आहे, अशी माहिती डॉ. देवकर यांनी दिली.
काळजी घ्या - जिल्हाधिकारी
स्वाईन फ्ल्यूने एका महिलेचा मृत्यू झाला. नागरिकांनी कसल्याही परिस्थितीत आरोग्याकडे दुर्लक्ष करु नये. ताप आल्यास किंवा स्वाईन फ्ल्यूची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तत्काळ वैद्यकीय अधिकाऱ्याचा सल्ला घ्यावा. आपल्याकडे स्वाईन फ्ल्यूवरील मुबलक औषधे उपलब्ध आहेत. उपचाराची सुविधाही चांगली आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठलीही भीती बाळगू नये. स्वाईन फ्ल्यू होऊ नये, यासाठी करण्यात येणारे सर्व उपाय नागरिकांनी करावेत व स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी केले आहे.