रैनाची "टेस्ट कॅप' सार्थकी!
-
Friday, July 30, 2010 AT 12:15 AM (IST)
भारताचा डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात गुरुवारी शतक पूर्ण केले. पदार्पणात शतक काढणारा तो भारताचा 12 वा आणि जगातील फलंदाज ठरला. त्याने 120 धावांची खेळी केली. युवराजसिंग आजारी पडल्यामुळे रैनाला संधी मिळाली आणि त्याने संधीचे सोने केले. रैनाला 98 वन-डे खेळल्यानंतर कसोटी पदार्पणाची संधी मिळाली असून, हा एक विक्रमच आहे. रैनाला "टेस्ट कॅप' राहुल द्रविड याच्या हस्ते प्रदान करण्यात आली. विशेष म्हणजे द्रविड हाच त्याचा "हीरो' आहे.
भारताचे पदार्पणात "शतकवीर'
फलंदाज धावा प्रतिस्पर्धी मैदान कालावधी कसोटी धावा सरासरी 100-50
लाला अमरनाथ 118 इंग्लंड मुंबई डिसें. 1933 24 878 24.38 1-4
दीपक शोधन 110 पाकिस्तान कोलकता डिसें. 1952 3 181 60.33 1-0
ए. जी. कृपालसिंग 100* न्यूझीलंड हैदराबाद नोव्हे. 1955 14 422 28.13 1-2
अब्बास अली बेग 112 इंग्लंड मॅंचेस्टर जुलै 1959 10 428 23.77 1-2
हनुमंतसिंह 105 इंग्लंड दिल्ली फेब्रु. 1964 14 686 31.18 1-5
गुंडाप्पा विश्वनाथ 137 ऑस्ट्रेलिया कानपूर नोव्हे. 1969 91 6080 41.93 14-35
सुरिंदर अमरनाथ 124 न्यूझीलंड ऑकलंड जाने. 1976 10 550 30.55 1-3
महंमद अजहरुद्दीन 110 इंग्लंड कोलकता डिसें. 1984 99 6215 45.03 22-21
प्रवीण आमरे 103 द. आफ्रिका डर्बन नोव्हें.1992 11 425 42.50 1-3
सौरभ गांगुली 131 इंग्लंड लॉर्डस जून 1996 113 7212 42.17 16-35
वीरेंद्र सेहवाग 105 द. आफ्रिका ब्लुमफॉंतेन नोव्हें. 2001 77 6831 53.78 20-21
सात जणांचे "एकमेव'!
- लाला अमरनाथ, दीपक शोधन, ए. जी. कृपालसिंग, अब्बास अली बेग, हनुमंतसिंग, सुरिंदर आणि प्रवीण आमरे या सात जणांचे हे कारकिर्दीतील एकमेव शतक ठरले.
- लाला अमरनाथ, अब्बास अली बेग आणि गुंडाप्पा विश्वनाथ यांनी दुसऱ्या डावात शतक काढले.
- लाला अमरनाथ आणि त्यांचा मुलगा सुरिंदर ही पिता-पुत्राची जोडी आहे.
"विशी'च्या सदिच्छा अन् शाबासकी
पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकाविलेले भारताचे शैलीदार फलंदाज गुंडाप्पा विश्वनाथ यांनी रैनाच्या विक्रमाच्या पार्श्वभूमीवर या संदर्भात त्यांची
प्रतिक्रिया -
पदार्पणाची कसोटी फार महत्त्वाची असते. तुमच्यावर दडपण असतेच. रैनाचे सुदैव असे, की त्याला सचिन तेंडुलसारखा "मास्टर' जोडीदार लाभला. सचिनने कोणताही धोका न पत्करता सफाईदार खेळी केली. रैनाला त्याच्यापासून प्रेरणा लाभली. पहिल्या कसोटीत रैनाने अशा दिग्गज खेळाडूबरोबर मोठी भागीदारीही रचली. मुळात भरपूर वन-डे खेळल्यामुळे आणि त्यात उत्तम कामगिरी केल्यामुळे रैनाचा आत्मविश्वास उंचावलेला असल्याने त्याला फायदा झाला. आता माझ्या शतकाबद्दल बोलायचे झाल्यास तेव्हाचा कर्णधार टायगर पतौडी याची आठवण येते. पहिल्या डावात मी शून्यावर बाद झालो होतो. त्यामुळे मी फार निराश झालो होतो, पण अजून दुसरा डाव बाकी आहे, अशा शब्दांत पतौडीने मला धीर दिला. त्यानंतर मी शतक फटकावले! त्यानंतर घडलेला इतिहास तुम्हा सर्वांना माहीत आहेच ! असो..रैनाच्या कारकिर्दीला शुभेच्छा !!