माणगाव खोऱ्यात पावसामुळे दाणादाण
सकाळ वृत्तसेवा
Friday, July 30, 2010 AT 12:00 AM (IST)
माणगाव/दुकानवाड - माणगाव खोऱ्यात आज पावसाने कहर केला. या भागातील जवळजवळ सर्वच पूल पाण्याखाली गेले आहेत. कर्ली नदीने रौद्र रूप धारण केल्याने जनजीवन पूर्णतः ठप्प झाले आहे. भातशेती पाण्याखाली गेली आहे. नदी-नाल्यांनी आपले प्रवाह बदलले आहेत.
माणगाव खोऱ्यात आठवडाभरात पावसाने काहीशी उसंत घेतली होती; पण कालपासून पुन्हा पावसाने जोर धरला. अनेक ठिकाणी पाणी साचले. काल (ता. 28) सकाळी आंबेरी पुलावर पाणी आल्याने अन्य गावांचा संपर्क तुटला होता. एसटीच्या गाड्या पुलावर अडकून पडल्या होत्या. शासकीय नोकर, विद्यार्थी यांच्या जाण्याच्या वेळेतच पाणी आल्याने समस्या निर्माण झाल्या. माणगाव खोऱ्यातील जवळजवळ सर्वच शाळांतील शिक्षक माणगावमध्ये राहत असल्याने ते सर्व जण पुलावर अडकून पडले. विद्यार्थी वर्गाचेही नुकसान झाले. तब्बल चार तासांनी पूर ओसरल्यानंतर वाहतूक सुरू झाली. प्रवासी, नागरिक, वाहनचालक यांना पूर ओसरण्याची वाट पाहावी लागली.
याचीच पुनरावृत्ती आज झाली. काल सायंकाळपासून पावसाने पुन्हा जोर धरला. तो आज दिवसभर कायम होता. आजही माणगाव बाजाराला आलेल्या प्रत्येक नागरिकाला घरी लवकर परतावे लागले. कारण नदीवर पूर आल्यास वाहतूक खोळंबून अनेक गावांचा संपर्क तुटला.
माणगाव खोऱ्यात आज पुराची तीव्रता खूपच होती. कर्ली नदीने सकाळी साडेआठच्या दरम्यान आपले पात्र ओलांडले. माणगावजवळच्या आंबेरी पुलावर पाणी आले. यामुळे वाहतूक ठप्प झाली. परिसरातील काही घरांमध्येही पाणी घुसले. माणगाव बाजारपेठेतही यामुळे शुकशुकाट होता. अनेक नोकरदार, शिक्षक पुलाच्या दोन्ही तीरावर अडकून पडले. या पुलावर पाणी आल्याने खोऱ्यातील 37 गावांचा संपर्क तुटला. कालच्यापेक्षा आजच्या पुराची तीव्रता जास्त होती.
माणगाव खोऱ्यातील शिवापूर, दुकानवाड पंचक्रोशीतही विक्रमी पाऊस झाला. या भागातील टाळंबा दुकानवाड, आंजिवडे-मेट्याचा व्हाळ, दुकानवाड-उपवडे, दुकानवाड-वसोली, वीरवाडी-वसोली, वीरवाडी-शिवापूर मार्गावरील 3 पूल, चाफेली-पुळास, पुळास-खिरमळा, निळेली-मोरे हे पूल पाण्याखाली गेले. यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. शाळकरी मुले, बाजारासाठी जाणारे गावकरी यांचा खोळंबा झाला. माणगाव खोऱ्यातील बहुसंख्य शाळा, हायस्कूलमध्ये 10 टक्केपेक्षाही कमी उपस्थिती होती.
ओढे-नाले यांनी पात्र बदलली. पात्र तुडुंब भरल्याने यातील पाणी वाट मिळेल तिथे जाताना दिसत होते. यामुळे मोठी हानी झाली. शेती पाण्याखाली गेली आहे. काही भागात तर भात खाचरांतून ओढ्या-नाल्याचे प्रवाह वाहत आहेत. विजेचाही लपंडाव सुरू आहे.
कर्लीचे रौद्र रूप
हळदीचे नेरूर येथे जटाशंकर मंदिराकडे जाणारा फुटब्रिज कर्ली नदीत उंचावर आहे. तिथपर्यंत सहसा पाणी पोहोचत नाही. आज मात्र या फुटब्रिजवरूनही पाणी वाहत होते. कर्ली नदीचा घोंगावणारा प्रवाह धडकी भरायला लावत होता.
15 दिवस पूल पाण्याखाली
उपवडे-दुकानवाडदरम्यानचा पूल गेले 15 दिवस पाण्याखाली आहे. यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. हा पूल कमी उंचीचा असल्याने दर पावसाळ्यात ही स्थिती ओढवते. त्याच्या दुरुस्तीची अनेकदा मागणी झाली; पण तात्पुरती मलमपट्टीच करण्यात आली.