सचिनच्या मार्गदर्शनानेच शतकी खेळी - रैना
वृत्तसंस्था
Friday, July 30, 2010 AT 12:00 AM (IST)
कोलंबो - कसोटी पदार्पणात शतक करण्याची संधी केवळ सचिन तेंडुलकरच्या सल्ल्यानेच साकार करू शकलो, अशी प्रतिक्रिया भारताच्या सुरेश रैना याने व्यक्त केली.
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळानंतर रैना म्हणाला, ""फलंदाजीसाठी खेळपट्टीवर उतरलो तेव्हा खरे तर निराश होतो. पण, त्या वेळी सचिनने तू पहिला कसोटी सामना खेळत आहेस, अशी संधी सारखी मिळत नसते, तेव्हा निर्धास्तपणे खेळ आणि क्रिकेटचा आनंद लूट, असे मार्गदर्शन केले आणि माझ्यावरील सारे दडपण दूर झाले.'' रैना आणि सचिन यांनी पाचव्या विकेटसाठी 256 धावांची भागीदारी केली. तो म्हणाला, ""सचिनसारख्या महान फलंदाजाबरोबर मोठी खेळी करण्याचे स्वप्न होते. या सामन्याने तेदेखील साकार झाले.''
शतकी खेळीत वेळोवेळी सचिनने माझा आत्मविश्वास वाढविला. हा सामना मी कधीच विसरणार नाही. ""एकदिवसीय सामन्यात तू भारतीय संघासाठी सामना जिंकून देणारा फलंदाज ठरला आहेस. कसोटीतही अशीच कामगिरी कर,'' असा सल्लाही सचिनने दिल्याचे रैनाने सांगितले.
पहिला भारतीय फलंदाज
सुरेश रैनाने पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकाविण्याचा पराक्रम तर केलाच, त्याचबरोबर त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारच्या सामन्यांत शतक झळकाविणारा पहिला भारतीय फलंदाज होण्याचा मान मिळविला. कसोटी सामन्याच्या पदार्पणात शतक करणाऱ्या सुरेश रैनाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 शतके ठोकली आहेत. ट्वेंटी-20 क्रिकेट पद्धतीतही त्याने शतक झळकाविले आहे. याचवर्षी झालेल्या विश्वकरंडक ट्वेंटी 20 स्पर्धेत त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 101 धावांची खेळी केली होती.