संजय मिस्कीन - सकाळ वृत्तसेवा
मुंबई - ऑर्थर रोड कारागृहात अबू सालेमवर झालेला हल्ला हा त्याच्या तुरुंगातील हिरोगिरीमुळेच झाला असून, प्लॅस्टिक सर्जरीमुळे चिकण्या बनलेल्या सालेमचा चेहरा कायमचा विद्रुप करण्याचा गेमच डोसाने आखला होता, अशी माहिती समोर आली आहे. एकाच कारागृहात राहणाऱ्या आणि एकाच गॅंगमध्ये रूळलेल्या मुंबई बॉम्बस्फोटातील या दोन खलनायकांमध्ये, हल्ल्याच्या दिवशी सालेम हिरो, तर डोसा व्हिलन बनला होता.
महंमद डोसा याला तुरुंगात असतानाही नशा करण्याची सवय आहे. तो चरसची नशा करतो. यामुळे कायम धुंदीत असणारा डोसा
रात्री-अपरात्री मोठमोठ्याने ओरडतो, तर कधी बेधुंद होऊन जुन्या चित्रपटातील गाणी मोठ्या आवाजात म्हणतो. त्यामुळे सालेमच्या झोपेचा खोळंबा होत असे. डोसाच्या आरडाओरड्याने झोप पूर्ण होत नव्हती. त्यामुळे तुरुंगाधिकाऱ्याकडे सालेमने याबाबत तक्रारही केली. सालेमच्या या तक्रारीवरून अधिकाऱ्यांनी डोसाला बजावले; मात्र डोसाभाईचा तोरा कमी झाला नाही.
डोसाच्या स्वभावात काहीही बदल होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर सालेमने तुरुंगांधिकाऱ्यांना त्याला तेथून हलवा; अन्यथा मला तरी हलवा, अशी निर्वाणीची तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी डोसाला अंतिम तंबी दिली होती. यामुळे डोसाभाईचा राग अनावर झाला होता. सालेमला जाब विचारून खुन्नस काढण्याची जिद्द डोसाभाईने पक्की केली. डोसाने चमच्याला धारदार करीत, सालेमच्या हिरोगिरीवर हल्ला करण्याचा बेत आखला. दुसऱ्या दिवशी सालेम समोर आला त्या वेळी "क्यारे, चिकणे खुद को हिरो समझता हैं क्या, अब तेरा चिकनापन बदल देता हूँ,' अशी सरळपट्टी देत हातातील धारदार चमच्याने सालेमच्या चेहऱ्यावर हल्लाबोल केला.
डोसाने चेहऱ्यावर हल्ला करण्यामागे तंत्र होते, असा निष्कर्ष पोलिस अधिकाऱ्यांनी काढला आहे. सालेमने चेहऱ्यावर अनेक वेळा प्लॅस्टिक सर्जरी केल्यामुळे त्याचा चेहरा सुंदर झाला आहे. प्लॅस्टिक सर्जरीच्या चेहऱ्यावर वार केल्यास तो भरून निघत नाही. त्यामुळेच डोसाने सालेमच्या चिकण्या चेहऱ्याला टार्गेट केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Follow
Us on
Twitter