Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

लाडक्‍या "नितीन'ला मिळाले मातांचे आशीर्वाद
सकाळ न्यूज नेटवर्क (snn.nsk@esakal.com)
Saturday, July 31, 2010 AT 12:15 AM (IST)
Tags: nitin gadkari,  wishesh,  old women,  bjp,  new delhi,   national,  snn

नवी दिल्ली -  भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काल आशीर्वादाच्या फुलांचा वर्षाव झाला. संघ, जनसंघ व भाजप असा प्रवास केलेल्या नागपूरमधील काही ज्येष्ठ महिलांनी गडकरींची भेट घेत ओलावलेल्या नेत्रांनी त्यांना काळजापासून शुभेच्छा दिल्या. यामुळे गडकरीही काही काळ गतकाळातील सुखद स्मृतींमध्ये रमले.

"एकेकाळी आमच्या डोळ्यांसमोर खेळणारा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनांतून नागपूर दणाणून सोडणारा गडकऱ्यांचा नितीन आज आमच्याच पक्षाचा सर्वोच्च नेता झाला. त्याला आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आम्ही दिल्लीत आलो,' अशी भावना या महिलांनी व्यक्त केली. नागपूरमधील सुधाताई सोहोनी, उमा पिंपळकर, मालती जोशी, मालती डबीर, इंदूताई सबनीस, शालिनी बोबडे, अहिंसा लार्डेकर आदी ज्येष्ठ महिला खास गडकरींना भेटण्यासाठी दिल्लीत आल्या होत्या. चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर यांनी अगदी आईच्या मायेने आमची व्यवस्था केल्याचेही त्यांनी नमूद केले.

या सर्व कार्यकर्त्या 60 ते 80 वर्षे या वयोगटातील आहेत. गडकरी यांच्या मातोश्री भानूताई यांच्याबरोबर या साऱ्याजणींनी संघ, जनसंघ आणि भाजपचेही एकेकाळी काम केले आहे. आणीबाणीत कारावासही भोगला. "भानूताई आज नाहीत; पण त्यांचीच प्रतिकृती असलेल्या व आमच्याच पक्षसंघटनेत कर्तृत्वाचे शिखर गाठलेल्या त्यांच्या लाडक्‍या नितीनला मावशीच्या भूमिकेतून केवळ "आणखी यशवंत हो बाळा,' असा आशीर्वाद देण्यासाठी आम्ही येथे जमलो आहोत,' असे श्रीमती सोहनी व श्रीमती जोशी यांनी सांगितले. आठवणी जागवताना सोहनी आजी म्हणाल्या, ""भानूताईंकडे आम्ही संघ कार्यकर्त्या गेलो की शाळेतून नुकताच घरी आलेला लहानगा नितीन भानूताईंना म्हणायचा, ""आई गं, आल्या या! आता या तुला घेऊन बाहेर जाणार!''

आपल्या व्यग्र दैनंदिनीतून वेळ काढून या महिलांशी गडकरी यांनी अर्धा तास संवाद साधला. त्यांनी आम्हा सर्वांना नावानिशी ओळखले, असे अप्रूपही या महिलांनी बोलून दाखवले. मालतीताई म्हणाल्या, आणीबाणीत अटकेतून सुटका झाल्यावर नागपूरच्या ओंकार नगरात जनसंघाचा भव्य मेळावा झाला होता. त्या वेळी आम्हा महिला कार्यकर्त्यांची सारी व्यवस्था पाहणाऱ्या अभाविप कार्यकर्त्यांत नितीनचा पुढाकार होता. त्याच्या किती आठवणी सांगाव्या, तेवढ्या कमी पडतील.

या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी काल संसदेचाही फेरफटका मारला, लालकृष्ण अडवानी व सुषमा स्वराज या ज्येष्ठ नेत्यांनीही त्यांना आवर्जून वेळ दिला. अडवानी यांनी पूर्वस्मृती जागविल्या. ""नागपूरला 1948 मध्ये मी संघ कार्यकर्ता म्हणून सर्वप्रथम आलो होतो. तेव्हापासून नागपूरला माझ्या मनाच्या कप्प्यात खास स्थान आहे,'' असे अडवानी यांनी आवर्जून सांगितल्याचे श्रीमती बोबडे व श्रीमती लाडेकर म्हणाल्या.

गडकरींशी बोलता बोलता या महिलांनी तुम्हाला नागपूर बरे वाटते की दिल्ली, असा सवाल केला. तेव्हा या प्रश्‍नावर गडकरींनी क्षणार्धात नागपूरच; पण आता दिल्ली, असे उत्तर मिश्‍कीलपणे दिल्याचेही या महिलांनी बोलून दाखवले.

"प्रकृतीलाही जपा'
संसदेबरोबरच अक्षरधाम मंदिर व दिल्लीतील अन्य प्रेक्षणीय स्थळांची सफरही गडकरींनी या कार्यकर्त्यांना घडवून आणली. मात्र, जनसंघ व नंतर पक्षाच्याही आंदोलनांसाठी आम्ही अनेकदा दिल्लीत आलो आहोत. आम्हाला दिल्लीचे अप्रूप नाही. यापूर्वी एकदा, तर स्वतः अटलजींनी आम्हाला संसद फिरून दाखविली होती, अशी आठवण त्यांनी सांगितली. अप्रूप असेलच तर "आमच्या घरातल्या' भाजप राष्ट्रीय अध्यक्षांना भेटण्याचे असे त्यांनी नमूद केले. गडकरींचा कामाचा व्याप, ताण हे सारे पाहून त्यांनी, "प्रकृतीचीही काळीज घ्या,' असा मायेचा सल्ला त्यांना आवर्जून दिला.
 
Follow
Us on
Twitter

 
 
 


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: