नवी दिल्ली - आक्रमक विरोधी पक्ष आणि आडमुठे सरकार यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा अक्षरशः वाया गेला आहे. कोंडी फोडण्यासाठी आता संसदेबाहेर प्रयत्न सुरू असून, त्यासाठी शनिवार आणि रविवार हे दोन दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत.
आधीच गोंधळामुळे भाजपची साथ सोडणाऱ्या डाव्यांपाठोपाठ लालू, मुलायमसिंह यांनी सरकारला अनुकूल भूमिका घेतल्याने भाजप आघाडी एकाकी पडत आहे. "यूपीए' सरकारचे घटकपक्ष आणि समाजवादी पक्ष व राष्ट्रीय जनता दल या मित्रपक्षांनी सरकारवर "मतविभागणी नकोच नको', असा दबाव वाढविण्यास सुरवात केल्याने कॉंग्रेसच्या गोटात निवांतपणा आहे.
लोकसभेत आधी स्थगन प्रस्ताव आणि तो फेटाळला गेल्यानंतर नियम 184 अन्वयेच चर्चा व्हावी, या विरोधकांच्या मागणीला सरकारने ठेंगा दाखविला आहे. मतविभागणी नको, या सरकारच्या ठाम भूमिकेला आता घटकपक्षांकडूनही जोरदार साथ मिळत आहे. महागाईच्या मुद्द्यावर तृणमूल कॉंग्रेस आणि द्रमुकने सरकारच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे सभागृहात मतविभागणी झाल्यास हे दोन्ही पक्ष मदतीला धावून येतील, असा विरोधकांचा होरा होता. सुषमा स्वराज, शरद यादव, मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव यांच्या भाषणांतूनही तसा उल्लेख वारंवार आला होता. मात्र, सरकारने तृणमूल कॉंग्रेसमार्फतच महागाईवर अल्पकालीन चर्चेची सूचना देऊन विरोधकांच्या मनसुब्यावर पाणी ओतले होते. तृणमूलचे सुदीप बंधोपाध्याय यांनी स्थगन नको, अल्पकालीन चर्चा हवी, असे आधीच स्पष्ट केले होते. द्रमुकचे टी. आर. बालू यांनीही सरकार अस्थिर होऊ देणार नाही, असे जाहीर केले होते. त्यानंतर संसदीय कामकाजात हिरीरीने सहभागी होणारे डावे पक्ष सभागृह बंद होत असल्यामुळे अस्वस्थ होते. त्यांनी भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. आता लालूप्रसाद आणि मुलायमसिंह यांनीही सरकारच्या सुरात सूर मिसळला आहे.
आज सभागृह सुरू होताच सुषमा स्वराज यांनी प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून महागाईवर तातडीने चर्चा सुरू करावी, अशी मागणी केली. त्यावर लोकसभाध्यक्षांनी निर्णयासाठी विचार करण्यास वेळ लागेल, असे सांगताच विरोधी सदस्यांनी अध्यक्षांपुढील मोकळ्या जागेत धाव घेतली. पाठोपाठ संसदीय कामकाज मंत्री पवनकुमार बन्सल यांनी विरोधकांना महागाईवर चर्चा नको तर नियमांवर बोलायचे आहे, असा टोमणा मारला. गेल्या चार दिवसांपासून विरोधी पक्षांच्या गोंधळामुळे कामकाज होत नसल्याने आता 193 अन्वये चर्चा सुरू करावी, अशीही मागणी त्यांनी केली. बन्सल असे बोलत असताना भाजप आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी आरंभली. याचीच पुनरावृत्ती होत राहिल्याने अध्यक्षांना दिवसभरासाठी कामकाज थांबवावे लागले.
संवेदनशीलतेला आवाहनभाजपने आपण 184 अन्वयेच चर्चेच्या मागणीवर ठाम आहोत, असे सांगितले असून, सोमवारसाठी तसे अर्जही लोकसभाध्यक्षांकडे पाठविल्याचे समजते. त्यामुळे सोमवारी कामकाज सुरळीत चालेल किंवा नाही, अशी शक्यता व्यक्त होत आहे; परंतु नवे निवडणूक आयुक्त कुरेशी यांच्या निवडीसंदर्भात पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांची जी बैठक झाली, त्यात संसद ठप्प असल्याच्या विषयावरही गांभीर्याने चर्चा झाल्याचे समजते. शिवाय, किती दिवस कामकाज बंद ठेवायचे याबद्दलही काही पक्षांत असलेली अस्वस्थता आणि महागाईसारखा गंभीर विषय पाहता यावर अधिक घोळ न घालता सभागृहाने सर्वानुमते ठराव मंजूर करून यावर संवेदनशीलता दर्शवावी, असाही प्रस्ताव पुढे येतो आहे.
Follow
Us on
Twitter