लैंगिक अत्याचाराविरुद्ध "ठोसा' हाच उत्तम उपाय
यूएनआय
Saturday, July 31, 2010 AT 12:00 AM (IST)
नवी दिल्ली - "देशातील महिलांना लैंगिक अत्याचाराच्या कटू वस्तुस्थितीला नेहमीच सामोरे जावे लागते. यामुळे स्वसंरक्षणासाठी मुलींनी मुष्टियुद्ध शिकावे,'' असे आवाहन मणिपूरची जागतिक विजेती एम. सी. मेरी कोम हिने केले.
"दैनंदिन जीवनात रस्त्यावर किंवा नोकरीच्या ठिकाणी अशा गैरप्रकारांना सामोरे जावे लागल्यास मुली मुष्टियुद्ध शिकू शकतील. त्यांनी मूकपणे अत्याचार सहन करू नयेत. त्याऐवजी त्यांनी पुढाकार घेऊन चोख प्रत्युत्तर द्यावे, मी मुष्टियुद्ध खेळते. माझ्याशी कुणी गैरवर्तन केल्यास मी त्याला ठोसा लगावेन,'' असे 27 वर्षांच्या मेरीने पुढे सांगितले.
मेरीने इंफाळमध्ये ऍकॅडमी काढली आहे. त्याविषयी माहिती देताना मेरी म्हणाली, ""सध्या माझ्याकडे 17 मुली शिकत आहेत. मी 2007 मध्ये ऍकॅडमी सुरू केली, पण अलीकडेच ती जोरात चालायला लागली आहे. लष्कराने मला पाच लाख रुपयांचे साहित्य दिले, तर केंद्रीय सीमा सुरक्षा दलाने चार लाख रुपयांची मदत केली. मुलींना ऍकॅडमीत असताना सर्व प्रकारच्या सुविधा मिळायला हव्यात आणि निवासाची व्यवस्था असावी, यावर आमचा कटाक्ष असतो. या मुली 14 ते 18 वयोगटातल्या आहेत.''
मेरी दोन जुळ्या मुलांची आई आहे. कारकीर्द सुरू असतानाच ती ऍकॅडमीसुद्धा चालवीत आहे. अशा प्रकारे ती तीन आघाड्यांवर लढते आहे.