Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

तेलंगणावर पुन्हा "टीआरएस'चा झेंडा
आर. एच. विद्या (rh.vidya@esakal.com)
Saturday, July 31, 2010 AT 12:15 AM (IST)

हैदराबाद  -  आंध्र प्रदेशातील तेलंगणात विधानसभेच्या बारा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत पुन्हा तेलंगणा राष्ट्र समितीचा (टीआरएस) झेंडा फडकला. जाहीर झालेल्या सातपैकी सहा जागांवर "टीआरएस'ने वर्चस्व राखले. उर्वरित एक जागा भारतीय जनता पक्षाने राखली. वेगळ्या तेलंगणा राज्याच्या मागणीचे प्रतिबिंब या मतदानातून उमटल्याचे मानले जात आहे.

सिद्धपेट, रिसपूर, चेन्नूर, मंचेरियाल, धर्मपुरी, वेमुलवाडा हे मतदारसंघ "टीडीएस'ने आपल्याकडेच राखले, तर निजामाबाद ग्रामीणमध्ये भाजपने विजय मिळविला. येल्लारेड्डी, कोरतला, सिरकिल्ला, हुजुराबाद आणि पश्‍चिम वारंगळ या पाच मतदारसंघांत इलेक्‍ट्रॉनिक्‍स मतदानयंत्रांऐवजी मतपत्रिका वापरण्यात आल्या होत्या. त्यामुळे या पाचही मतदारसंघांचा निकाल रात्री उशिरापर्यंत लागण्याची शक्‍यता आहे. मात्र, या सर्व मतदारसंघांमध्ये पाचव्या फेरीतील मतमोजणीपर्यंत "टीआरएस' आघाडीवर असल्याचे समजते.

सिद्धपेट मतदारसंघात "टीआरएस'चे टी. हरीश राव यांनी 95 हजार 858 मतांचे आधिक्‍य घेत विजय मिळविला. त्यांनी राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचा 90 हजार मतांचे आधिक्‍य घेत निवडून येण्याचा विक्रम मोडला. हरीश राव हे "टीआरएस'चे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव यांचे पुतणे आहेत. मचेरियाल मतदारसंघात जगदंब अरविंद रेड्डी, धर्मपूर मतदारसंघात कोपुल्ला ईश्‍वर, वेमुलवाडा मतदारसंघात सी. एच. रमेशबाबू, चेन्नूर मतदारसंघात नल्लाला वोदेलू, तर सिरपूर मतदारसंघात के. समय्या विजयी झाले. अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव असलेल्या चेन्नूरमध्ये कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकारिणी समितीचे सदस्य जी. व्यंकटस्वामी यांचे पुत्र, तसेच माजी मंत्री जी. विनोद यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

निजामाबाद ग्रामीण हा बालेकिल्ला आपल्या ताब्यात ठेवण्यात भाजपला यश आले. तेथे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. श्रीनिवास यांना वाय. लक्ष्मीनारायण यांनी पराभूत केले. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत श्रीनिवास यांना लक्ष्मीनारायण यांनीच हरविले होते.

तेलगू देसमची "अनामत' जप्त
बाभळी प्रकल्पावरून राजकारण करणारे तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांना या निवडणुकीत सपाटून मार बसला. सर्व मतदारसंघांत अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की त्यांच्या पक्षावर ओढवली. रात्री उशिरापर्यंत मिळालेल्या मतमोजणीच्या आकडेवारीनुसार "टीआरएस' पहिल्या, तर कॉंग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होते. तेलगू देसम तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला.
 
Follow
Us on
Twitter
   
 

 
प्रतिक्रिया
On 7/31/2010 12:35 AM Ravindra said:
आंध्राबाबू नी आता आत्मापरीश्षण करावे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: