धुळे - एका सामान्य कुटुंबातील मुलगाही इंजिनिअर, विविध क्षेत्रातील तज्ञांप्रमाणे दीड लाख रुपये वेतनाची नोकरी मिळवू शकतो. जिद्दीच्या जोरावर येथील प्रफुल्ल बडगुजर या विद्यार्थ्यांने हे यश साध्य करून दाखविले आहे. तो "एसटी' चालक राजेंद्र बडगुजर यांचा मुलगा. "बीए'चे शिक्षण घेत असतानाच एका मल्टीनॅशनल कंपनीत ग्राफिक डिझायनर म्हणून त्याची निवड झाली आहे. उत्तर महाराष्ट्रांतर्गत येथील संगणक क्षेत्रातील अग्रेसर एक्सप्लोरा स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक वेतनाची नोकरी मिळविणारा प्रफुल्ल पहिला विद्यार्थी ठरला आहे.
एक्सप्लोरा स्कूलतर्फे प्रफुल्लला आज शिवसेनेचे महानगरप्रमुख भूपेंद्र लहामगे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. एक्सप्लोरा स्कूलचे संचालक विष्णुकांत फाफट, राजेंद्र बडगुजर, चंद्रकला बडगुजर, रवी भदाणे, राजेंद्र सजवान उपस्थित होते. श्री. लहामगे म्हणाले, की विद्यार्थ्यांनी पारंपरिक क्षेत्राबरोबरच वेगळ्या वाटा निवडून "करिअर' घडविले पाहिजे. मल्टिमीडिया क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होत आहेत. "एसटी' चालकाचा मुलगा दीड लाखाच्या वेतनाची नोकरी मिळवू शकतो, हे प्रेरणादायी उदाहरण आहे. श्री. फाफट यांनी सांगितले की, पुणे- मुंबईमध्ये आज महागडे शिक्षण विद्यार्थी घेतात. तुलनेत धुळ्यासारख्या शहरातून अत्याधुनिक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहे. यामुळे सामान्य कुटुंबातील मुलेही दीड लाखाच्या वेतनाची नोकरी मिळविण्यात यशस्वी होत आहे.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रफुल्लसह पालकांचा सत्कार झाला. राजेंद्र बडगुजर म्हणाले, की प्रफुल्लने संधीचे सोने केले. श्री. फाफट यांच्या मार्गदर्शनामुळे आज हे यश त्याला मिळाले. चंद्रकला बडगुजर यांनी सांगितले, की कठोर परिश्रमातून प्रफुल्ल आज यशस्वी झाला. त्यामुळे समाधानी आहे. प्रफुल्लने मनोगत व्यक्त केले.
Follow
Us on
Twitter