
मुंबई - ऑर्थर रोड कारागृहात गॅंगस्टर अबू सालेमची वागणूक समाधानकारक असून त्याच्याविरोधात कोणत्याही बंद्याने तक्रार केलेली नाही, असा खुलासा माहितीच्या अधिकारात मिळालेल्या तपशिलात उघड झाला आहे.
सालेम बराक क्रमांक 10 मध्ये होता. त्याच्या वर्तणुकीबाबत त्याने माहितीच्या अधिकाराचा अर्ज दाखल केला होता. या अर्जाला मुंबई मध्यवर्ती कारागृहाचे माहिती अधिकारी ए. एस. कारकर यांनी ही माहिती दिली आहे. सालेमची कारागृहातील वागणूक समाधानकारक असून तो शिस्तीचे पालन करतो. कारागृहातील नियमांप्रमाणे तो मोबाईल वापरत नाही आणि तशा प्रकारची अन्य कैद्यांची तक्रारही नाही; तसेच कारागृहात खंडणी, गटबाजी किंवा टोळीहल्ला अशा प्रकारच्या तक्रारीही त्याच्याविरोधात कोणी केलेल्या नाहीत, असे या तपशिलात म्हटले आहे. कारागृहात कोणत्याही प्रकारची टोळी त्याने बनविली नसून तुरुंगाधिकाऱ्यांनी त्याच्याविरोधात आतापर्यंत कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही, असे यामध्ये म्हटले आहे. चालू वर्षी मार्चमध्ये सालेमने ही माहिती मिळविण्यासाठी अर्ज केला होता.
पोलिसांना खुलाशाचे आदेश
तळोजा येथील कारागृहात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी धमकाविल्याची तक्रार आज गॅंगस्टर अबू सालेमने विशेष टाडा न्यायालयात केली. या तक्रारीवर खुलासा करण्याचे आदेश न्यायालयाने तुरुंगाधिकाऱ्यांना दिले.
गुरुवारी जे जे शासकीय रुग्णालयात तपासासाठी नेत असताना पोलीस निरीक्षक राजकुमार चाफेकर व हवालदार प्रमोद भोसले यांनी गैरवर्तन केले आणि एन्काउंटरमध्ये ठार करण्याची धमकीही दिली, असे विशेष न्या. एस. टी. महाजन यांच्याकडे केलेल्या तक्रारीत सालेमने म्हटले आहे. कारागृहातून रुग्णालयात नेताना बेड्या बांधण्यावरून झालेल्या बाचाबाचीत ही घटना घडली होती. आज दुपारी सालेम न्यायालयात तक्रारीसाठी आला होता. न्या. महाजन यांनी या आरोपांबाबत खुलासा करण्याचे आदेश तुरुंगाधिकाऱ्यांना व चाफेकर यांना दिले आहेत. ऑर्थर रोड कारागृहात मुस्तफा डोसाबरोबर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर सालेमला नवी मुंबईत तळोजामध्ये ठेवण्यात आले आहे. दोन्ही पोलिसांवर कारवाई करण्याबरोबरच मुंबईच्या पोलिसांचीच सुरक्षा न्यायालयात द्यावी, अशा मागण्या सालेमने केल्या आहेत. ऍड राजा ठाकूर यांनी सालेमच्या वतीने बाजू मांडली.
Follow
Us on
Twitter