"राष्ट्रकुल'प्रकरणी ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून चौकशी
वृत्तसंस्था
Saturday, July 31, 2010 AT 12:00 AM (IST)
नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहाराचे आणखी एक प्रकरण एका दूरचित्रवाणी वाहिनीने उघडकीस आणले आहे. संयोजन समितीने ब्रिटनमधील एका कंपनीला हस्तांतरित केलेल्या रकमेसंदर्भात ब्रिटिश अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयाने केंद्र सरकारला याविषयी कल्पना दिली आहे. ही रक्कम तब्बल 2,47,469 पौंड आहे.
या वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार "एएम फिल्म्स यूके लिमिटेड' असे कंपनीचे नाव आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात "क्वीन्स बॅटन रिले'चा कार्यक्रम लंडनमध्ये झाला. त्या वेळी घेतलेल्या सेवेचा मोबदला म्हणून ही रक्कम हस्तांतरित करण्यात आली. ही रक्कम चुकती करण्याच्या प्रक्रियेत ब्रिटिश सरकारच्या महसूल आणि सीमाशुल्क विभागाला गैरव्यवहार आढळून आला. ही सुमारे अडीच लाख पौंड रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहेच, याशिवाय दरमहा 25 हजार पौंड रक्कम "एएम फिल्म्स'च्या खात्यात जमा करण्यात येत आहे. ढोबळ अंदाजानुसार एकूण रक्कम साडेचार लाख पौंड असल्याचे समजते. विशेष म्हणजे संयोजन समितीने मूल्यवर्धित कराची 14 हजार पौंड रक्कम परत मिळावी, अशी मागणी मार्च महिन्याच्या प्रारंभी केली. त्या वेळी हा प्रकार उघडकीस आला. या व्यवहाराची छाननी ब्रिटिश महसूल आणि सीमाशुल्क खात्याच्या गुन्हेगारी चौकशी पथकाने केली. त्यांना त्रुटी आढळून आल्या.
कागदपत्रेच नाहीत
त्यानंतर या खात्याचे मीरा राजाह यांनी भारतीय उच्चायुक्त नलीन सुरी यांना सात जून रोजी एक पत्र लिहिले. त्यात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संयोजन समिती आणि "एएम फिल्म्स' यांच्यात कसलीही निविदा प्रक्रिया, लेखी करार, कागदपत्रांची नोंद झाली नसल्याची कल्पना देण्यात आली आहे, असे वाहिनीने म्हटले आहे.
दोन्ही संस्थांनी दिलेला परस्परविरोधी तपशील, प्रक्रियेचा अवलंब न होणे अशा गोष्टींमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे ब्रिटिश खात्याच्या अधिकाऱ्यांनी 14 जून रोजी भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. त्यानंतर ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त आर. एन. प्रसाद यांनी 14 जून रोजीच क्रीडा मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय यांना एक पत्र पाठविले. ब्रिटिश अधिकाऱ्यांना काय उत्तरे द्यायची, याविषयी पत्राद्वारे सल्ला देण्यात आला. हे पत्र आता अंमलबजावणी संचालनालयाला पाठविण्यात आले आहे. 21 जुलै रोजी या संचालनालयाने चौकशी सुरू केली आहे, असे वृत्त वाहिनीने दिले आहे.
एका माणसाची कंपनी!
"एएम फिल्म्स' ही कंपनी पोशाखांच्या डिझाइनबद्दल सल्ला पुरवीत आहे आणि त्यापोटी त्यांना दरमहा 25 हजार पौंड मिळत आहेत. या संदर्भात उच्चायुक्तालयाचे प्रधान सचिव राहुल श्रीवास्तव यांनी एक अंतरिम प्रत तयार केली आहे. त्यानुसार "एएम फिल्म्स' ही कंपनी एकाच माणसाची आहे. आशिष पटेल ऊर्फ ए. ऍश पटेल हे मालक आहेत. त्यांची संयोजन समितीच्या टी. एस. दरबारी आणि संजय महेद्रू यांच्याशी ओळख करून देण्यात आली, असा तपशील वाहिनीने दिला आहे.
त्याचाही राजीनामा...!
या वाहिनीच्या प्रतिनिधीने लंडनमधील "एएम फिल्म्स'च्या सध्याच्या कार्यालयाच्या परिसरास भेट दिली. त्या वेळी "एएम वेहिकल्स हायर लिमिटेड' अशा नावाची कंपनी असल्याचे आढळले. आशिष पटेल हे संचालक असून, त्यांनी 14 जून रोजीच राजीनामा दिल्याची माहितीही मिळाली.
कलमाडींचा हस्तक्षेप
दरम्यान, दरबारी हे संयोजन समितीच्या "कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी' विभागाचे संचालक आहेत. भारतातील सीमाशुक्ल अधिकाऱ्यांनी एका प्रकरणात त्यांना निलंबित केले होते. मात्र, सुरेश कलमाडी यांनी स्वतः हस्तक्षेप केला. त्यांनी केंद्रीय क्रीडामंत्री एम. एस. गील यांना 29 एप्रिल रोजी एक पत्र लिहिले. त्यानंतर दरबारी यांना पुन्हा नियुक्त करण्यात आले, अशी माहिती या वाहिनीने दिली आहे.
परस्परविरोधी तपशील
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संयोजन समितीने "आरबीएस'च्या 22701021 खात्यात (सॉर्ट कोट 151000) 2,47,469 पौंड रक्कम हस्तांतरित केली. संयोजन समितीने ही रक्कम व्हिडिओ सामग्रीच्या खरेदीपोटी दिल्याचे म्हटले आहे, तर "एएम फिल्म्स'ने कार भाड्याने देणे, तात्पुरती स्वच्छतागृह, अडथळे आणि वीजपुरवठा या सेवेच्या मोबदल्यात मिळाल्याचा दावा केला आहे. हा व्यवहार झालेल्या दोन संस्थांनीच परस्परविरोधी तपशील देणे जास्तच धक्कादायक ठरले आहे.