गैरव्यवहाराचे आरोप भानोत यांनी फेटाळले
वृत्तसंस्था
Saturday, July 31, 2010 AT 12:23 AM (IST)
नवी दिल्ली - लंडनमध्ये गेल्या वर्षी "क्वीन्स बॅटन रिले'दरम्यान झालेल्या कथित गैरव्यवहाराचे आरोप राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संयोजन समितीने फेटाळून लावले.
समितीचे प्रवक्ते ललित भानोत म्हणाले, ""आम्ही सर्व आर्थिक व्यवहार कार्यकारिणीच्या परवानगीनेच केले. रिझर्व्ह बॅंकेची परवानगी घेऊनच परकीय चलनात रक्कम दिली. या मंजुरीनंतरच सर्व व्यवहार झाले. या संदर्भात आमच्याकडे कोणतीही अधिकृत तक्रार करण्यात आलेली नाही. आम्ही लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाशी संपर्क साधला. त्यांनीच मोटारींचे अधिकृत पुरवठादार म्हणून "एएम कार अँड व्हॅन लिमिटेड' कंपनीच्या नावाची शिफारस केली.
उच्चायुक्तालयाने आखून दिलेल्या दरानुसार रक्कम देण्यात आली. एकूण रक्कम 238093.56 पौंड इतकी होती. फिरते व्हिडिओ स्क्रीन भाड्याने घेतल्याबद्दल "एएम फिल्म्स यूके लिमिटेड'यांना 24 ऑक्टोबर रोजी 146868.80 पौंड रक्कम देण्यात आली. कार्यक्रमाच्या ठिकाणी ही सुविधा आम्ही उपलब्ध करावी, असा आग्रह लंडन महानगर पोलिसांनी धरला. त्यामुळे हा व्यवहार करण्यात आला. संयोजन समितीने सर्व व्यवहार लंडनहून दिल्लीला परत येण्यापूर्वी केले.''
दरमहा "एएम फिल्म्स'ला 25 हजार पौंड रक्कम देण्यात येत असल्याचे वृत्त चुकीचे आणि निराधार असल्याचे भानोत यांनी स्पष्ट केले. ""आम्ही ऑक्टोबरमध्येच सर्व रक्कम चुकती केली. त्यानंतर आम्ही मूल्यवर्धित कर परत मागितला आणि ती रक्कम आम्हाला मिळाली. यात कोणताही भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार झालेला नाही. जी काही रक्कम दिली, ती अधिकृतपणे दिली आहे आणि सर्व काही पारदर्शक आहे,'' असे भानोत म्हणाले.