Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

बेळगाव म्हणजे कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र - ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Saturday, July 31, 2010 AT 01:44 PM (IST)
पुणे - बेळगावला सीमाभाग न म्हणता कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र म्हणा, अशी मागणी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे केली.

पुणे श्रमिक पत्रकारसंघाच्या 'क्‍लिक द फोटो जर्नालिझम' या पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मनोगत व्यक्त करताना त्यांनी ही मागणी केली. यावेळी व्यासपीठावर जागतिक ख्यातीचे नामवंत छायाचित्रकार प्रशांत पंजियार, महापौर मोहनसिंग राजपाल, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्‍याम दौंडकर, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत भागवत, श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस संतोष कुलकर्णी, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे कार्यवाह प्रकाश भोईटे आदी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, "पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्‍मीरला आपण पाकव्याप्त काश्‍मीर म्हणतो. तसेच बेळगावलाही कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र म्हटले पाहिजे. बेळगावमध्ये सर्व दुकानांवर मराठी भाषेतील पाट्या लावल्याचे छायाचित्र मला काढायचे आहे.''

'क्‍लिक द फोटो जर्नालिझम' हे पुस्तक प्रकाशित करून पुण्यातील छायाचित्रकारांनी खरंतर इतिहास घडवला आहे. त्यामुळे मी त्यांना इतिहासकार म्हणेन असे सांगून ते म्हणाले, "पुस्तकात अत्यंत विदारक, भयानक अवस्थेतील छायाचित्रे छायाचित्रकारांनी नेमकेपणाने टिपली आहेत. कॅमेरा हातात असल्यावर छायाचित्रकार देहभान विसरून छायाचित्र काढतो. वेळप्रसंगी जिवाची बाजी लावतो. जे समोर दिसते आहे, ते टिपण्यासाठी जिद्द हवी. ही जिद्द ज्याच्याकडे असते. तोच उत्कृष्ट छायाचित्रकार होऊ शकतो.''

सध्या तंत्रज्ञानाचा वेगाने विकास होतो आहे. मात्र, तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने करायचा हे आपण ठरवले पाहिजे. नव्या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करण्याकडे आपला कल हवा, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली.

पत्रकार संघाला संपूर्ण सहकार्य
पत्रकारितेचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. या पार्श्‍वभूमीवर वृत्तछायाचित्रणाचे प्रशिक्षण देणारी संस्था काढण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्‍वासन ठाकरे यांनी यावेळी दिले. तुमच्या सर्व अपेक्षा मी पूर्ण करेन, असे त्यांनी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांना जाहीरपणे सांगितले.
 


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: