नवी दिल्ली - राष्ट्रीय तपास संस्थेतर्फे (एनआयए) समझोता एक्स्प्रेसमधील स्फोटाबरोबरच त्यासंबंधीचा संपूर्ण कट आणि त्याचे मालेगाव, राजस्थान (अजमेर) येथील स्फोटांशी जुळलेले धागेदोरे याचा तपास केला जाईल, असे गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. या तिन्ही घटना आणि हैदराबाद येथील मक्का मशिदीतील स्फोटामागे कोणाचा हात आहे आणि त्यामागे एकच संघटना आहे का, याबाबत तपास अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.
अजमेर, हैदराबाद व समझोता एक्स्प्रेसमधील स्फोटात एकाच प्रकारची मंडळी गुंतली आहेत काय, याबाबतही तपास केला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. चिदंबरम यांनी काश्मीरमधील परिस्थितीबाबतही चिंता व्यक्त केली आणि परिस्थिती सुरळीत झालेली नाही, अशी कबुलीही दिली. सरकार काश्मीरमधील सर्व संबंधितांशी चर्चा करीत आहे आणि फलनिष्पत्तीच्या संदर्भात तिचे स्वरूप गुप्त राखण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
2011 ची जनगणना आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीपुस्तकासंदर्भात ते म्हणाले, की जुलैअखेर 31 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील घरे तसेच कुटुंबांची नोंदणी पूर्ण झाली आहे. लोकसंख्येच्या नोंदणीपुस्तकाची माहितीही जमा करण्यात आली आहे. त्यासाठी देशाच्या किनारपट्टी भागातील गावांमधील लोकांची नोंदणी सर्वप्रथम करण्यात आली होती. त्यानुसार तीन हजार 331 किनारपट्टीच्या गावांतील लोकांची माहिती गोळा करण्यात आली आहे. एक कोटी 19 लाख लोकांची माहिती आणि 67 लाख लोकांच्या हातांचे ठसे जुलैअखेरीपर्यंत गोळा करण्यात आलेले आहेत. किनारपट्टीच्या गावांतील लोकांना फोटो-ओळखपत्रे देण्याचीही सरकारची योजना आहे.
Follow
Us on
Twitter