Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

देशात मॉन्सून सरासरी गाठणार
पीटीआय
Saturday, July 31, 2010 AT 12:30 AM (IST)
Tags: rain,  monsoon,  new delhi,   national

बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार मात्र सरासरीच्या मागे राहण्याची शक्‍यता

नवी दिल्ली -  गेल्या काही दिवसांत देशभरात झालेल्या पावसामुळे मॉन्सूनने बहुतांश ठिकाणी सरासरीमधील तूट भरून काढली आहे. आगामी दोन महिन्यांतही चांगला पाऊस होईल आणि सरासरी भरून निघेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. बिहार, झारखंड, पश्‍चिम बंगाल, पूर्व उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाच्या काही भागांत पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्‍यता आहे.

हवामान खात्याने मॉन्सूनचा मध्यावधी आढावा असून, त्याविषयीची माहिती हवामान खात्याचे महासंचालक डॉ. अजित त्यागी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जून महिन्याच्या अखेरीस देशात सरासरीपेक्षा 16 टक्के कमी पाऊस झाला होता. गेले दहा दिवस झालेल्या पावसामुळे ही तूट भरून निघाली असून, आता ती पाच टक्‍क्‍यांवर आली आहे. ईशान्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पाच्या टोकाला पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे.

पावसाचा एकूण विस्तारही समाधानकारक आहे. देशातील 76 टक्के भागात सरासरीएवढा किंवा जास्त पाऊस झाला आहे. केवळ ईशान्य भारतात हे प्रमाण कमी आहे, अशी माहिती डॉ. त्यागी यांनी दिली.

देशभरातील 28 जुलैपर्यंतचा पाऊस दीर्घकालीन सरासरीपेक्षा एक टक्का जास्त आहे. हवामान खात्याने 98 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला होता, त्यापेक्षा हे प्रमाण जास्त आहे. उद्यापर्यंत हे प्रमाण 100 टक्‍क्‍यांवर जाण्याची शक्‍यता डॉ. त्यागी यांनी व्यक्त केली. गेल्या आठवड्यात झालेला पाऊस 38 टक्के जास्त असल्याने दोन महिन्यांतील तूट मोठ्या प्रमाणात भरून निघाली.

ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात पहिल्या पंधरवड्यापेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे. त्यातून बहुतांश भागात ही पाच टक्‍क्‍यांची तूटही भरून निघेल, असा अंदाज आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा सात टक्के जास्त पावसाची अपेक्षा आहे.

आतापर्यंत ईशान्य भारतात सरासरीच्या 24 टक्के कमी पाऊस झाला आहे. ईशान्येसह बिहार, पश्‍चिम बंगाल आणि झारखंडमध्येही पावसाचे प्रमाण वाढून सरासरीच्या दहा टक्के कमीपर्यंत हे प्रमाण जाईल, असाही अंदाज खात्याने व्यक्त केला आहे.
 
Follow
Us on
Twitter
  

 
प्रतिक्रिया
On 7/31/2010 7:43 AM Dara Buland said:
हवामान खात्याचा फक्त हा अंदाज आहे ठोस अनुमान नाही.
On 7/31/2010 2:34 AM उदय said:
आतापर्यंत ईशान्य भारतात सरासरीच्या 24 टक्के कमी पाऊस झाला आहे. हे जर सत्य असेल तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे कारण तिथे अतिवृष्टीमुळे दर वर्षी जीवन विस्कळीत होते . खरच पाऊस लाभ देणार वाटत या वर्षी . -- उदय


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: