
पुणे - ""प्रत्येक दुकानावर मराठी पाट्या असलेल्या बेळगावचा फोटो काढणे, ही माझी इच्छा आहे,'' अशा भावना शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केल्या.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे काढण्यात आलेल्या "क्लिक- द फोटो जर्नालिझम' या पुस्तकाचे प्रकाशन ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. महापौर मोहनसिंग राजपाल, ज्येष्ठ छायाचित्रकार प्रशांत पंजियार, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत भागवत, विश्वस्त कार्यवाह प्रकाश भोईटे, पत्रकार संघाचे अध्यक्ष श्याम दौंडकर, सरचिटणीस संतोष कुलकर्णी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, ""सीमाभाग म्हणजे "कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र'च आहे. तो मुक्त करण्यास पत्रकारांसह सर्वांनी साह्य करावे.''
छायाचित्रकार हे इतिहासकारच आहेत, असे सांगून ते म्हणाले, ""अनेकदा धोके पत्करून ते नेमका क्षण सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी जिवाचे रान करीत असतात. मी हवाई छायाचित्रण केले आहे. त्याबरोबरच वृत्तपत्र छायाचित्रकारही हाती कॅमेरा आल्यावर देहभान विसरतो. जो देहभान विसरत नसेल, त्याने कॅमेरा हाती घेऊ नये. अशा छायाचित्रांमध्येच जीवनाचे प्रतिबिंब उमटते.''
चांगली "दृष्टी' असलेली मंडळी चांगले राजकारणी ठरू शकतात का, असा प्रश्न विचारला असता, ठाकरे म्हणाले, ""राजकारणी व्यक्तीला दृष्टी नसेल, तर तो सत्तांध होतो आणि स्वतःबरोबरच जनतेचाही विनाश करतो. त्यासाठी राजकारणी व्यक्तीला ही दृष्टी असलीच पाहिजे आणि त्याने आपल्यातील माणूस जिवंत ठेवलाच पाहिजे.''
दरम्यान, ""वेगवेगळ्या माध्यमांच्या आगमनामुळे छायाचित्र पत्रकारितेसमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांचा वेध घेण्याची गरज आहे,'' असे मत पंजियार यांनी व्यक्त केले.
या वेळी ज्येष्ठ छायाचित्रकार प्रकाश करवंदे, राजू शहाडे, अनिल देशपांडे, रूपसिंग, हेमंत दाते, वल्लभ कुलकर्णी, सतीश खळदकर आणि एस. एस. गोडांबे, तसेच प्रभाकर भोसले आणि सुधीर लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक, तर सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. नीलेश राऊत यांनी आभार मानले.
महाराष्ट्राच्या शेजारी 'पाकिस्तान' आहे...?