अनिर्णित कसोटीत धावांचा पाऊस
पीटीआय
Saturday, July 31, 2010 AT 12:00 AM (IST)
पाच दिवसांत 1478 धावा आणि केवळ सतरा फलंदाज बाद
कोलंबो - धावांचा वर्षाव झालेला भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा क्रिकेट कसोटी सामना अखेर अनिर्णित अवस्थेत संपला. काल चौथ्या दिवशीच ही कसोटी अनिर्णित राहणार असल्याचे स्पष्ट झाले होते. या कसोटीत गोलंदाजांची चांगलीच दमछाक होऊन पाच दिवसांत तब्बल 1478 धावा निघाल्या, तर गडी बाद झाले, ते फक्त सतरा.
इशांत शर्मा आणि प्रग्यान ओझा या शेवटच्या जोडीने श्रीलंकेच्या गोलंदाजांना चांगलेच जेरीस आणून भारताला पहिल्या डावात 707 धावांपर्यंत मजल मारून देताना 65 धावांची आघाडी मिळवून दिली.
आज शेवटच्या पाचव्या दिवशी दोन्ही कर्णधारांनी खेळ थांबविण्यास सहमती दिली, तेव्हा श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात 3 बाद 129 धावा झाल्या होत्या. ही कसोटी अनिर्णित राहिल्याने सध्या भारताचे क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राहिले आहे. तीन कसोटींच्या मालिकेत श्रीलंकेने 1-0 अशी आघाडी घेतली असून, तिसरी कसोटी तीन ऑगस्टपासून सुरू होत आहे.
गोलंदाजांना क्वचितच साथ देणाऱ्या सिंहलीज स्पोर्टस क्लबच्या खेळपट्टीवर पाच दिवसांत दोन द्विशतके आणि तीन शतके झळकावली गेली. आज शर्मा आणि ओझा या भारताच्या शेवटच्या जोडीनेही श्रीलंकेच्या गोलंदाजांना अगदी सहजपणे तोंड दिले. कालच्या 9 बाद 669 वरून या जोडीने खेळावयास सुरवात केल्यावर भारताचा डाव उपाहाराला पंधरा मिनिटे बाकी असताना संपला. त्यांच्या खेळामुळे भारताला कसोटीतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या उभारता आली. ऑस्ट्रेलियाविरुद्धची 2004च्या सिडनी कसोटीतील 705 धावसंख्या ही दुसऱ्या क्रमांकावर होती. भारताची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या 9 बाद 726, घोषित ही आहे. गेल्या वर्षी श्रीलंकेविरुद्धच मुंबई कसोटीत त्यांनी ही धावसंख्या उभारली होती.
शर्मा आणि ओझा यांनी आज चेंडूंच्या हिशेबात दहाव्या विकेटसाठी मोठी भागीदारी केली. त्यांनी 174 चेंडूंचा सामना केला. पहिल्या कसोटीत याच जोडीने 92 चेंडूंचा सामना केला होता. आज दिल्हारा फर्नांडोने शर्माला बाद करून भारताचा डाव संपविला.
त्यानंतर श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात परणवितरणा आणि तिलकरत्ने दिल्शान यांनी अर्धशतकी सलामी दिली, परंतु नंतर त्यांची 3 बाद 97 अशी अवस्था झाल्यामुळे कुमार संगकारा आणि समरवीरा यांना सावध फलंदाजी करणे भाग पडले होते.
धावफलक
श्रीलंका - पहिला डाव 4 बाद 642 घोषित
भारत - पहिला डाव
(कालच्या 9 बाद 669 धावांवरून)
इशांत शर्मा झे. संगकारा गो. फर्नांडो 27
प्रग्यान ओझा नाबाद 18
अवांतर 33
एकूण 225.2 षटकांत 707
गोलंदाजी -
धम्मीका प्रसाद 22-2-101-0
दिल्हारा फर्नांडो 31.2-1-116-1
एंजलो मॅथ्यूज 9-1-24-0
सूरज रणदिव 73-16-222-2
अजंता मेंडीस 63-10-172-4
दिल्शान 27-6-56-3
श्रीलंका - दुसरा डाव
थरंगा परणवितरणा झे. लक्ष्मण गो. हरभजन 34
तिलकरत्ने दिल्शान झे. इशांत गो. मिथुन 14
कुमार संगकारा नाबाद 42
महेला जयवर्धने पायचीत गो. सेहवाग 5
थिलन समरवीरा नाबाद 10
अवांतर 24
एकूण 45 षटकांत
3 बाद 129
बाद क्रम - 1-50, 2-73, 3-97
गोलंदाजी -
अभिमन्यू मिथुन 6-1-17-1
इशांत शर्मा 4-0-31-0
वीरेंद्र सेहवाग 9-1-17-1
हरभजनसिंग 13-0-35-1
प्रग्यान ओझा 13-6-13-0