आपल्या मातीतून बाहेर पडून नव्या मातीत रुजण्याचं धाडस ज्यांनी दाखवलं, अशा मराठीजनांची ही 'आकाशभरारी'...या मातीत ते केवळ रुजलेच नाहीत; तर छान बहरले. इतरांनाही आधार बनले. मराठीची ही 'आकाशभरारी' दर गुरूवारी ई सकाळवर प्रसिद्ध होत आहे...
एप्रिल २०१० मध्ये सिम्बायोसिस मध्ये जपान विषयक अतिथी भाषण देताना.निवडलेली वाट माझ्या दृष्टीनं पाहिलं, तर मनाला समाधान देणारी. जपानमध्ये नोकरी करत असण्याचा काळ असो किंवा स्वतःची सेवासंस्था उभी करण्याचा काळ असो...जिद्दीनं काम केलं. जे काम होतं, त्यासाठी माझ्यातलं शंभर टक्के दिलं...मॅकेनिकल इंजिनिअरिंगच्या शिक्षणापासून केलेली सुरुवात आज 'जपान मित्र' संस्थेपर्यंत पोहोचली आहे. जपानमधल्या माझ्या अनुभवाचा फायदा समाजालाही व्हावा आणि चांगला उद्योगही उभा राहावा, या संकल्पनेला मूर्त रूप आले आहे.
शिक्षणानंतर वेगवेगळ्या नोकऱया करताना कॉम्प्युटर्सशी छान जुळून गेलो. सोळा वर्षांच्या करियरमध्ये वेगवेगळी सॉफ्टवेअर्स हाताखालून गेली. ती मी मनापासून शिकलो. त्यावर स्वतः काही प्रयोग करीत राहिलो. स्वतःची अॅप्लिकेशन्स बनवत राहिलो. कंपन्यांमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेन्ट म्हणून काम केलं होतं. तसेच जपानी भाषा हौस म्हणून शिकलो होतो. त्या भाषेमुळेच म्हणा पण आयुष्याला नवं वळण मिळाले १९९८ च्या जूनपासून.
भारतातील पहिल्या श्रेणीतील आयटी कंपनीत मी नोकरीला लागलो. मुंबईतील आमचे पहिले वर्ष स्वप्नवत् गेले. पहिल्याच सॉफ्टवेअर प्रोजेक्ट ऑडिटमध्ये मी कडक शिस्तीची चमक दाखवली अन् गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे चीज म्हणून मला त्या वर्षी प्रमोशन दिले गेले. शिवाय माझी नेमणूक जपान मार्केटिंग साठीच असल्याने मला वर्षभरात चारवेळा जपानमध्ये बिझिनेस व्हिसावर पाठविले गेले. जपानी कस्टमर्सचा हळूहळू माझ्यावर विश्वास बसला.
मार्च २००७ मध्ये जेट्रो कानाझावा चे अतिथी म्हणून इशिकावा प्रांताच्या गवर्नरशी भेट.पुढे कंपनीने मला लॉंग टर्मवर जपानला पाठविण्याचे ठरविले. माझ्यापुढे अनेक यक्षप्रश्न होते. मुलांना घेऊन गेलो, तर शाळा कशी मिळेल ? हवामान, राहणे, खाणे मानवेल का? सौ. शुद्ध शाकाहारी; तिचे कसे होणार? मुलीला जपानी भाषा येत नसल्यामुळे इंग्लिश मीडिअमची महागडी फी असलेली इंटरनॅशनल स्कूल शोधणेसुद्धा भाग होते. जपानी लोक विदेशी लोकांना स्थानिक हमीदार व भरभक्कम डिपॉझिटशिवाय घर देत नाहीत हाही मोठाच प्रश्न होता. कसेबसे एक घर मिळाले अन् मुलीची ऍडमिशन एका महाग स्कूलमधे झाली, त्यासाठीचे सारे पैसे कंपनीकडून ऍडव्हान्स घेउन द्यावे लागले. शिवाय कंपनीने पहिल्या महिन्याचा एक पगारही ऍडव्हान्स दिला. ९८-९९ च्या सुमारास जपानमध्ये खूप कमी भारतीय दिसायचे. जेवणाचं लांब राहिले; जपानी भाषा येत नसेल, तर रस्त्यावर फिरणेही मुश्कील...आता परिस्थिती बदललीय. जपानमध्ये सहजपणे भारतीय दिसू शकतात...
जपानमध्ये रुळत असतानाच्या काळात एक नवीन बॉस कंपनीत जॉइन झाले. त्यांचे पहिलेच वक्तव्य होते, 'अत्रेला इतकी मोठी सॅलरी कंपनीने दिलीच कशी?' तेव्हाच डोक्यात धोक्याची घंटा वाजली. जाण्याच्या फक्त दोन दिवस आधी कंपनीने एक करार करावा लागेल, असे मला सांगितले वा तो पाहताच मी चकीतच झालो. कंपनीने मला जपानला पाठवण्यासाठी जो खर्च सोसला आहे तो भरून यावा म्हणून मी किमान दोन वर्षे जपानमध्ये व्यवस्थित काम करीन, नोकरी सोडणार नाही, तसेच रुपये ५ लाखाचा जामीन देईन व आवश्यक ती रक्कम / घर तारण ठेवेन, दोन जामीनदार सही करून देईन, असा कराराचा मसुदा होता.
ऑक्टोबर २००९ मध्ये पुण्यात आलेल्या जपानी वृत्तपत्र शिष्टमंडळाला घेऊन पुणे विद्यापीठास भेट.मी खूप अस्वस्थ झालो. कंपनीला परिस्थिती माहीत नव्हती असेही नाही. त्यांनीच तर माझे स्वतःचे घर नसल्याने मला ठाण्यात राहायला जागा दिली होती. आयत्या वेळी नातेवाईकही कुणी जामीन कसे देतील ? पण माझ्या वडिलांनी लगेच करार जामीन म्हणून सही करून पाठविला. पण ते निवृत्त असल्यामुळे लिगल डिपार्टमेंटला तो मान्य झाला नाही. मग माझ्या पगारातून ती तारण रक्कम वळती करावी, असा प्रस्ताव नव्या बॉसने दिला. मी म्हणालो, "मी कुठे जपानमधून बायको-मुलांबरोबर पळून जाणार आहे? तारणाची रक्कम कापून घेण्याचे झंझट माझ्यामागे का लावता?" पण माझे कोणीही ऐकले नाही !
पुढील वर्ष आम्ही कसे काढले, हे आमचे आम्हालाच माहीत. आई-बाबांना जपानला या, असे म्हणालो होते. सासूबाई व मेहुण्यालाही बोलाविले होते, त्यातच छोट्या मुलालाही त्याच शाळेत घालायचे होते. खर्चाला ऑक्टोपससारखे असंख्य पाय फुटले होते. तो सारा खर्च सोसत गेलो.
काम मात्र व्यवस्थित अन् नेमाने अन् नेटाने चालू होते. नवीन ऑफिस सुरू केले होते. चॅलेन्जेस खूप होती. मी मेहनतीने चार-पाच नवे कस्टमर्स जोडले. आधीच्या कस्टमर्सकडून नवीन धंदा मिळविला. त्यांना माझे काम एवढे आवडायचे, की मधून मधून जपानला येणाऱ्या दोनही बॉसना ते उघड बोलून दाखवत. त्यावेळच्या कस्टमर्सनी मला अथवा इतर अधिकाऱ्यांना माझ्या कामाविषयी लिहिलेल्या इ-मेल मी अजून जपून ठेवल्या आहेत.
सव्वा ते दीड वर्षाने नवीन बॉसने आणखी एक खेळी खेळली. माझ्या जॉबची रिप्लेसमेंट करायची आणि मला टोकियोपासून दूरच्या साइटवर अकाउंट्स मॅनेजर म्हणून ठेवायचे. ऑफिसमधे एक उच्चशिक्षित; पण अनुभवाने कमी असलेला भारतीय माणूस माझा बॉस किंवा ब्रॅंच मॅनेजर म्हणून ठेवायचा. लिगल ऍडव्हायझरनी त्यावेली कंपनीला चांगला सल्ला दिला. त्यांचे म्हणणे पडले, की जपानचा आणि जपानी भाषेचा फारसा अनुभव नसलेला आणि वर्क परमिट नसलेला माणूस ब्रॅंच मॅनेजर म्हणून आणण्यापेक्षा मलाच पहिला ब्रॅंच मॅनेजर करावे. योग्य वेळी नवीन माणसाला आणून त्याचे वर्क परमिट झाल्यावर मला हटवावे.
मार्केटिंगचा पहिला धडा! १९७८ साली शालेय शिक्षण घेत असताना लक्ष्मी रोड वर उभे राहून भेळ विकताना....! हे सारे पार करेपर्यंत मार्च २००१ उजाडला. सिक्युरिटीचे १२००० डॉलर्स (५ लाख रुपये) तर कंपनीने कधीच जमा केले होते. ब्रॅंचही चालू झाली होती. ऍडव्हान्सचे सारे पैसे फेडले गेले होते. आता कंपनीला माझी गरज नव्हती. एके दिवशी 'तुमची बदली भारतात करीत आहोत' असे नवीन बॉसने कळविले. मी लगेच होकार दिला. प्रचंड पाठपुरावा केल्यावर सिक्युरिटीची रक्कम भारतात येण्याच्या दोन दिवस आधी मिळाली.
नियतीने आम्हाला स्वप्नातून सत्यात, म्हणजे परत भारतात आणले. जपानमध्ये उणीपुरी दोन वर्षे राहिलेल्या माझ्या छोट्या लेकरांना कळलेच नाही, की इतके सुंदर जपान आपण का सोडत आहोत?
कदाचित असा अनुभव एखाद्या कंपनीत एखाद्या कर्मचाऱयाला येतही असेल...माझ्यात सर्वाधिक बदल झाला, तो या अनुभवानंतर ! इथे परत येतानाच ठरवले, की आता नोकरी बास. स्वतःची कंपनी काढू. जपानमध्ये वाढू लागलेल्या नोकरीच्या संधी स्वतः अनुभवल्या होत्या. त्या संधींचा फायदा आपल्या मुलांना झाला पाहिजे, हे मनात होतं. त्यामुळं, जपानमध्ये नोकरी करू इच्छिणाऱयांसाठी मार्गदर्शन करणारी, गायडन्स पुरवणारी संस्था काढायचं ठरवलं. "जपान मित्र" हे त्या संस्थेचं नाव. २००३ मधे चालू केलेला हा घरगुती व्यवसाय आता स्थिरावू पाहत आहे. सुरुवातीला रिसोर्स इंट्रॉडक्शनचं काम करत राहिलो. AFJ, पुणे या NGO संस्थेचा मी सभासद आहे. श्री समीर खळे यांसारख्या मित्रांबरोबर मी पुण्यातील नामवंत व्यक्तींना ओकायामा येथे २००३ सालीच घेउन गेलो. ओकायामा गव्हर्मेंट मधील जपानी लोकांशी असलेल्या माझ्या व्यक्तिगत मैत्रीचे रूपांतर श्री. खळे आणी पुण्यातल्या इतर मान्यवर लोकांच्या प्रयत्नांनी आज "पु ल देशपांडे उद्यानाताल्या ओकायामा पुणे मैत्री उद्यान" या रूपात प्रत्यक्षात आले आहे. त्याचाही सार्थ अभिमान वाटतो, की जपान-मित्र ची "मैत्री" ची संकल्पना ही नक्कीच व्यापक होते आहे.
नंतर, जपान-मित्रतर्फे मी माझे आयटी क्षेत्रातले अनुभव इतरांसोबत शेअर करायला सुरूवात केली. जपानसारख्या ठिकाणी जाताना काय यायला हवं आणि काय पाळायला हवं, हे मी शिकवायला लागलो. तिथल्या संधींची माहिती मिळवून ती महाराष्ट्रातल्या मुलांना द्यायला सुरूवात केली. या कन्सल्टिंगपाठोपाठ भाषांतराची कामंही हाती आली. किंचित स्थिरावल्यावर पुण्यात येणाऱया जपानी नागरीकांना हॉस्पिटॅलिटी सेवा पुरवायला सुरूवात केली. पाहता पाहता हा

व्यवसाय आता बऱ्यापैकी स्थिरावला आहे. नोकरीतल्या अनुभवाचा, जपानमधल्या वास्तव्याचा फायदा इतरांनाही होतो आहे. आतापर्यंत आमच्या संस्थेमार्फत पुष्कळ मराठी मुलांना भारतात अणि जपानमध्ये चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत . मला वाटतं, माझ्या करियरमध्ये हा निःसंशय आनंदाचा भाग आहे...!
श्रीकांत अत्रे यांचा ई मेल -
japanmitra@gmail.com ('आकाशभरारी' मालिकेतील यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी 'ई सकाळ'च्या सर्च बॉक्समध्ये टाईप करा akashbharari)