नवी दिल्ली - पुढील आठवड्यात शनिवारीही (ता. 21) संसदेचे कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारने आज घेतला. मात्र, 27 तारखेपर्यंत चालणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यास सरकारची तयारी नसल्याचेही सांगण्यात येते.
संसदीय कामकाज समितीच्या बैठकीत पुढील आठवड्याची कार्यक्रमपत्रिका निश्चित करण्यात आली. संसदीय कामकाजमंत्री पवनकुमार बन्सल, राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजप उपनेते गोपीनाथ मुंडे, लोकसभेतील प्रतोद रमेश वैस आदी या वेळी उपस्थित होते. आठवड्याच्या सुरवातीचे पाच दिवस कामकाज व शनिवार, रविवार सुटी, या प्रथेला एका आठवड्यासाठी फाटा
देण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. 15 तारखेला स्वातंत्र्यदिनी रविवार असल्याने सरकारी बाबूंसह संसदेची एक सुटी बुडाली आहे. मात्र, पुढील आठवड्यात 21 तारखेपासून सलग चार दिवस संसदेला सुटी मिळणार होती. संसदेपुढील तुंबलेले कामकाज पाहता ती एका दिवसाने रद्द करण्यास सर्वपक्षीय नेत्यांनी मान्यता दिली. त्यामुळे 21 तारखेला शनिवार असला तरी कामकाज सुरू राहील. त्यानंतर ता. 22 (रविवार), ता. 23 (ओणण्म) व ता. 24 (रक्षाबंधन) असे सलग तीन दिवस संसदेला सुटी राहणार आहे.
सोमवार (ता. 16)पासून सुरू होणाऱ्या आठवड्यात जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती, मणिपूरची स्थिती, "सीबीआय'चा कथित गैरवापर व बेकायदा खाणी या विषयांवर चर्चा घेण्याचे निश्चित करण्यात आले. यापैकी जम्मू-काश्मीरबाबतच्या चर्चेची सुरवात भाजप नेते मुरलीमनोहर जोशी करणार आहेत. मणिपूरबाबतच्या लक्षवेधी चर्चेत विजया चक्रवर्ती भाजपची बाजू मांडतील, असे पक्षसूत्रांकडून सांगण्यात आले.
Follow
Us on
Twitter