संसदेचे कामकाज सोमवारीही ठप्प होणार?
सकाळ वृत्तसेवा
Saturday, August 14, 2010 AT 12:30 AM (IST)
नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या घोटाळ्यावर पांघरूण घालून, या भ्रष्टाचारात सुरेश कलमाडी यांनाही अभय देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप करीत भाजपने आता पंतप्रधानांनीच संसदेतून देशाच्या जनतेला उत्तर द्यावे, अशी जोरदार मागणी केली आहे. यासाठी सोमवारी (ता. 16) प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्याचीही नोटीस पक्षाने दिल्याने सोमवारच्या पूर्वार्धात संसदेचे कामकाज चालणे कठीण असल्याचे स्पष्ट झाले आहे.
'या कोट्यवधींच्या घोटाळ्याबाबत जे विरोधी पक्ष इतके दिवस आवाज उठवीत आहेत, त्यांच्या सहनशीलतेचा अंत सरकारने पाहिला आहे; आता बस झाले,'' अशी तीव्र भावना भाजपचे संसदेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, की कॅगसह सगळ्यांनी या भ्रष्टाचारावर प्रकाश टाकला तरी कलमाडी यांना हाकलण्यात सरकारला काय अडचण आहे, हे कळत नाही. राष्ट्रकुल स्पर्धेतील भ्रष्टाचाराबाबत सरकारचे आजवरचे खुलासे अत्यंत असमाधानकारक आहेत. या कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराला जबाबदार असलेले सुरेश कलमाडी यांच्या केवळ हकालपट्टीने भागणार नाही; त्यांच्यावर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई व्हायला हवी व तसे आश्वासन सरकारने स्पष्टपणे दिले पाहिजे. संसदेत या विषयावर भरपूर चर्चा झाली. मात्र, सरकारचा पवित्रा व खुलासे अत्यंत लंगडे आहेत. सत्तारूढ आघाडीच्या नेत्या सोनिया गांधी व पंतप्रधानांनी या विषयावर मौन बाळगले आहे. ते त्यांनी सोडावे व संसदेसमोर वस्तुस्थितीसह यावे. त्यासाठी सोमवारी लोकसभा व राज्यसभेतही प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्याची नोटीस भाजप आघाडीने दिली आहे. पंतप्रधानांनी आता तरी कलमाडी यांची संयोजन समितीवरून त्वरित हकालपट्टी करावी.
भाजप-डावे पुन्हा एकत्र!
प्रस्तावित अणू दायित्व विधेयकापाठोपाठ रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्या माओवाद्यांशी असलेल्या कथित संबंधांना विरोध करण्यावर भाजप व डाव्या आघाडीत एकमत दिसून येत आहे. लालगंज येथील माओवाद्यांच्या सभेत ममता यांची उपस्थिती व भाषण हे डाव्यांनी प्रतिष्ठेचे मुद्दे बनविले आहेत व भाजपनेही त्यावरून संसदेतही डाव्यांशी सुसंगत भूमिका घेतली आहे. ममता यांच्यावर पांघरूण घालणे सरकारने थांबवावे, असे भाजपने म्हटले आहे. माओवादी हिंसाचार देशासमोरील सर्वांत मोठा धोका आहे, असे सांगणाऱ्या पंतप्रधानांनीच ममता प्रकरणावर देशासमोर स्वच्छपणे परिस्थिती मांडावी, अशी मागणी राज्यसभेत आज भाजप नेते अरुण जेटली यांनी केली.