ताण तारकांचा
दिलीप ठाकूर
Saturday, August 21, 2010 AT 08:24 PM (IST)
तणाव हादेखील कामाचाच एक भाग आहे, असं म्हणणं सोपं आहे; पण प्रत्यक्षात त्या तणावाशी सामना करून त्यातून आपला मार्ग काढणे, अस्तित्व टिकवणे हे अत्यंत कठीण अन् आव्हानात्मक काम आहे. त्यात जर चित्रपटसृष्टीसारखी झगमगाटी चंदेरी दुनिया असेल तर या क्षेत्रात आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी रोजच झगडावं लागतं. त्यामुळे तणावाशी सामना करावाच लागतो. आपण मागे पडू यापेक्षा आपले अस्तित्वच हरवून जाईल याची भीती मोठी आहे. चित्रपटसृष्टीतील सध्याच्या तारका या तणावाला कशा तोंड देतात, हे जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न...
आज चंदेरी दुनियेत सर्वच क्षेत्रात संधी खूप असली, तरी स्पर्धाही तितकीच तगडी आहे. कलेच्या क्षेत्रात जाहिरातपट-चित्रपट-चित्रफिती-महामालिकांच्या निर्मितीची "फॅक्टरी' जोरात असली, तरी खरोखरंच सुरळीत व सुरक्षित अशी वाटचाल कोणाची चाललीय? बाहेरून या क्षेत्राचा झगमगाट, चमचमाट, सुखासीनता डोळे दिपवून टाकते. येथे पाऊल ठेवताक्षणीच पैसा-लोकप्रियता अन् सुखासीन आयुष्य निश्चित असा एक गैरसमज आहे. तरी आजच्या यशस्वी कलावंताच्या वाटचालीमागे मेहनत-धडपड-व्यावसायिक निष्ठा-मानसिक कणखरता-बदलत्या काळाचे भान नव्या दिशांची जाणीव योग्य संधीचा वापर अशा अनेक गोष्टी असतात. सरळ रस्ता फार कमी जणांच्या वाट्याला येतो. यशस्वी ठरलेल्यांनाही सतत कसला ना कसला तणाव असतोच. कधी तो व्यावसायिक संधी हुकल्याचा; तर कधी तो खूप खासगी अयुष्याचाही असतो. मग हळूहळू लक्षात येते की, या क्षेत्रातला तणाव हा कदापि न संपणारा विषय आहे. त्याचाच प्रातिनिधिक शोध घेण्याचा हा प्रयत्न...
"संस्कार-वाचन-लेखनातून तणाव दूर'
मृणाल कुलकर्णी पडद्यावर व पडद्यामागच्या आयुष्यातही अत्यंत प्रसन्न असते. तिची कारकीर्द छानच खुललीय-फुललीय म्हणजे तिला कसलाच छोटा-मोठा तणाव नाही, असा अनेकांचा गोड समज आहे. पण मृणालशी वेळोवेळी विविध विषयांवर संवाद होत असताना लक्षात येतं की, तिच्या जडणघडणीत बरेच घटक आहेत व त्यात एक अत्यंत महत्त्वाचा म्हणजे ती आपल्या मुलाला "आई' म्हणून फारसा वेळ देऊ शकली नाही. या तणावाला तिला थोडीथोडकी नव्हे; तर तब्बल पंधरा वर्षे तोंड द्यावं लागलं. ती सांगू लागली, ""आता माझा मुलगा मुंबईत माझ्याचकडे राहून महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्याने या तणावातून माझी सुटका झाली. अन्यथा मी मुंबई व इतरत्र कारकिर्दीत गुरफटलेय अन् मुलगा मात्र पुण्यात आहे याचा सतत ताण माझ्यावर राह्यचा. माझी जन्मभूमी पुणे व कर्मभूमी मुंबई. या ओढाताणीचा ताण सहन करीत मी येथपर्यंत पोहोचले. माझा जन्म, लग्न व आई होणे पुण्यात; पण मुलाला जन्म दिल्यावर माझी कारकीर्द सुरू झाली. त्यामुळे अर्धे मन कॅमेऱ्यासमोर, अर्धे मन पुण्यात असं व्हायचं. माझ्या सासूबाई डॉक्टर असल्यानं त्यांनी माझ्या बाळाचे व्यवस्थित संगोपन केल्यानं माझा बराचसा ताण हलका झाला. बऱ्याचदा मी मुंबई-पुणे "अपडाऊन' करे. एक दिवस सुट्टी मिळाली तरी पुण्यात जाऊन राहत असे. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी माझा नवरा रुचिर व मी ठरवलं, की काही झालं तरी प्रत्येक वर्षी मेमध्ये आपापल्या कामातून सुट्टी घ्यायची अन् विराजसला घेऊन विदेशात "पिकनिक'ला जायचं. हा चांगला तोडगा असू शकत नाही. पण काय करणार? नाइलाज होता. व्यावसायिक पातळीवर मला फारसा ताण कधीच नव्हता. मी "वर्कोहोलिक' असल्यानं कामाचा कधीच कंटाळा वाटला नाही. ऐतिहासिक-सामाजिक-कौटुंबिक-फॅण्टसी अशा विविध प्रकारच्या भूमिका मला छोट्या पडद्यावर साकारायला लाभल्या. मराठी-हिंदी चित्रपटातून कामं करतेय. त्यामुळे माझी कारकीर्द अगदी भरभरून चाललीय. त्याचे शंभर टक्के समाधान मला आहे. जोडीला लहानपणापासूनचे संस्कार, भरपूर वाचन व अधेमधे थोडं-थोडं लेखनही सुरू असल्याने तणाव दूर राहिला. "अरे बापरे, मी हे काय केलं' असे काम माझ्याकडून न झाल्यानं तो तणाव कधी आला नाही. मला खूप काम हवं अन् मीच सगळं करीन असंही मला कधीही न वाटल्यानं त्याही तणावापासून मी दूर राहिले.''
मृणालनं अगदी मुद्देसूदपणे आपल्या असलेल्या-नसलेल्या तणावाचं विश्लेषण केले. त्यातून तिची "मॅच्युरिटी' अन् स्वतःकडे तटस्थपणे पाहण्याची प्रवृत्तीही दिसते.
"ताणातून सहज सुटका नाही...'
दीपाली पानसरेनं अवघ्या दीड-दोन वर्षांच्या कारकिर्दीतच चार मराठी चित्रपट, चार हिंदी मालिका (त्यातील "देवी' बहुचर्चित), अनेक मालिकांचे "प्रोमोज' व चार जाहिरातपट असं काम करताना तिला अलीकडे एकदम तणाव जाणवू लागलाय. "महिनाभर तरी तोंडाला रंग लावायचा नाही' असं तिनं ठरवलंय. ती म्हणाली, ""सहा महिन्यांत मी फक्त 17 दिवस सुट्टी घेतली आणि दिवसाला तब्बल 17-18 तास काम आणि काम, त्यात "देवी'च्या नायगाव येथील चित्रीकरणासाठी येऊन-जाऊन रोज पाच तासांचा प्रवास. तुम्हीच सांगा, तणावातून काही सुटका आहे का? मराठी चित्रपटासाठीच्याच तारखा मालिकांना हव्यात, तर मग "ऍडजस्ट' कसं करायचं हा ताण आणि मराठी चित्रपट सोडावा तर स्वतःला नायिका म्हणून "एस्टॅब्लिश' कसं करायचं हा ताण. तर "देवी' मालिकेत आईची भूमिका साकारतेय. त्यात लहान वयात मोठ्या वयाची भूमिका साकारण्याचा ताण. या साऱ्यातून सुटका करण्यासाठी कुटुंब व मित्र-मैत्रिणीत रमते, फोनवर संपर्कात राहते. तेवढाच दिलासा. थोडी गॅप घेऊन पुन्हा कामाला सुरुवात करताना कामे मिळतील का याचा मला तणाव नसतो. एका हिंदी मालिकेसाठी तीनशे जणी, तर मराठी मालिकेसाठी शंभर जणी स्पर्धेत असतात. अगदी एकेका मराठी चित्रपटासाठी हे प्रमाण 25 पर्यंत जातं. माझा माझ्या गुणवत्तेवर विश्वास असल्यानं त्या स्पर्धेचा ताण माझ्यावर तरी नाही हे माझं नशीब. पण या मनोरंजन क्षेत्रात अनेक प्रकारचे ताण आहेत. त्यातून सहजी सुटका नाही.''
"मेडिटेशन'मधून तणावमुक्ती...
रेशम टिपणीस म्हणजे एक बेधडक व्यक्तिमत्त्व. आत एक आणि बाहेर एक असा प्रकारच नाही. अशा स्पष्टवक्त्यांपासून बरेच जण टरकून असतात. पण या व्यक्तींच्या हातून अशा स्वभावामुळेच चांगल्या संधी हातातून निसटतात. त्यामुळे तणावदेखील वाढतो. रेशम याकडे कोणत्या दृष्टीने पाहते? ती सांगू लागली, ""वयानुसार तणाव व त्यावरचे उपाय या दोन्हींचे स्वरूप बदलते. पूर्वी माझ्याकडे संयम नव्हता. त्यामुळे जराजराशा तणावाने मी "हायपर' व्हायची, चिडायची, भांडायची, "ओव्हररिऍक्ट' व्हायची, कोणत्याही गोष्टीबद्दल पटकन निर्णय घेऊन मोकळी व्हायची. तणावापासून सुटका करून घेण्याचा हा मार्ग नव्हता. हे मला आज समजतेय, हे तेव्हा समजले असते तर? मला वाटतं, तणाव हा प्रकार माणसाच्या स्वभावाशी व संस्कारांशी निगडित आहे. माणसाचं लहानपण कसं घडलं, त्याच्या अवतीभवती माणसं कशी होती, आता त्याची कोणत्या माणसांत उठबस आहे या साऱ्यावर कशाला तणाव मानायचं व तो किती घ्यायचा हे अवलंबून आहे. काही माणसांकडे पाहिल्यावरच समजतं की कितीही अवघड परिस्थिती तो हाताळेल. ही क्षमता त्याच्यावर झालेल्या संस्कारातून आलेली असते. अशी माणसे चुकणार नाहीत याची आपल्याला खात्री असते. म्हणून मी माझ्या मुलांना नेहमी सांगते, की चांगले मित्र मिळवा. आपण चांगल्या लोकात वावरलो की आपणही चांगले होतो. आपल्या चित्रपटसृष्टीत छोट्या-छोट्या गोष्टीवरून तणाव निर्माण होतात. कोणी सेटवर उशिरा येतं, चांगली भूमिकाच हातून जाते. एखाद्या कलाकाराचं वागणं विचित्र असतं, अगदी काहीही. मला याचा खूप त्रास व्हायचा. व्यावसायिक तणावात व्यक्तिगत तणावाची भर पडायची, मी फार "रिऍक्ट' होत शिव्या घालायची. पण आता मी हे सगळं सोडलंय. आता त्या दिवशीचा वाद तिथंच संपवते व नव्या दिवशी नव्या गोष्टीने सुरुवात करते. काही व्यक्तींशी मी पूर्णपणे संबंधच तोडते. त्यांचे आपल्या आयुष्यात काही स्थान आहे असे मानतच नाही. त्यामुळे नव्यानं ताण येत नाही. ताणातून सुटका म्हणून दारू अथवा सिगारेटच्या अतिआहारी जाणं म्हणजे "मैं हार गयी हूं' अशी कबुली देण्यासारखं आहे. मी मात्र तशी नाही. मी "फायटर' आहे. अनेक अडथळे-तणाव ओलांडून येथपर्यंत मी आलीय. अलीकडे मी पोहणे अन् "मेडिटेशन'ला खूप महत्त्व दिलंय. कामानं थकवा आला तरी पोहायला जाते. तेव्हा बरं वाटतं. फार निराशा येईल व भलत्या-सलत्या लोकांच्या सहवासात आपण सापडू हे टाळता येणं गरजेचे आहे.''
"नामस्मरणाद्वारे तणाव करते हलका...'
या मनोरंजन उद्योगातील तणावाचं स्वरूप नक्की कसं असेल, हे सांगता येणं अवघड आहे. कधी नकारात्मक; तर कधी सकारात्मक भूमिका करणाऱ्या माधवी निमकर (आता कुलकर्णी) हिला भेटल्यावर तर हे प्रकर्षानं जाणवलं. ती एका नवीन मुद्द्याकडे लक्ष वेधत म्हणाली, ""आपल्या राज्याच्या तसेच देशाच्या विविध भागांतून अनेक नवे चेहरे मुंबईत मनोरंजन उद्योगात नशीब अजमावण्यासाठी येताहेत. त्यांच्या तणावाचं स्वरूप व प्रमाण अमर्याद आहे. माझंच उदाहरण घ्या, मी रायगड जिल्ह्यातील खोपोली गावची. पण तेथून रोज ये-जा करून एकेक काम मिळवणं व टिकवणं शक्य नव्हतं. अशा वेळी मुंबईत "पेईंग गेस्ट' म्हणून राहणं हाच एक मार्ग उरतो. आई-वडिलांपासून दूर राहताना एक भावनिक दबाव राहतो. तर "पेईंग गेस्ट'चे नियम पाळायचे की नवीन कामासाठी धडपड करायची हा एक दबाव राहतो. रात्री अकरापूर्वी घरी या, विजेचा अतिवापर टाळा, अशा अडथळ्याचा दबाव माझ्यावर राहिला. कारण, हॉटेल वा सायबर कॅफेत गेल्यावर मला मोबाईल "रिचार्ज' करता येई व मग मी निर्मात्यांना फोन करी. अगदी काही चांगले काही खाण्यासाठीही घराबाहेर पडावं लागे. मी तीन वर्षे हा ताण सहन केला. लग्नामुळे या ताणातून सुटका झाली. नवरा समजूतदार असल्यानं सकाळी लवकर निघाले अन् रात्री खूप उशिरा शूटिंगवरून आले तरी त्याची कटकट नसते. अन्यथा एका वेगळ्या तणावातून जात "करियर' करावी लागली असती. त्याला शनिवार-रविवार सुट्टी असते म्हणून मी देखील शक्यतो हे दोन दिवस काम टाळते. पण आपल्या क्षेत्राची कामाची पद्धत पाहता सगळ्यांच्या तारखा जुळवायची कसरत करावी लागते. त्यातून बऱ्याचदा सर्वांवर ताण येतो. पण हे क्षेत्र लहान-मोठ्या ताणतणावांनी भरलंय. हा ताण शाहरूख खान, कतरिना कैफ अशा बड्या स्टार्सनाही एवढं यश मिळवूनदेखील टाळता येत नाही. इथं सतत कामाचे चढ-उतार सुरू असतात. कधी महिना-दोन महिने कामच नसतं, तेव्हा "डिप्रेशन' येण्याची शक्यता वाढते. एकदा तर मी एका चित्रीकरणस्थळी पोचले आणि मला सांगितलं गेलं, की तुझ्याऐवजी दुसरीची निवड करण्यात आलीय. अशा वेळी तणाव वाढतो. पण माझ्या "सीनियर' कलाकारांनी समजावलं की, प्रत्येक कलाकाराच्या बाबतीत असे कधी ना कधी घडलंय. तेव्हा तू निराश होऊ नकोस. वरिष्ठांचा आधार लाभल्यानं अनेकांचा तणाव कमी होऊ शकतो. अथवा आपल्या नशिबात ते काम नव्हतं, असं समजावं. मी अशा वेळी नामस्मरण करते. पण आपल्या क्षेत्रातला सततचा संघर्ष व स्पर्धा पाहता खूप "डिप्रेशन'ची भीती कायम राहते. अगदी आयुष्यभर ही शक्यता पाठलाग करते. पण दारू अथवा सिगारेट हा त्यावरचा मार्ग नाही. त्याची नशा उतरल्यावर काय?''
चित्रपटनिर्मितीचा वेगळाच ताण...
अभिनेत्री म्हणून कारकीर्द सुरू असतानाच आपण चित्रपटनिर्मिती करावी असा अनेकींना ध्यास लागतो. पण तेव्हाच काही जणींना आपल्या बरोबरच्या काही कलाकारांचा "खरा चेहरा' दिसून येतो व ते हबकतात. त्यांच्यावरचा दबावदेखील वाढीला लागतो. मैथिली जावकरचं अगदी तेच झालंय. मोठ्या उत्साहानं तिनं "छबू पळाली सासरला' या चित्रपटाची निर्मिती सुरू केली. पण तिला सतत फार मोठ्या तणावातून जावं लागतंय. तिनं सांगितलं, ""मला दुहेरी ताणाला सामोरं जावं लागतंय. एक तणाव माझ्या चित्रपटातील नामवंत कलाकारांकडून; तर दुसरा माझ्या भागीदाराकडून झाला. कलाकारांनी तर कहरच केला. "तू निर्माती म्हणून उभी राहतेस ना, तुला हवं ते सहकार्य करीन,' असे म्हणणाऱ्यांनी तारखा देण्यापासून अडवणूक सुरू केली. मग बाहेरगावी राहण्याच्या व्यवस्थेवरून आडकाठी वाढवली. रात्री बारा वाजता एक कलाकार म्हणाला, "खिडकीतून हवा तसा "नजारा' दिसत नाही. मला रूम बदलून देच.' वातानुकूलित रूममधून त्याला नेमका कोणता "नजारा' हवा होता हेच समजेना. त्याला म्हटलं सांभाळून घे. यावर तो म्हणाला, "त्यापेक्षा सकाळी मुंबईला जाण्याची व्यवस्था कर.' अगदी लावणी नृत्यासाठीच्या नृत्यकलाकारही शूटिंगची वेळ झाली तेव्हा म्हणाल्या, आमची अजून आंघोळच झालेली नाही. म्हणजे किमान दोन तास वाया जाण्याची भीती वाढली. त्या आठ-दहा जणींची समजूत काढणार कशी सांगा? माझा सहनिर्माता म्हणजे कम्मालच. काही झालं तरी त्यांचे कायम, "घाबरू नका बाई, सगळं ठीक होईल. मी आहे ना...' हा भागीदार सकाळी दहापूर्वी "मोबाईल' सुरूच करीत नसल्यानं त्यानं त्याच्या गावात नक्की काय व्यवस्था केली आहे हे समजेना. म्हणून रोज अकराला चित्रीकरण सुरू व्हायचं तेव्हा समजायचं की रस्त्यावर चित्रीकरणाची परवानगीच घेतलेली नाही. या सगळ्या तणावात शांत राहणं सोपं नसतं. पण चिडायचं तर परिस्थिती आणखी चिघळायची भीती होती. आता मला चित्रपटाला पूर्वप्रसिद्धी मिळविण्याचा ताण आहे.'' मैथिलीनं निर्मितीमधील अडथळ्यांची कल्पना दिली, तेव्हाही ती "टेन्शन'खालीच होती.
अफवांमुळे आला तणाव...
अलका आठल्येकडे यश, प्रचंड चाहतावर्ग व "इमेज' आहे; पण तिलाही चित्रपटनिर्मितीत तणाव टाळता आला नाही. ती म्हणाली, ""आता माझा तिसरा चित्रपट "अग्निपरीक्षा' पूर्ण होऊन 12 नोव्हेंबरला झळकेल. पण मागील दोन चित्रपटांच्या वितरणाच्या अनुभवामुळे मला आतापासूनच "टेन्शन' आलंय. मी चित्रपट नियोजित वेळापत्रकानुसार बनवते, सगळे कलाकार सहकार्य देतात. दिग्दर्शक अनिल सुर्वे मेहनत घेतो व माझ्या प्रेक्षकांचा विचार करून चित्रपट आकार घेतो. पण वितरकांच्या भेटीगाठी सुरू झाल्या की भाड्यापासून चर्चेला सुरुवात करतात. "कमिशन'वर चित्रपट झळकवताना त्यांना टक्केवारी जास्त हवी असते, पुन्हा तिकिटावरच्या करावरून एकवाक्यता नाही. या साऱ्यावरून सतत तणाव वाढतो. काही चित्रपटगृहांशी थेट संपर्क साधला की, ते म्हणतात "झी'चा सिनेमा नसेल तर तुमच्या चित्रपटाला एक-दोन आठवडे मिळतील. या चहूबाजूच्या कोंडीने चिडचिड वाढते. यापेक्षा आपला सिनेमा जत्रेत झळकवणं योग्य वाटतं. एकूण कारकिर्दीत दोन्ही मुलींसाठी जास्त वेळ देता आल्याच्या तणावातून मी गेले आहे. आता सासूबाईंना विस्मृतीचा त्रास असताना त्यांची काळजी घेऊन घराबाहेर पडण्याचे दडपण मनावर असतंच. मध्यंतरी मी पाठीच्या दुखण्याने हैराण असताना माझ्याबद्दल पसरवलेल्या पद्धतशीर अफवांमुळे मी प्रचंड तणावाखाली आले. मी जेमतेम तासभर उभी राहू शकते. माझी रंजनासारखी अवस्था झाली आहे. मी पुन्हा कधीच काम करू शकणार नाही या अफवा कशा पेरल्या गेल्या तेच समजलं नाही. काही निर्मात्यांनी तर "साईनिंग अमाऊंट' परत नेली. मला कळेना की या ताणाला कसं तोंड द्यावं. मला माझे अस्तित्व दाखवून द्यायचे होते. म्हणून मी काही वाहिन्यांवरच्या कार्यक्रमात भाग घेतला. इतरत्र जेथे मिळेल त्या कार्यक्रमातून उपस्थिती लावली व मी ठणठणीत आहे हे दाखवून माझा तणाव हलका केला. अर्थात अनेकांच्या शुभेच्छांनी मला साथ दिली.''
एकटेपणाच्या जाणिवेतून तणाव...
सई ताम्हणकर खूप व्यस्त आहे हे जाणवतं. ती म्हणाली, ""चित्रपट व मालिकांमुळं धावपळ असल्यानं पुरेशी विश्रांती मिळत नसल्याचा माझ्यावर तणाव आहे. कारण काही झाले तरी "फ्रेश' राहिलो तरच पुढील कामात रस घेऊ. म्हणून मग एखाद्या दिवशी सुट्टी मिळाली की भरपूर झोप घेते. या गडबडीत मोबाईल "अपटेड' करणं राहतं, ते करणं राहिलं की उगाच आपल्याबद्दल गैरसमज तर निर्माण होणार नाही ना याचा तणाव असतो. बरं, येथे आपल्या अवतीभवती खूप जण असतात. काही जणींशी माझी चांगली मैत्रीदेखील आहे. तरीदेखील मला वाटतं, येथे काहीजणांचे विशिष्ट "ग्रुप' आहेत. तर काही वेळा आपल्याबद्दल परस्पर काही गोष्टी पसरवल्या जाताहेत. मग मलाच प्रश्न पडतो की, ही व्यक्ती माझ्याशी तर चांगली बोलली तरी ती पाठीमागे अशी का बोलते? मग या साऱ्यातून वाटतं आपण "एकटे' तर नव्हे ना, म्हणजे इथं "आपलं' असं कोणी नाही का आणि मग उगाचंच तणाव येतो. मग मी माझ्या आईशी बोलून "रिलॅक्स' होते.''
"दृष्टिकोनावर तणाव अवलंबून'...
आदिती गोवित्रीकरची मॉडेलिंगची यशस्वी "करिअर' खूप मोठी आहे आणि आता चित्रपटातूनही तिचा वावर वाढलाय. आदिती आपलं "करियर' व दोन मुलांचा सांभाळ अशा दोही आघाड्यांवर कशी असते याचा प्रत्यय येतो. पण तरीदेखील तिच्या क्षेत्रातला तणाव तिच्या दृष्टीने कसा आहे? ती सांगू लागली, ""तुम्ही तुमच्या कारकिर्दीकडे कसे पाहता यावर तुमच्या तणावाचं स्वरूप अवलंबून असतं. सतत खूप काम हवं, मलाच पुढे जायचंय ही मानसिकता खूप दमछाक करते. पण खरी गरज "करिअर', घर व प्रकृती या तिन्ही गोष्टी व्यवस्थित सांभाळणं ही असते. मी "मेडिकल'कडून "मॉडेलिंग'कडं आले तरी शिक्षण पूर्ण केलं. येथे यश लाभले नसते तर माझ्याकडे डॉक्टर म्हणून वावरण्याचा पर्याय माझ्याकडे होता. "मॉडेलिंग'चं "कॉन्ट्रॅक्ट' व "मेडिकल'चे "सेमिनार' या दोन्हींकडं मी सारखंच लक्ष दिलं. अन् पहिल्या मुलीनंतर मुलालाही जन्म दिला. आता माझ्या संसारात थोडा "डिस्टर्बन्स' आलाय. तो मी माझ्या आई-बाबांच्या सहवासानं जाणवू देत नाही. हे सगळंच एकाच वेळी हाताळण्यासाठी मानसिक कणखरता, व्यावसायिक निष्ठा व आपल्या ध्येयाबद्दल लक्ष केंद्रित करणं या गोष्टी हव्यात. वाढती स्पर्धा, वाढते वय या गोष्टी नाकारता येत नाहीत. तेव्हा उत्तम वाचन, चांगले चित्रपट पाहणे हे पर्याय ठरतात. तणावाला दूर ठेवण्याचे खूप चांगले मार्ग आहेत. पण तेव्हा तुम्हाला कोणती "कंपनी' मिळते, तुमचे स्वतःवर किती नियंत्रण आहे या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आपल्या क्षेत्रात पार्ट्या एक महत्त्वाचा घटक असला तरी त्यातच किती रमायचं हे समजायला हवं. मी स्वतः तेथे आवश्यक तेवढा वेळ राहून बाहेर पडते. एका ठराविक काळानंतर आपल्याऐवजी दुसरं कोणी तरी त्या स्थानावर असणार हा निसर्गनियम आहे हे मानलं की तणाव येत नाही.''
"योग्य व्यावसायिक नियोजन हवं'...
दीपाली सय्यद मराठी चित्रपटसृष्टीतील आजची आघाडीची तारका आहे. अशा अभिनेत्रींना आपलं स्थान घसरायची भीती असल्यानं तिच्यावरचा ताणदेखील वाढू शकतो. त्यात भर मराठी तारकांच्या वाढत्या संख्येची! त्यांच्याकडे चित्रपट गेल्यानं प्रचंड असुरक्षित वाटू शकतं. दीपाली याविषयी म्हणाली, ""व्यावसायिक थवा व्यक्तिगत वाटचालीत कितीही आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झली तरी त्यासमोर कणखरपणे उभे राहा, ही वडिलांची शिकवण मी कायम लक्षात ठेवून आहे. त्यामुळे आजूबाजूची परिस्थिती बदलत राहिली तरी मी डगमगत नाही. माझा माझ्या सौंदर्य-नृत्य-अभिनय या गुणावर पूर्ण विश्वास असल्यानं माझ्यापेक्षा ती पुढे गेली याची मला भीती वाटत नाही. बऱ्याच कलाकारांचे तणावाचं हेच ठळक कारण असतं. मग त्यातून वैफल्यग्रस्तता येते. पण सिगारेट व दारू हा त्यावरचा उपाय नव्हे. उलट त्यामुळे तुम्ही तुमचा तणाव हलका करण्याचा प्रयत्न करीत आहात याचा पुरावा देणं आहे. बऱ्याच नवतारका "फॉरवर्ड' आहेत व या क्षेत्रात अशा चंगळवादाला गैर मानत नाहीत. एकीचं वागणं पाहून दुसरीही तशी वागते. पण ताण घालवण्यासाठी त्यापेक्षा योग्य व्यावसायिक नियोजन हवं. चलतीच्या काळातील पैशाची योग्य बचत, येथील जवळपास सगळी नाती कामाभोवतीची असतात याची असणारी जाणीव व आपल्या खासगी आयुष्यालाही महत्त्व देण्याची प्रवृत्ती, या साऱ्यामुळं आपल्यापासून तणाव दूर राहतो. अर्थात इतरांच्या अनुभवातून शहाणं होणं खूप गरजेचं असतं. त्यातून स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास वाढतो. येथे बऱ्याच तारका असुरक्षिततेच्या भावनेनं एखाद्याला आपल्या सहतारकेचा मोबाईल नंबर द्यायलाही टाळतात. कारण त्यामुळे त्या तारकेचे काही भलं झालं तर, याची त्यांना भीती असते. पण मला अशी भीती वाटत नसल्यानं नुकताच एका गरजूला सोनाली कुलकर्णीचा (ज्युनियर) नंबर दिला. तर एक अत्यंत चांगली दुहेरी भूमिकेची पटकथा माझ्याकडे येऊनही प्रत्यक्षात ती भूमिका सोनाली कुलकर्णीकडे (सिनीयर) गेल्याने मी निराश मात्र झाले. पण त्याचा तणाव येऊ न देता आपल्या नशिबात ती भूमिका नव्हती अशी मी वेळीच स्वतःची समजूत घातली. मध्यंतरी माझं वजन खूप वाढल्याचं पसरविण्यात आलं. चार-सहा जणी एकत्र आल्या की अशा गोष्टींची चर्चा होते व ती केवढी तरी पटकन इकडे-तिकडे केली जाते. या क्षेत्रात दुसऱ्याला पद्धतशीर बदनाम करण्याचे खूप प्रयत्न चालतात. अगदी माझ्या "टेलर'पर्यंत ही बातमी पोचली. यावर मी पटकन सावध झाले व "वर्कआऊट'ने आठ किलो वजन कमी करून सडपातळ झाले. याचा मी तणाव घेतला असता तर त्यात माझंच नुकसान होते. वाढवलेल्या गरजा, कमी मानधनात कशा भागवायच्या हाही काहींचा तणाव आहे.''