आँखे नही किडा चाहीए!
सकाळ वृत्तसेवा
Sunday, August 22, 2010 AT 12:00 AM (IST)
महेश बर्दापूरकर
ती स्केटिंग करीत नाचणारी मात्र दृष्टी गमावलेली तरुणी, तर तो डोळ्याला पट्टी बांधून बॉक्सिंग करणारा युवक. दोघंही तसे "लफंगे' असले तरी त्यांचं उद्दिष्ट "परिंदे' होऊन आकाशाला गवसणी घालण्याचं आहे. या दोघांची आगळी प्रेमकथा असलेला "लफंगे परिंदे' हा प्रदीप सरकार दिग्दर्शित चित्रपट खिळवून ठेवतो. नृत्ये व हाणामारी, चांगले संगीत, वेगवान कथानक व संकलन, चांगले दिग्दर्शन व अभिनय यांमुळे चित्रपट बऱ्यापैकी मनोरंजनही करतो. "देखने के लिए आँखे नही, किडा होना जरुरी है,' असा टपोरी "संदेश'ही देऊन जातो.
"लफंगे परिंदे'ची कथा घडते मुंबईत. एका बकाल वस्तीत राहणारा वन शॉट नंदू (नील नितीन मुकेश) दर शुक्रवारी लोकांच्या मनोरंजनासाठी डोळ्याला पट्टी बांधून बॉक्सिंग करतो व पैसा कमावतो. एका फटक्यात प्रतिस्पर्ध्याला लोळवण्याच्या त्याच्या ताकदीमुळे त्याला "वन शॉट' नाव पडलं आहे. बॉक्सिंगच्या निमित्तानं त्याचे गुन्हेगारी जगताशीही संबंध आहेत. याच वस्तीत राहणारी पिंकी पारकर (दीपिका पदुकोण) या युवतीचं स्वप्न आहे नृत्यामध्ये नाव कमावण्याचं. या दोघांच्या समांतर जाणाऱ्या कथा एका अपघातामुळं एकमेकांना येऊन मिळतात. अपघातात अंधत्व आलेल्या पिंकीला नृत्याच्या स्पर्धेत यश मिळवून देण्याचा निर्धार नंदू करतो. बॉक्सिंग करताना डोळ्यावर पट्टी बांधून समोरच्याचा अंदाज घेण्यात निपुण असलेला नंदू आता पिंकीला डोळस बनवण्याचा प्रयत्न करतो. वास, आवाज व स्पर्शाच्या मदतीनं कसं पाहायचं हे शिकवतो, दूरचित्रवाणीवरील एका "रिऍलिटी शो'मधील नृत्याच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तिला प्रेरणा देतो. मात्र, पोलिस पिंकीच्या अपघाताचं प्रकरण धसास लावण्याचा प्रयत्न करू लागताच नंदू अडचणीत येतो. पिंकी व नंदूच्या प्रेमाचं शेवटी काय होतं, हे पडद्यावर पाहायला हवं.
दिग्दर्शक प्रदीप सरकार यांनी ही थोडीशी वेगळी प्रेमकहाणी चांगली हाताळली आहे. मुंबईच्या बकाल वस्तीतील टपोरी भाषा, हाणामारीचे व नृत्याचे प्रसंग मजा आणतात. अंध असल्याचा बाऊ न करणारी नायिका, अलीकडच्या काळातील सर्वाधिक प्रॅक्टिकल खलनायक व पोलिस या चित्रपटामध्ये पाहायला मिळतात. नंदूचं पिंकीला पाहायला शिकवणं व तिनं त्याला नाचायला शिकवणेही जमून आलं आहे. मात्र, नृत्याच्या स्पर्धेत परीक्षकांकडून पिंकी अंध असल्याचा उल्लेखही न होणं, पोलिसांनी हत्येचं गूढ उकलण्यासाठी दाखवलेली अतिरिक्त तत्परता या गोष्टी खटकतात. दीपिका पदुकोणनं अंध नृत्यांगनेची भूमिका छानच साकारली आहे. अंधत्व आल्यानंतर पुन्हा पायावर उभं राहण्यासाठीची धडपड साकारताना तिचा अभिनय बहरला आहे. नील नितीन मुकेश काही प्रसंगांमध्येच बरा वाटतो. गुलकंद, डिझेल, चड्डी अशी नावं असलेले या दोघांचे मित्रही मजा आणतात. स्वानंद किरकिरे यांची गीतं व आर. आनंद यांचं संगीतही श्रवणीय.
चित्रपटातील संवादाप्रमाणंच असे चित्रपट पाहण्यासाठी डोळे नाही, काही तरी वेगळं पाहण्याचा "किडा' असणं गरजेचं आहे. तसं असलं तर वाट पाहू नका...