Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

उद्योगांप्रमाणेच शिक्षण क्षेत्रही परवानामुक्त असावे
माधव गोखले - सकाळ वृत्तसेवा
Tuesday, August 24, 2010 AT 12:30 AM (IST)

कोलंबो (श्रीलंका)   -  भविष्यातील आव्हाने लक्षात घेता शिक्षण क्षेत्रही उद्योग क्षेत्राप्रमाणेच परवानगी आणि परवानामुक्त असावे, अशी अपेक्षा गुरुकुल ऑनलाइन लर्निंग सोल्यूशन्सचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश मेहता यांनी "एज्युकॉन 2010' परिषदेच्या शेवटच्या दिवशी व्यक्त केली.

एक लाखावर भारतीय विद्यार्थी दर वर्षी शिक्षणासाठी भारताबाहेर जातात, त्यावर जवळपास अडीच कोटी डॉलर खर्च होतात. ही रक्कम खूप मोठी असल्याचे सांगून श्री. मेहता यांनी भारतातील उपलब्ध मनुष्यबळाची गुणवत्ता सुधारण्यासाठी तातडीचे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. मनुष्यबळाच्या उपलब्धतेच्या बाबतीत भारत नजीकच्या भविष्यात चीनसह जगातील अन्य देशांना मागे टाकेल, असे मनुष्यबळ विकास क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटते. त्यामुळे "सर्वांसाठी शिक्षण' ही संकल्पना आता शिक्षण क्षेत्र खुले करून अमलात आणणे आवश्‍यक आहे. भविष्यात भारताचे मनुष्यबळ 13 कोटींवर पोचेल, त्या वेळी चीन अडीच कोटींच्या आसपास आणि अन्य देश त्याच्याही मागे असतील. या मनुष्यबळाला आपण योग्य कौशल्ये शिकवू शकलो, तर आपल्याला त्याचे चांगले फायदे मिळू शकतात, असेही श्री. मेहता यांनी सांगितले.

श्री. मेहता यांनी मांडलेल्या मुद्द्याला कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष डॉ. दीपक शिकारपूर यांनीही दुजोरा दिला. भारतात उपलब्ध असणाऱ्या प्रचंड मनुष्यबळाला आपण कालसुसंगत अशी आवश्‍यक कौशल्ये देऊ शकलो नाही तर हे मोठे मनुष्यबळ भविष्यातील एक मोठी समस्या ठरू शकते, असे ते म्हणाले. योग्य कौशल्ये हेच उद्याच्या जगातील चलनी नाणे असेल, असे सांगून श्री. शिकारपूर यांनी शिक्षणाधिष्ठित वातावरण निर्माण करण्यावर भर दिला.

इंटरनेट आणि बदलत्या संज्ञापन तंत्रांमुळे शिक्षण देण्याच्या संकल्पनेत मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे भविष्यातील विद्यापीठे पारंपरिक रचनेच्या पलीकडे जातील, असे मत डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड टेक्‍नॉलॉजीचे कुलगुरू प्रा. ललित पटनाईक यांनी व्यक्त केले. ई-लर्निंगच्या कल्पनेमुळे शिक्षण हे स्थळ, काळ आणि वेळेच्या पारंपरिक कल्पनांच्या पलीकडे नेणे शक्‍य असल्याचे ते म्हणाले.

ई-लर्निंगचे फायदे पोचविण्यासाठी बदल स्वीकारण्यावर आणि काही जुन्या कल्पनांचे अडथळे पार करण्यावर विद्यासागर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. स्वपनकुमार प्रामाणिक यांनी आपल्या सादरीकरणात भर दिला.

"एज्युकॉन 2010'च्या शेवटच्या दिवसाच्या पहिल्या सत्रात "विद्यापीठ आणि उद्योग क्षेत्राचे परस्पर सहकार्य' या विषयावर पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. अनिल सहस्रबुद्धे, रायगड जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजू मानकर आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. कमल शर्मा यांनीही सादरीकरण केले. श्री. मेहता यांच्यासह गेट थ्रू गाइड्‌सचे उपाध्यक्ष उल्हास बोधनकर या सत्राच्या अध्यक्षस्थानी होते.

रांची विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ए. ए. खान, कल्याणी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. आलोक बॅनर्जी, सूर्यदत्ता ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, बिर्ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेश चंद्रा, महाराष्ट्र सरकारच्या तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक अजित थिटे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीचे संचालक ब्रिगेडिअर (निवृत्त) एस. के. लाहिरी, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍निकल एज्युकेशनचे संचालक डॉ. पराग कालकर, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीचे संचालक प्रा. ए. के. सिंग, महात्मा गांधी मिशन ट्रस्टचे प्रकल्प संचालक रणजित कक्कर आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे बी. डी. सिंग यांनीही चर्चेत भाग घेतला.

सध्याचे उच्चशिक्षण म्हणजे तीन पायांची शर्यत
दीपक शिकारपूर यांनी भारतातील सध्याच्या उच्चशिक्षणाला तीन पायांच्या शर्यतीची उपमा दिली. सध्याचे उच्चशिक्षण म्हणजे एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्यांना विसाव्या शतकातील शिक्षक आणि एकोणिसाव्या शतकातील प्रशासनाच्या मदतीने नव्या आव्हानांसाठी तयार करण्याचा प्रयत्न आहे. श्री. शिकारपूर यांनी भविष्यात पदव्यांनाही कालमर्यादा असावी, असेही मत व्यक्त केले. सतत बदलणाऱ्या ज्ञानव्यवस्थेत, "व्हिसा'सारखे ज्ञानाचे प्रमाणपत्रही अद्ययावत करण्याची यंत्रणा विद्यापीठांनी राबविणे आवश्‍यक ठरणार आहे, असे ते म्हणाले.
 

 
प्रतिक्रिया
On 25/08/2010 11:25 Ganesh patole said:
Shikshanacha darja aani paddhat sudhara aadhi.
On 8/24/2010 8:00 PM Sanjay Kale said:
'बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी'
On 8/24/2010 9:09 AM Prakash Ghatpande said:
दीपक शिकारपूर यांची प्रतिक्रिया अगदी अचुक आहे. २००७ मधे ईएमआरसी मधे एज्युसॆट द्वारा ई ग्रंथालय या विषयावरील ई लर्निगंचा अनुभव मला अगदी आठवला. युद्धकैंद्यांनी केलेल्या कामासारखा तो राबवला होता. समीरण वाळवेकर संचालक यांना मी भेटलो होतो. पण माणस यंत्रणेत गेली की त्याचा घटक बनतात. व्यास चॆनेल वर असलेला शेक्षणीक कार्यक्रम केबल ओपरेटर दाखवत नव्हते.त्यामुळे ई लर्निंगचा उत्साहच निघुन गेला आजतागायत तो परत आला नाही
On 8/24/2010 7:31 AM vijay said:
शिक्षण हाच एक उद्योग झाला आहे तर मग हरकत काय ?


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: