मुंबई - सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाला भेट नाकारल्याबद्दल शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्यावर टिका केली आहे.
मराठी भाषकांबद्दल आपुलकी आणि अभिमान असलेल्या भाजप नेत्यांनी येडियुरप्पांना धडा शिकवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिवसेना फक्त प्रादेशिक प्रश्नांवर संघर्ष करते अशी टिका करणाऱ्यांचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, महाराष्ट्रातील भाजपच्याच नेत्यांना भेट डावलणाऱ्या येडियुरप्पांचा बुरखा या लोकांनी फाडला पाहिजे.
महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची भेट घेवून त्याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात येणार असल्याचे भाजपने गेल्या 23 तारखेला जाहीर केले होते. कोल्हापूर येथे झालेल्या पक्षाच्या दोन दिवसीय बैठकीत तसा ठरावदेखील मंजूर करण्यात आला होता.
सर्वोच्च न्यायालयात असलेला सीमाप्रश्न निःपक्षपातीपणे हाताळला जावा यासाठी कर्नाटकातील नेते असलेले केंद्रीय कायदा मंत्री वीरप्पा मोईली यांना पदावरून दूर करण्याची मागणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वीच केली आहे.
Follow
Us on
Twitter