Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावर भाजप, शिवसेनेचा आक्षेप
सकाळ न्यूज नेटवर्क (snn.nsk@esakal.com)
Friday, August 27, 2010 AT 12:30 AM (IST)

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी काही हिंदुत्ववादी संघटनांकडून होणाऱ्या दहशतवादी कृत्यांना "भगवा दहशतवाद' असे संबोधल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराप्रमाणेच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनाही चवताळली आहे. संतप्त शिवसेना खासदारांनी लोकसभेत जोरदार गोंधळ घातला. "चिदंबरम हाय हाय' अशा घोषणा देत शिवसेनेने सभागृह दणाणून सोडले आणि सभात्याग केला. भाजपनेही "गृहमंत्र्यांनी उद्यापासूनच या शब्दाचा वापर थांबवावा. त्याचा पुनरुच्चार केल्यास देशात तीव्र प्रतिक्रिया उमटेल' असा इशारा दिला.

देशातील अंतर्गत सुरक्षेवरील पोलिस प्रमुखांच्या बैठकीत चिदंबरम यांनी धार्मिक कट्टरतेतून देशभरात वाढलेल्या दहशतवादी घटनांचा उल्लेख केला होता. मालेगाव, ठाणे, पणजी येथील बॉंबस्फोटांचे उदाहरण देऊन "भगवा दहशतवाद' वाढत असल्याचेही ते म्हणाले होते. त्यांच्या या शब्दप्रयोगामुळे, शिवसेना खासदारांनी चिदंबरम यांच्या विरोधात घोषणा देऊन लोकसभेचे कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला. "गृहमंत्र्यांनी हिंदुत्वाचा अपमान केला असून, त्यांनी जबाबदारीने शब्द वापरावेत. या शब्दाबद्दल हिंदूंची माफी मागावी' अशी मागणी केली. प्रश्‍नोत्तराचा तास संपल्यानंतर शून्य काळाला प्रारंभ होताच चंद्रकांत खैरे आणि आनंदराव अडसूळ यांनी "सामना'ची कात्रणे झळकावत चिदंबरम यांच्या माफीची मागणी केली. सुभाष वानखेडे, गणेश दुधगावकर, गजानन बाबर यांनी "चिदंबरम मुर्दाबाद' अशा घोषणा देत अध्यक्षांपुढील मोकळ्या जागेत धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी त्यांना थांबवून जागेवर जाऊन बोलण्यास सांगितले. भाजपच्या खासदारांनीही शिवसेनेला पाठिंबा देत "मुस्लिमांचे लांगूलचालन बंद करा' अशा घोषणा देण्यास सुरवात केली. चिदंबरम यांच्या माफीची मागणी करूनही सरकारकडून उत्तर न आल्याने "चिदंबरम हाय हाय' म्हणत सभात्याग केला.

काश्‍मीरमधील सद्यःस्थितीबद्दल झालेल्या अल्पकालीन चर्चेदरम्यान भाजपचे नेते मुरलीमनोहर जोशी यांनी भगव्या दहशतवादाचा मुद्दा काढला. भगवा रंग देशाच्या प्राचीन परंपरेशी जोडलेला आहे. आपल्या तिरंग्यामध्ये भगवा रंग अग्रभागी वर आहे. गृहमंत्र्यांच्या विधानाने जगभरात चुकीचा संदेश जाण्याची भीती आहे, असे ते म्हणाले. स्वातंत्र्यानंतर देशाचा ध्वज कोणता असावा, हे ठरविण्यासाठी कॉंग्रेसने नेमलेल्या समितीने भगव्या ध्वजाची शिफारस केली होती, अशी आठवणही श्री. जोशी यांनी करून दिली. "कृपा करून असे अपशब्द बोलू नका. अन्यथा, देशात वाईट प्रतिक्रिया उमटेल', असा इशारा त्यांनी दिला. कदाचित चिदंबरम यांना तशीच प्रतिक्रिया अपेक्षित आहे असे यावरून दिसते, असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, या मुद्यावरून भाजप-शिवसेनेने रान उठवले असले तरी कॉंग्रेसने मात्र "गृहमंत्र्यांच्या वक्तव्यातील अलंकारिक भाषा नव्हे, तर त्यातील मूलभूत मुद्याकडे लक्ष देण्याची गरज आहे', अशा सांगत सारवासारव केली आहे. तसेच या मुद्यावरून दोन्ही पक्षांचा आरडाओरडा म्हणजे "चोराच्या मनात चांदणे' असल्याचे दर्शविते, असा टोलाही लगावला आहे. दैनंदिन वार्तालापामध्ये पक्षप्रवक्ते मनीष तिवारी यांनी चिदंबरम यांची बाजू घेतली. गृहमंत्र्यांचा दिशानिर्देश देशातील अति उजव्या विचारसरणीच्या दहशतवादाकडे होता. अशा संघटनांशी संबंध असणाऱ्यांवर नजर ठेवणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे हेच त्यांच्या वक्तव्यात स्पष्ट होत असल्याचा दावाही कॉंग्रेस प्रवक्‍त्याने केला.
प्रतिक्रिया
On 8/27/2010 6:11 PM किशोर जानिरे said:
यांच काय जातंय ए सी रूम मध्ये बसून बोलायला. रस्त्यावर कापला जातो, जळतो तो सामान्य माणूस. पण सामान्य माणसाचं कुणाला घेण पडलंय?
On 8/27/2010 6:04 PM किशोर जानिरे said:
दहशतवाद हि एक विकृत मनोवृत्ती आहे. त्याला जाती-धर्माची झालर लावायची काहीही गरज नाहीये. पण मूर्खांना सांगणार कोण?
On 8/27/2010 5:19 PM shailesh devasthali said:
सरकारी यंत्रणांना काही तपास जमत नाही..मग कोणाकडे तरी बोट दाखवायचे म्हणून असा चाललाय...मागे नाही का..सगळी यंत्रणा त्या मालेगाव स्पोतासाठी साध्वी च्या मागे हात धुवून लागले आणि याचा फायदा घेऊन पाक अतिरेकी २६/११ करून गेले.. भारताची सध्याची वाटचाल पाहता भारताने अमेरिकेचे मांडलिकत्व स्वीकारले आहे असे दिसते..
On 8/27/2010 10:21 AM mandar said:
एकदा गृहमंत्र्यांनी हिरवा दहशतवाद ह्याबद्दल पण बोलावे . पण तसे केले तर मतांची बेगमी होणार नाही .किती हे लागुलचालन.
On 8/27/2010 9:28 AM Swanand said:
कुठला हि खटला देखील न करता हिंदूंना त्रास देण्यापेक्षा तिवारी म्हणतो त्याच न्यायाने हिरवी कीड असा शब्द प्रयोग कॉंग्रेस करेल का?
On 8/27/2010 9:02 AM uday gokhalay said:
धर्मांधता आणि त्यानुसार दंडेली & धाक-दडपशाही कोणी एका संप्रदायाची मक्तेदारी नाही, ती एक मानसिक प्रवृत्ती / विकृती आहे आणि ती खोल विचार करण्याची वानवा असेल तर अधिकच उफाळून येते. जशास तसे ही नैसर्गिक प्रकृती आहे पण ती काबूत ठेवली नाही तर काय भयंकर संहार होतो ते लक्ष्यात घेतले पाहिजे - हे पुढारी & नेत्यांचे आद्य कर्तव्य आहे. भावना भडकावणे खूप सोपे असते पण त्याचे परिणाम पुढाऱ्यांना कधीच भोगायला लागत नाहीत. "आप आगे चलो हम आपके पीछे है". वा रे पुढारी आणि त्यांचे तलवारीनचे खणखणने.
On 8/27/2010 7:55 AM Akshay Mahajan said:
हे खरं आहे कि काही तुरळक बॉम्बस्फोट हिंदू ंकडून देखील झालेले आहेत. पण त्याचे स्वरूप प्रतिक्रियात्मक असेच होते. आणि याला जागतिक परिमाण तर मुळीच नाही. पण मुस्लीमांकडून होणार्या बॉम्बस्फोटांना जागतिक परिमाण आहे. हिंदू मुळातच दहशतवादी नाहीत, काही तुरळक अपवाद सोडल्यास !
On 8/27/2010 5:27 AM PG DEODHAR said:
काल प्रेस conference मध्ये व्हाईट house चा प्रतिनिधी ला हा प्रश्न विचारला गेला कि भारताचा गृह मंत्र्याने साफ्रान दहशत वाद बद्दल जे वक्तव्य केले आहे ते तुम्हाला माहित आहे का? व असल्यास त्या बद्दल आपले काय मत आहे? या चा अर्थ आता भगवा दहशत वाद हा शब्द जागतिक झाला आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: