त्वचा, केस आणि नखे
डॉ. ह. वि. सरदेसाई
Friday, August 27, 2010 AT 11:07 AM (IST)
केसांचा रंग मेलॅनिनवर अवलंबून असतो. मेलॅनिन नसल्यास तेथे हवेचा एक बुडबुडा तयार होतो. त्यामुळे पांढरा रंग जाणवतो. केस पिकलेला दिसतो. नखात असे झाले, की नखात पांढरा डाग दिसतो.
केस आणि नखे आपल्या त्वचेतील पेशीतूनच उत्पन्न होतात. ढोबळमानाने आपल्या त्वचेचे तीन थर मानले जातात. सर्वांत वरचा त्याला एपिडर्मिस (Epidermis) म्हणतात. मधला ज्याला डर्मिस (Dermis) म्हणतात आणि खालचा त्याला सबक्युटेनियस टिश्यू (Subcutaneous Tissue) म्हणतात. नखे, केस या एपिडर्मिसमधील पेशींचेच जरासे वेगळे रूप असते. त्याचप्रमाणे तळहातावर आणि तळपायावर पडणारे "पट्टे' आणि त्वचेवर उमटणारे मस (वॉर्टस् - - Warts) हेदेखील एपिडर्मिसच्याच पेशींनी बनलेले असतात. या तीन थरांचे सर्व शरीरावर एक प्रभावी आच्छादन बनते. या आच्छादनामुळे बाहेरचे जिवाणू, विषाणू व अन्य किटाणू शरीरात प्रवेश करू शकत नाहीत.
शरीरातील पाणी बाहेर सांडू शकत नाही किंवा पोहताना बाहेरचे पाणी शरीरात प्रवेश करू शकत नाही. जीवनसत्व "ड' त्वचेत तयार होते व पुरुषत्वाला जबाबदार असणारे टेस्टास्टेरॉन (Testasterone) हे संप्रेरक वृषणात (Testes) मध्ये तयार झाले तरी त्वचेत त्याचे परिणामकारी रेणूत रूपांतर होते. त्वचेमधील रक्तवाहिन्या आकुंचित पावल्या की रक्तदाब वाढतो. त्यांचे प्रसारण झाले की रक्तदाब उतरतो (Arterioles). याच रक्तवाहिन्याचे आकुंचन झाल्याने शरीरातील उष्णता बाहेर पडत नाही, उलटपक्षी त्यांचे प्रसरण झाल्याने शरीरातील नको असणारी उष्णता बाहेर टाकली जाते. यामुळे शरीराचे तापमान कायम ठेवण्यात त्वचेचे कार्य बहुमोलाचे ठरते. त्वचेतील मज्जासंस्थेच्या स्वीकारकांमुळे (Receptors) मेंदूकडे महत्त्वाची माहिती पुरवली जाते. स्पर्श, वेदना, उष्णता, थंडपणा इत्यादी संवेदना त्वचेतील स्वीकारकांकडून मेंदूकडे जातात.
त्वचेचा वरचा थर एपिडर्मिस हा अगदी पातळ असतो. या भागाला रक्तपुरवठा होत नसतो. त्वचेच्या खालच्या भागातून या भागाला सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा झिरपत असतो. साप कात टाकतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या एपिडर्मिसच्या वरच्या मृत पेशी बाहेर टाकत असतो. दररोज कोट्यवधी पेशी एपिडर्मिसच्या खालच्या भागात तयार होतात व बाहेरच्या बाजूला ढकलल्या जात असतात. या प्रवासात त्यांच्या आतील जेलीसारख्या पदार्थाचे रूपांतर एका कठीण पदार्थात होऊ लागते. या पदार्थाला कॅरॅटिन (Keratin) म्हणतात. या कॅरॅटिनच्या थरातील पेशी सपाट असतात व मृत असतात. बाहेरच्या वातावरणातील उष्णतेत, कोरडेपणात व इतर जीवनाला घातक घटकांत जिवंत पेशी जगू शकणारच नाहीत. आपण आंघोळ करताना लक्षावधी पेशी घासल्या जातात. आपण कपडे घालतो त्यांच्या घर्षणामुळेदेखील या पेशी पडून जातात. सामान्यपणे दर 27 दिवसांनी हा एपिडर्मिसचा थर नव्याने तयार होतो. जेथे घर्षण जास्त होते तेथील एपिडर्मिसमध्ये नव्या पेशींचे उत्पादन अधिकाधिक होते. एपिडर्मिस जाड होते. याच कारणामुळे तळपाय व तळहात येथील त्वचा शरीराच्या इतर भागापेक्षा अधिक जाड असते. त्वचेच्या अशा जाड होण्याने तळहातावर पट्टे पडतात आणि तळपायांवर कुरुपे होतात.
त्वचेचा सर्वांत खालचा थर - सबक्युटेनियस भाग - शरीरातील भागांना धक्के बसण्यापासून वाचवतो (Shock Absoption funaction) शिवाय यात मेदाच्या पेशी भरपूर असल्यामुळे शरीराभोवती एक उष्णतेच्या प्रवाहाला प्रतिबंधक असे एक लपेटणे निर्माण होते. या मेदाच्या पेशींच्या साठ्यामुळे शरीराला गोलाई येते. शरीरावर दिसणारी पुष्टता आणि स्त्री-देहाची कमनीयता या थरामुळेच येते.
त्वचेचा मधला थर - डर्मिस - महत्त्वाची कार्ये करीत असतो. याच्या पेशींच्या घट्ट विणीमुळे तो अभेद्य असतो व त्यातील कोलॅनन पेशीमुळे त्याला स्थिती-स्थापकत्व (Elastic) प्राप्त झालेले असते. या थरात रक्तवाहिन्या, मज्जातंतूच्या शिरा, ग्रंथी यांचे एक घनदाट जाळे असते. या तीन घटकांचे प्रमाण वेगळ्या जागी वेगळे असते; परंतु सर्वसामान्यतः एका चौरस सेंटिमीटर त्वचेत 100 घामाच्या ग्रंथी असतात. चार मीटर लांब मज्जातंतू असतात, शेकडो स्वीकारक असतात. 10 केसांची मुळे असतात, 15 तेलासारखा सीबस तयार करणाऱ्या सेबेसियस (Sebaceous Gland)ग्रंथी असतात आणि एक मीटर रक्तवाहिन्या असतात. या रक्तवाहिन्या रुंदावल्या, की त्वचा लालसर दिसू लागते. हवा गरम असताना थोडे जरी श्रम झाले तरी असा परिणाम लगेच दिसू लागतो. या रुंदावलेल्या रक्तवाहिन्यांमुळे शरीरातील उष्णता बाहेर टाकण्याचे कार्य होऊ लागते. थंड वातावरणात उलटे घडते. या रक्तवाहिन्या आकुंचित पावतात. आपल्या भावनांचादेखील या रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. राग आला की चेहरा लाल होतो कारण या भागातील रक्तवाहिन्या रुंदावतात, भीती वाटली तर चेहरा पांढराफटक पडतो.
लाज वाटण्याने मुग्धेच्या चेहऱ्यावर येणारी गुलाबी छटा याच कारणाने येते. उष्णतेवर प्रभावी ताबा घाम येण्याने मिळतो. आपल्या दोन स्क्वेअर मीटर त्वचेमध्ये वीस लक्ष घामाच्या ग्रंथी असतात. या ग्रंथी त्वचेत डर्मिस थरात असतात. प्रत्येक ग्रंथीला सव्वा मीटर लांबीची नलिका असते, संपूर्ण त्वचेत या नलिकांची लांबी नऊ किलोमीटर भरते. या घामाच्या ग्रंथींचे दोन प्रकार असतात -
1) एस्सरीन (Ecerine) अथवा एक्सोक्राईन (Exocrine) ग्रंथी - या सर्व शरीरावरील त्वचेत असतात. तळपाय, तळहात, वरचा ओठ आणि कपाळ येथील त्वचेत त्या विपुल प्रमाणात असतात. अशा विपुलतेचे कारण उत्क्रांतीतून सापडते. जेव्हा आदिमानवाचे पूर्वज (एप्स् - मोठ्या आकाराचे वानर) वाघासारख्या हिंस्र पशूला पाहत असत तेव्हा आपला जीव वाचवण्यासाठी त्यांना भरपूर झाडावर उंच चढणे हा एकच मार्ग उपलब्ध होता. असे चढताना झाडाचा बुंधा व फांद्या यांना घट्ट धरताना व भरभर वर चढताना तळहात, तळपाय, नाक व कपाळ येथील भाग घासला जाई. तेथे उष्णता निर्माण होई व तो भाग लवकर थंड व्हावा व तेलासारखा पदार्थ या भागावर पसरावा या दृष्टीने तेथे या ग्रंथी विपुल असणे आवश्यकच होते. आता कोट्यवधी वर्षांच्या उत्क्रांतीनंतर या प्रकारच्या ग्रंथींचे या भागात काम राहिलेले नाही; परंतु काही व्यक्तींमध्ये ही स्थिती टिकून असलेली दिसते. याला ऍटॅव्हेस्टिक कॅरॅक्टर (Atavastic Charactor) म्हणतात. कोणतेही संकट आले तरी तळहात, तळपाय, वरचा ओठ व कपाळ घामाने थबथबते. जरासे तिखट जेवण घेतले तरी ही प्रवृत्ती दिसू शकते.
2) ऍपोक्राईन (Apocrine) ग्रंथी - काखा व ओटीपोटाच्या खालच्या भागातील केसांच्या मुळाजवळ या ग्रंथी असतात. यातून काही विशिष्ट गंधयुक्त रेणू (फ्रेमोन्स) स्रवले जातात. शारीरिक अथवा मानसिक तणावाच्या वेळेस हे स्रवणे वाढते.
या रेणूंचा गंध इतर व्यक्तींना (सहसा भिन्नलिंगी) आकर्षित अथवा परावर्तित करतो. एखादी व्यक्ती आपल्याला प्रथमदर्शनीच आवडू लागते (प्रथमदर्शनीचे प्रेम) याचे कारण या फ्रेमोन्स रेणूत असावे, असा शास्त्रज्ञांचा तर्क आहे.
या घामाच्या ग्रंथींखेरीज इतर दोन प्रकारच्या ग्रंथी डर्मिसमध्ये असतात -
1) सेबेसियस ग्रंथी (Sebaceous (Oil) Glands) … त्वचेतील केसांच्या मुळापासून केस निर्माण होतात ते एखाद्या कूपनलिकेप्रमाणे असणाऱ्या नलिकेतून त्वचेच्या बाहेर येतात. या नलिकेत या ग्रंथी असतात. पौगंडावस्थेत या ग्रंथी खूपच उद्दीपित होतात याचे कारण काही अन्नग्रंथींचे स्राव या वयात स्रवले जाऊ लागतात. या तेलासारख्या द्रव्यामुळे त्वचा तेलकट होते व तारुण्य-पीटिका (अलपश) चेहऱ्यावर येऊ लागतात.
2) सेरुमिनस ग्लॅण्ड्स (Ceruminous Glands) या कानाच्या त्वचेतील ग्रंथींमुळे कानात "मळ' तयार होतो. या डर्मिस थरात केस निर्माण करणारे 'केसांचे कांदे' असतात. दर चौरस सेंटिमीटर त्वचेत ते 10 असतात. या कांद्यातून केस सतत निर्माण होतात. डर्मिसमध्ये लक्षावधी मेलॅनोसाईट्स नावाच्या पेशी असतात. त्यातून लाल अथवा काळसर रंगाचे रेणू तयार होतात. या रेणूला मेलॅनिन म्हणतात.
आपल्या त्वचेचा रंग या मेलॅनिनवर ठरतो. मेलॅनिनमुळे सूर्यकिरणातील अतिनील किरणांपासून (Ultraviolet) आपल्या शरीराचा बचाव होतो. त्वचेमध्ये मज्जातंतूंचे दाट जाळे असते. हाताच्या बोटांच्या टोकावरील त्वचेत हजारो स्वीकारक प्रति स्क्वेअर सेंटिमीटर असतात. आपल्या आजूबाजूच्या गोष्टी चाचपडत आपल्याला अंधारात परिसराची माहिती यामुळे मिळू शकते. नखे व केस एपिडर्मिसप्रमाणे कॅटॅरिन असणाऱ्या मृत पेशींचेच बनलेले असतात. केसांचा रंग मेलॅनिनवर अवलंबून असतो. मेलॅनिन नसल्यास तेथे हवेचा एक बुडबुडा तयार होतो. त्यामुळे पांढरा रंग जाणवतो. केस पिकलेला दिसतो. नखात असे झाले, की नखात पांढरा डाग दिसतो.