डॉ. श्री बालाजी तांबे
वरण म्हटले, की सहसा आपल्या डोळ्यांसमोर तुरीचे किंवा मुगाचे वरण येते. आयुर्वेदात मात्र निरनिराळ्या डाळींचे वरण बनविण्याची पद्धत दिलेली आहे. रुचिपालट म्हणून आणि ज्या ऋतूत जी डाळ खाण्यास अनुकूल असेल किंवा प्रकृतीनुसार ज्याला जी डाळ अनुकूल असेल, त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारची वरणे बनविता येतात.
वरण डाळीपासून बनविले जाते व डाळ कडधान्यापासून बनविली जाते. कडधान्यापासून डाळ तयार करताना त्यावर एक संस्कार करायला सांगितला आहे,
शिम्बीधान्यस्य भृष्टस्य दालिं कृत्वा सुनिस्तुषाम् ।पक्वोदके सुसिद्धा सा वरान्नमिति चक्षते ।।
कुरुते न मलस्तंभं सतुषं कुरुते जराम् ।।...निघण्टु रत्नाकर
ज्या द्विदल धान्याची डाळ करायची ते धान्य (कडधान्य) किंचित भाजून त्याचे साल काढून टाकावे व डाळ तयार करावी. अशा प्रकारे तयार झालेली डाळ शिजवून त्याचे वरण (वरान्न - श्रेष्ठ अन्न) तयार केलेले असेल की ते मलावरोध उत्पन्न करत नाही. साल न काढताच वरण केल्यास मात्र त्यामुळे म्हातारपण लवकर येऊ शकते.
मागच्या वेळी आपण काही वरणांची कृती व त्यांचे गुण पाहिले, आज आपण अजून काही वरणांच्या कृती व गुणधर्म पाहणार आहोत.
कुळथाचे वरण कुलित्थसूपो वातघ्नः कटुः पाके कषायकः ।कफशुक्रविरोध्यस्रकारकः श्वासकासनुत् ।।
शुक्राश्मरीहरः पित्तकारकः कथितो नृभिः ।।...निघण्टु रत्नाकर
कुळथाचे वरण चवीला तुरट असते. कफदोषास शमवते, विपाकाने तिखट असते, रक्त वाढवते, खोकला-दमा कमी करते. शुक्राश्मरी विरघळवते, पित्त वाढवते आणि शुक्रास कमी करते.
चवळ्यांचे वरणराजमाषभवः सूपः स्वादु रुक्षः कषायकः ।ग्राही गुरुर्वातकरः स्तन्यकृत् रुचिकारकः ।।...निघण्टु रत्नाकर
चवळीच्या डाळीचे वरण चवीला गोड, किंचित तुरट आणि रुक्षता वाढविणारे असते. वात वाढवते, रुचकर असते, शौचाला बांधून होण्यास मदत करते व स्तन्य (आईचे दूध) वाढविणारे असते.
हरबऱ्याच्या डाळीचे वरणचणकः सूपः आख्यातो रेचनः पाचनः परः ।बलासपित्तनुत् बल्यो रक्तजित् नातिवातलः ।।...निघण्टु रत्नाकर
हरबऱ्याच्या डाळीचे वरण अतिशय रुचकर असते. कफ-पित्तशामक असते, ताकद वाढविते, रक्त विकारांचा नाश करते आणि किंचित वातूळ असते.
वाटाण्याचे वरणकलायसूपः कथितो लघुर्ग्राही सुशीतलः ।रुक्षो मेध्यः पाककाले स्वाद्वस्रगदपित्तनुत् ।
अरोचकः हरश्चासौ कफनाशकरो मतः ।।...निघण्टु रत्नाकर
वाटाण्याचे वरण थंड असते, रुक्षता वाढवते, पचण्यास हलके असते, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, पचन झाल्यावर म्हणजे विपाकाने मधुर असते, रक्तविकार तसेच पित्तदोष कमी करते, मेधा वाढविण्यास मदत करते, तोंडाला चव नसणे, खोकला, कफदोष यांचा नाश करते.
दोन-तीन डाळी एकत्र करूनही वरण बनविता येते. मिश्र वरणाचे गुण त्या त्या डाळींप्रमाणे असतात.
- डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलनव्हिलेज,
कार्ला 410 405
www.ayu.de डॉ. श्री बालाजी तांबे यांचा ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा...
(डॉ. श्री. बालाजी तांबे यांचे सुप्रसिद्ध पुस्तक 'आयुर्वेदिय गर्भसंस्कार' आता ऑनलाईन मिळतेय...!)