डॉ. श्री बालाजी तांबे
माझे वय 58 वर्षे आहे. उंची कमी असून वजन 70 किलो आहे. एकदा हार्ट अटॅकही येऊन गेला. डॉक्टर म्हणतात, या वयात वजन कमी होणार नाही. वजन कमी करण्यासाठी वयाची मर्यादा असते का?...श्रीमती पुष्पा चितळे
उत्तर - वजन कमी करण्यासाठी क्रॅश डाएट, शक्तीव्यय करणारे व्यायाम यासारखे उपाय अयोग्य असल्याने तुम्हाला असे सांगितले असणार. पण वजन कमी करण्यासाठी वयाची मर्यादा नसते. मात्र आपापल्या प्रकृतीला व वयाला साजेसे वजन असणेही स्वाभाविक असते, हे लक्षात घ्यायला हवे. आपल्या बाबतीत नियमित चालायला जाणे, अंगाला "अभ्यंग तेला'सारखे हृदयाला हितकर तेल लावणे आणि संध्याकाळी फक्त द्रवाहार घेणे हे उपाय वजन कमी करण्यासाठी उत्तम ठरतील. तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने औषधे सुरू करण्याचा अजून चांगला उपयोग होऊ शकेल.
मागच्या महिन्यात माझ्या पत्नीच्या पोटात उजव्या बाजूला वेदना होत होत्या, उलट्याही होत होत्या. तपासणीमध्ये उजवी किडनी व मोठ्या आतड्यास सूज आल्याचे आणि त्या ठिकाणी जंतुसंसर्ग झाल्याचे लक्षात आले. औषधांनंतर आता तपासणीत दोष दिसत नाही, पण पोट दुखणे कमी झालेले नाही. जंतुसंसर्ग होण्यामागचे कारणही समजत नाही. पत्नीचे पोटही साफ होत नाही. तिचे गर्भाशय काढलेले आहे, कृपया मार्गदर्शन करावे...श्री. फडकेउत्तर - ज्या अर्थी पोट दुखणे कमी झालेले नाही त्याअर्थी जंतुसंसर्ग / सूज हे त्रास पूर्णपणे बरे झालेले नसावेत, गर्भाशयही काढून टाकलेले आहे, या सर्व गोष्टींचा विचार करता एकदा प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन औषध सुरू करणेच इष्ट राहील. तत्पूर्वी "फेमिसॅन तेला'चा पिचू ठेवण्यास सुरुवात करता येईल. पोटावर "रोझ ब्युटी' तेल जिरविण्याचाही उपयोग होईल. आतड्यांची सूज कमी होण्यासाठी, तसेच पोट साफ होण्यासाठी "सॅनकूल चूर्णा'सारखे चूर्ण घेण्याचाही फायदा होईल.
काही वर्षांपासून मला मधुमेह आहे, सध्या बऱ्यापैकी नियंत्रणाखाली आहे. अधूनमधून डॉक्टरांकडे गेलो असता ते लघवी व्यवस्थित होते का असे विचारतात. मला लघवीचा काही त्रास नाही, परंतु किडनीमध्ये काही दोष उत्पन्न झाला असावा का याची चिंता वाटते. ..श्री. अनंत नाशिककरउत्तर - मधुमेह हा मूत्रसंस्थेशी संबंधित विकार असतो व त्यामुळे बऱ्याच वर्षांचा मधुमेह असला की किडनीची कार्यक्षमता कमी होणे शक्य असते. त्यामुळे चिंता करण्याऐवजी किडनी व्यवस्थित काम करते आहे की नाही याची तपासणी करून घ्यावी. तज्ज्ञ वैद्यांचाही सल्ला घ्यावा. रक्तशर्करा नियंत्रणात असली, तरी मधुमेहामुळे इतर नुकसान होऊ नये, किडनी-हृदय वगैरे महत्त्वाच्या अवयवांवर दुष्परिणाम होऊ नये म्हणून आवश्यक ती औषधे सुरू करावीत.
आम्ही दुबईत राहतो, तेथे गर्भसंस्कार कसे करता येतील? गर्भसंस्कार करून दिवस राहिल्यावर ऍलोपॅथिक औषधे घेता येतात का?...सौ. प्रिया, दुबईउत्तर - गर्भसंस्कार जगभरात कुठेही करता येतात. फक्त बीजसंस्काराच्या दृष्टीने करायचे पंचकर्मादि उपचार सगळीकडे होतीलच असे नाही. मात्र रसायनसेवन, योग्य आहार-आचरण, संगीत, शुक्रपोषक औषधांचे सेवन या सर्व गोष्टी आपल्या आपणच करायच्या असल्याने त्याला देशाचे बंधन नाही.
"सकाळ' प्रकाशित "आयुर्वेदीय गर्भसंस्कार' या पुस्तकात या संबंधातील सविस्तर माहिती मिळू शकते. गर्भसंस्कार हे बालकाच्या व आईच्या आरोग्यासाठी करायचे असतात व त्यामुळे आवश्यकता असल्यास ऍलोपॅथीची औषधे घ्यायला हरकत नसते. मात्र आत्तापर्यंतच्या अनुभवावरून असे दिसते की सुरुवातीपासून व्यवस्थित काळजी घेतली, गर्भसंस्कार केले तर इतर औषधे घेण्याची गरज पडत नाही आणि कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम भोगावा लागत नाही.
- डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलनव्हिलेज,
कार्ला 410 405
www.ayu.de डॉ. श्री बालाजी तांबे यांचा ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा...
(डॉ. श्री. बालाजी तांबे यांचे सुप्रसिद्ध पुस्तक 'आयुर्वेदिय गर्भसंस्कार' आता ऑनलाईन मिळतेय...!)