Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

'बाळा उगी उगी'
डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, August 27, 2010 AT 11:17 AM (IST)

बालग्रहाचा खरा परिहार करायचा असेल, तर चुकीचा आहार-विहार-आचार टाळणे आणि एकूणच नैतिक मूल्यांवर आधारित जीवन जगणे आवश्‍यक असते.

अष्टांग आयुर्वेदापैकी बाल अर्थात कौमारभृत्यतंत्रामध्ये लहान मुलांच्या रोगांसंबंधी, त्यांच्या एकूणच वाढीसंबंधी, त्यांच्या एकूणच औषधयोजनेसंबंधी मार्गदर्शन केलेले सापडते.

बाल कोणाला म्हणावे? साधारणतः 16 वर्षापर्यंतच्या मुलांना बाल म्हणायला हरकत नाही. फक्‍त मातेचे दूध पिणारी एक वर्षापर्यंतची मुले, त्यानंतर वरचे दूध व दूध-भातासारखे पदार्थ सेवन करणारी दोन वर्षापर्यंतची मुले आणि त्यानंतर सर्व प्रकारचे अन्न खाणारी मुले असे विभाग केले, तर त्यांच्या अडचणी, रोग व उपचार यावर उपचार करणे सोपे जाईल. तसेच औषधाची मात्रा ठरविताना सुद्धा मुलाचे वय, त्यांची प्रकृती ह्यांचा विचार अवश्‍य करावा लागतो. एकूण जीवनामध्ये खाणे-पिणे-आचार यांचे जे काही नियम मोडले जातात, त्यातून रोग होतात असे गृहीत धरले, तरी अगदी लहान मुलांच्या रोगांसंबंधी विचार करताना गर्भधारणा होत असताना आई-वडिलांच्या प्रकृतीवर, बालक जन्माला आल्यावर आईच्या प्रकृतीवर, तसेच बालक स्तन्यपान करत असता आईने केलेला आहार व विचार ह्यांच्यावर मुलाचे आरोग्य खूप प्रमाणात अवलंबून असते. परंतु बरेच रोग का झाले, कसे झाले याची कारणे गूढ राहतात व साहजिकच या रोगांवर उपचार वेगळ्या प्रकारे करण्याची आवश्‍यकता असते.

ज्या घरात लहान मूल असते त्या घरातील वातावरण, त्याचे माता-पिता व घरातील इतर मंडळींचे वर्तणूक आणि एकूणच जीवनात नैतिकतेचा अभाव, अनैसर्गिक आहार-विहार यामुळे काही विशेष शक्‍ती आकर्षित होतात व त्यामुळे बालकाला त्रास होऊ शकतो. अशा त्रासांसाठी वा रोगांसाठी "बालग्रह' असा शब्दप्रयोग केलेला दिसतो.

अशा त्रासांचे निदान व्यवस्थित करणे व निदान झाल्यावर पुढे त्यावरील उपाययोजना करणे आवश्‍यक ठरते. बालकाच्या शरीरातील जन्मतः असलेल्या आजाराची जबाबदारी अर्थातच बालकाच्या आहार-विहारावर नसते. हे आजार जवळजवळ अनाकलनीय असल्यासारखेच दिसतात. सव्यंग बालक जन्माला येणे याचेही कारण कुठेतरी पूर्वजन्मात असावे एवढेच निदान करता येते.

पुनर्जन्मावर विश्‍वास असला, तरी पुनर्जन्म ही संकल्पना विज्ञानाच्या प्रयोगांच्या निकषावर सिद्ध करणे तसे अवघड आहे. तसेच आयुर्वेदातील ग्रह म्हणजे दैवव्यपाश्रयचिकित्सेपैकी काही चिकित्सा सिद्ध करून दाखविणे वा त्यांची प्रचिती ताबडतोब देणे खूप अवघड असते. बालग्रहावर इलाज करत असताना सुद्धा जोपर्यंत औषधी किंवा तत्सम शारीरिक उपचार करायचे असतील, तोपर्यंत प्रत्येकास त्याचे आयुर्वेदिक विज्ञान तरी समजू शकते, परंतु जेव्हा ग्रहबाधानिवारण म्हणून अंगारे, धूप, दोरे, वेगवेगळ्या ग्रहांच्या शांती वा यज्ञयागादी करण्याची आवश्‍यकता भासते, तेव्हा त्यावर विश्‍वास ठेवणे सर्वांनाच जमत नाही. म्हणूनच अशा तऱ्हेचे उपचार करणारे तंत्र-मंत्र समजणारे अधिकारी वैद्य कमी झाले, जवळजवळ मिळेनासे झाले.

मूल आश्‍लेषा नक्षत्रावर जन्माला आले, तर त्यासाठी शांतिविधी करावा असे सांगितलेले दिसते. तसेच गोप्रसव शांत किंवा बालकाचा नामकरण विधी अशा अनेक प्रकारे कर्मकांडातील काही विधी करावयास सांगितलेले दिसतात. एका शांतिविधीमध्ये बालकास सुपात ठेवून त्याचा गाईकडून वास घेणे असा विधी असतो. या विधीतील संपूर्ण विज्ञान समजले नाही, तरी धूमचिकित्सेने बराच फायदा होऊ शकतो, हे लक्षात आल्यानंतर करावयास सांगितलेले यज्ञयाग तशाच कुठल्यातरी विज्ञानावर आधारित असतील, हा अंदाज बांधता येतो. अशा यज्ञयागात वेगवेगळ्या वनस्पतींचे हवन केले जाते. त्यात तांदूळ, धूप, पळस, उंबर, शमी, दूर्वा हवनासाठी वापरल्या जातात. या सर्व वनौषधींचे हवन केल्यानंतर वातावरणात पसरलेला धूर व त्या वनस्पतीचे अति सूक्ष्म बीज उपयोगी पडत असावे असे लक्षात येते. आयुर्वेदात केवळ शारीरिक, भौतिक मर्यादांचाच विचार न करता मनःशक्‍ती व आत्मशक्‍ती यांचाही विचार केलेला असल्याने मनावर विशेष संवेदना कोरल्या जाव्यात आणि मंत्रशक्‍तीच्या आधारावर शरीराच्या अंतर्गत व्यवस्थेत इच्छित बदल करता यावेत अशी योजना केलेली असावी हे लक्षात येते.

ऐन संध्याकाळच्या वेळी लहान बाळाला बाहेर फिरवून आणल्यावर, त्यातल्या त्यात एखाद्या विहीर- तलावावर किंवा जंगलसदृश प्रदेशातून फिरवून आणल्यावर अचानक बाळ रडू लागले वा त्याला ताप भरला तर काहीतरी बाधा झाली असे बहुतेक वेळा समजण्यात येते. त्याचप्रमाणे गर्दीच्या ठिकाणी जाऊन आल्यावर जर बालकाला त्रास होऊ लागला तर बाळाला दृष्ट लागली असावी असा समज करून घेण्याची पद्धत समाजात रूढ आहे. पण एवढे मात्र नक्की की बालक जर अचानक रडायला लागले, त्याला उलट्या, जुलाब, ताप वगैरे रोगाची पूर्वलक्षणे सुरू झाली, तर देवाजवळ प्रार्थना करून अंगारा लावल्यावर किंवा रामरक्षा म्हणून अंगारा लावल्यावर, आपल्या इष्ट देवतेचे, गुरुंचे स्मरण करून बाळाच्या मस्तकावर हात ठेवल्यावर बाळ बरे झाले असे सांगणारी अनेक मंडळी भेटतात. ज्यांच्यावर असा काही प्रसंग आलेला असतो ते विज्ञानाने सिद्ध करण्याची वाट न पाहता इलाज करून गुण मिळवितात. बालग्रहाचा खरा परिहार करायचा असेल, तर चुकीचा आहार-विहार-आचार टाळणे व एकूणच नैतिक मूल्यांवर आधारित जीवन जगणे आवश्‍यक असते. (क्रमशः)
 
- डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405
www.ayu.de 
डॉ. श्री बालाजी तांबे यांचा ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्‍लिक करा... 
(डॉ. श्री. बालाजी तांबे यांचे सुप्रसिद्ध पुस्तक 'आयुर्वेदिय गर्भसंस्कार' आता ऑनलाईन मिळतेय...!)

प्रतिक्रिया
On 8/30/2010 4:26 PM Yogee said:
खूप छान माहिती आहे..धन्यवाद..


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: