Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

बालग्रह
डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, August 27, 2010 AT 11:21 AM (IST)

वास्तविक बालग्रह बालकाचे रक्षण करणारे असतात; पण जेथे अयोग्य वागणे आहे, तेथे बालग्रह बालकांना त्रास देतात. सामान्य तर्कबुद्धीला समजू न शकणारे, साध्या डोळ्यांना न दिसणारे असे रोगाचे कारण म्हणजे बालग्रह. बारा वर्षांपर्यंतच्या बालकांना ते ग्रासू शकतात. बालग्रहांमुळे बालक व्याधिपीडित होऊ नये, यासाठी आधीपासून काळजी घ्यायला हवी.

युर्वेदाच्या आठ अंगांपैकी एक महत्त्वाचे अंग म्हणजे कौमारभृत्य तंत्र. यात स्त्री आरोग्यापासून गर्भधारणा, बाळाचा जन्म, बालकाचा आहार - आचरण, रोग, उपचारापर्यंत सर्व गोष्टींचे विस्तृत मार्गदर्शन केलेले आहे. बालग्रह ही यातीलच एक आगळीवेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना होय.

बाल म्हणजे बालक आणि ग्रह म्हणजे ग्रासणे, पकडणे, बाधित होणे. ज्यामुळे बालक व्याधीने ग्रासले जाते, ज्यामुळे बालकाच्या आरोग्यावर बाधा येते ते बालग्रह होत. बालग्रह हा केवळ एक रोग नाही, तर बालग्रहाच्या अंतर्गत नेमके कारण लक्षात न येणारे अनेक रोग येतात. आयुर्वेदात एकंदरच रोगाला नाव देण्यापेक्षाही रोगाचे कारण समजून त्यानुसार नेमके उपचार करण्यावर भर दिला आहे. बऱ्याचशा रोगांची कारणे लक्षात येऊ शकतात, उदा. नियमाविरुद्ध जेवण केले तर अपचन होऊ शकते, जागरण केल्याने पित्त वाढून डोके दुखू शकते वगैरे. आधुनिक वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने अमुक रोग विषाणूमुळे झाला, तमुक जीवाणूूमुळे झाला असे सांगणे शक्‍य होत असले, तरी बऱ्याच वेळा हा जंतुसंसर्ग अमुकच व्यक्‍तीला का झाला? आहार-आचरणाचे नियम पाळूनही अमुक व्यक्‍तीला असाध्य रोगाची बाधा का झाली हे प्रश्‍न पडतात. असे जेव्हा बालकांच्या बाबतीत घडते तेव्हा "बालग्रह' प्रकरणाचा आधार घ्यावा लागतो. सामान्य तर्कबुद्धीला समजू न शकणारे, साध्या डोळ्यांना न दिसणारे असे रोगाचे कारण म्हणजे बालग्रह.

रक्षक बालग्रह
या अशा वर्णनावरून मनात बालग्रहाविषयी भीती उत्पन्न होऊ शकते. खेळण्या-बागडणाऱ्या बाळाला हे बालग्रह एकाएकी रोगग्रस्त करतात की काय असाही प्रश्‍न पडू शकतो. पण वास्तविक पाहता बालग्रह बालकाचे रक्षण करणारे असतात. या बाबतीत एक कथा सुश्रुतसंहितेत सांगितली आहे, एते गुहस्य रक्षार्थं कृत्तिकोमाग्निशूलिभिः ।सृष्टाः शरवणस्थस्य रक्षितस्यात्मतेजसा ।।...सुश्रुत
पार्वती, महादेव, अग्नी व कृत्तिका यांनी हे बालग्रह, आत्मतेजाने स्वसंरक्षण करणाऱ्या कार्तिकेयाच्या रक्षणासाठी उत्पन्न केले.

असुरांचा निःपात करण्यासाठी कार्तिकेयांनी शंकर-पार्वतीच्या पोटी जन्म घेतला ही कथा आपण जाणतो. कार्तिकेयाला जन्मल्या जन्मल्याच असुरांशी लढून त्यांच्यावर विजय मिळवायचा होता, अर्थातच त्याचे कुणीतरी रक्षण करणे अत्यावश्‍यक होते.

बालकार्तिकेयाचे रक्षण व्हावे म्हणून पार्वती वगैरे चौघांनी मिळून बालग्रह तयार केले व या बालग्रहांच्या मदतीने बालकार्तिकेयाने असुरांचा संहार केला. लढाई संपली, विजय मिळाला आणि देवांनी कार्तिकेयाला देवांचे सेनापतीपद बहाल केले. लढाई संपल्यानंतर बालग्रहांना काम उरले नाही, तेव्हा त्यांनी स्वतःच्या निर्वाहासाठी काही काम मिळण्याची विनंती कार्तिकेयांजवळ केली. कार्तिकेयांनी महादेव शंकरांकडे याविषयी विचारणा केली, तेव्हा महादेवांनी त्यांच्यावर पृथ्वीतलावरच्या समस्त बालकांची जबाबदारी टाकली, मात्र बरोबरीने एक महत्त्वाची गोष्ट सांगितली,
कुलेषु येषु नेज्यन्ते देवाः पितर एव च ।ब्राह्मणाः साधवश्‍चैव गुरवो अतिथयः तथा ।।
निवृत्ताचारशौचेषु परपाकोपजीविषु ।उत्सन्नबलिभिक्षेषु भिन्नकांस्योपभोजिषु ।।
गृहेषु तेषु ये बालास्तान्‌ गृहणीध्वम्‌ अशंकिताः ।।...सुश्रुत उत्तरतंत्र

ज्या घरात, ज्या कुलात देव (आपल्यापेक्षा वरचढ शक्‍ती), पितर (पूर्वज, आई-वडील), ब्राह्मण (ज्ञानी जन), साधू (सज्जन), गुरु, अतिथी यांना महत्त्व दिले जात नाही, ज्यांची वागणूक निसर्गनियमांना धरून नसते, जे अपवित्र, अशुद्ध राहतात, जे स्वतः कष्ट न करता दुसऱ्यांच्या जिवावर आपली उपजीविका चालवितात, जे आपल्या कमाईतील थोडा सुद्धा हिस्सा समाजाला देत नाहीत, शास्त्रांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करत नाहीत अशा लोकांच्या घरात शिरून त्या घरातील बालकांमध्ये रोग उत्पन्न करा.

भगवान शंकरांची आज्ञा शिरोधार्य समजून तेव्हापासून बालग्रह पृथ्वीतलावर आले. काश्‍यपसंहिता, चरकसंहिता, सुश्रुतसंहिता, हारीतसंहिता, भावप्रकाश, अष्टांगसंग्रह, रावणकृत बालतंत्र वगैरे सर्वच आर्ष (प्राचीन) संहितांमध्ये बालग्रहांची माहिती दिलेली आहे. विविध ग्रंथकर्त्यांनी बालग्रहांची नावे व संख्या निरनिराळी दिलेली आहे, पण सर्व ग्रंथात बालग्रह संकल्पना एकच आहे. बालग्रह 12 वर्षापर्यंतच्या बालकांना ग्रासू शकतात असे सांगितले आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बालग्रहांमुळे बालक व्याधिपीडित होऊ नये यासाठी आधीपासून काळजी घेण्यास सांगितले आहे. कारण,
ग्रहोपसृष्टा बालास्तु दुश्‍चिकित्स्यतमा मताः ।
...सुश्रुत उत्तरतंत्र
ग्रहबाधित बालकांवर उपचार करणे अतिशय अवघड आहे, असे स्पष्ट सांगितले आहे.

व्याधिपीडित कधी होतात?
बालग्रहाने व्याधिपीडित होण्याची शक्‍यता पुढील बालकात सर्वाधिक असते,
* ज्या बालकाची स्तन्यपान देणारी आई वा दाई अविचाराने काहीही अचरचबर खाते, कुपथ्य करते, आचरणात व विचारात शुद्धतेचे भान ठेवत नाही, अस्वच्छ राहते.
* बालकाचे वस्त्र, बिछाना वगैरेंच्या बाबतीत शुद्धता ठेवली जात नाही.
* बालकाचे रक्षाकर्म सांभाळले जात नाही, शास्त्रात सांगितलेल्या गोष्टींचे उल्लंघन केले जाते.
* ज्या बालकाला अकारण किंवा मुद्दाम घाबरवले जाते, मारले जाते, भीती दाखविली जाते.
* ज्या बालकाला अकारण, जबरदस्तीने हसवले जाते.
* ज्या मुलाला अनोळख्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणची शक्‍ती, ऊर्जा वगैरेंची माहिती नाही अशा ठिकाणी नेले जाते.
* जे बालक दुसऱ्याने घातलेले वस्त्र, आभूषण, फुले वगैरे धारण करते.
* ज्या बालकाकडे दुर्लक्ष केले जाते, ज्या बालकाला खूप वेळ रडू दिले जाते.
अशा बालकांना बालग्रह होण्याची शक्‍यता अधिक असते. वर समजावलेल्या सर्वच कारणांमुळे बालकांना जंतुसंसर्ग होऊन रोग होण्याची शक्‍यता सर्वाधिक असते, हे आधुनिक विज्ञानातील विचारधारेनुसारही समजू शकते.

बालग्रहाची पूर्वरूपे
तेषां गहिष्यतां रूपं प्रततं रोधनं ज्वरः ।
बालग्रहाने आक्रमण करून रोग होण्यापूर्वी बालक अकारण रडत राहते आणि ज्वरग्रस्त होते असे दिसते.

बालग्रहाची सामान्य लक्षणे
* बालक अकारण घाबरते.
* दिवसभर जांभया देते.
* गळून जाते, मलूल होते.
* बालकाच्या तोंडात फेस येतो.
* डोळे वर जातात.
* बालक दात-ओठ चावते.
* रात्री नीट झोपत नाही, कण्हते.
* दूध पीत नाही.
* बालकाच्या आवाजात बिघाड झालेला जाणवतो.
* बालक एकाएकी आपले वा आईचे अंग ओरबाडते, चावते.
* बालकाच्या शरीरातून एक प्रकारची दुर्गंधी येते.

ज्या बालग्रहाने पकडले असेल त्यानुसार बालकात वेगवेगळी लक्षणे निर्माण होतात, पण साधारणतः ताप, जुलाब, विसर्प (हर्पिज), इंद्रियांची अकार्यक्षमता, वेदना, दमा, खोकला, निद्रानाश, अतिनिद्रा, तोंडे येणे, जखमा होणे, पक्षाघात, उचकी, मूर्च्छा, मद, डोळे स्तब्ध होणे, वर्ण बदलणे, आवाज बदलणे, पांडू, कावीळ, शिरःशूल, हृदयरोग, डोळ्यांचे रोग, कर्णरोग, अपस्मार, मेंदूचे रोग वगैरे रोगांचा किंवा रोगलक्षणांचा बालग्रहात समावेश होतो.

- डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405
www.ayu.de 
डॉ. श्री बालाजी तांबे यांचा ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्‍लिक करा... 
(डॉ. श्री. बालाजी तांबे यांचे सुप्रसिद्ध पुस्तक 'आयुर्वेदिय गर्भसंस्कार' आता ऑनलाईन मिळतेय...!)

प्रतिक्रिया
On 9/9/2010 11:58 PM d.r.bahulekar said:
अशा शक्ती अस्तित्वात असतात हे मी माझ्या अनुभवावरून ठामपणे सांगू इच्छितो .या किंवा अशा शक्तींना (ज्यांना आपण देव, भूत,ग्रह म्हणतो ) समजून घेण्यासाठी सवेन्दनाशील ( SENSITIVE ) मनाची आवश्यकता असते. मनाची हि अवस्था मंत्र पठणाने ,भक्तीने,तपश्चर्येने ,नामस्मरणाने प्राप्त होते. अशा व्यक्तीने दिलेला गंडा,उतारा,अंगारा, बालाग्रहान्सारखे दोष दूर करू शकतो.हे मी माझ्या अनुभवाने सांगत आहे.
On 9/8/2010 12:04 AM sunita said:
लवकर लवकर उपाय सुचवा उपाय सुचवा
On 9/3/2010 9:10 PM Balasaheb Satav said:
धन्यवाद ह्यावर उपाय सुचवा
On 9/1/2010 1:56 AM santosh said:
लवकरात लवकर उपाय सुचवा.
On 8/31/2010 3:41 PM Sudhir Sawant said:
माहिती खूपच छान आहे. पण ह्यावर उपाय सुचवा .
On 8/30/2010 8:57 PM mohinikadbe said:
धन्यवाद ह्यावर उपाय सुचवा
On 8/27/2010 12:18 PM Trupti said:
माहिती खूपच छान आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: