Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

बेटी तेरा बचपन तो झूठा री...
इब्राहीम अफगाण
Sunday, August 29, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: women,   madhurangan,   tanishka

गेल्या सातशे वर्षात साम्राज्यं बदलली, पिढ्या बदलल्या, राजवटी बदलल्या, स्त्री बदलली, आधुनिक युगात स्त्री पुरुषांच्याही पुढे गेली. पण काही गोष्टी मात्र तिच्यासाठी कधीच नाही बदलल्या... अमीर खुस्रोंचं काव्य ऐकताना आलेला अनुभव...

ऑनर किलिंग, कुटुंबाचा सन्मान आणि प्रतिष्ठा टिकवण्यासाठी केलेल्या आपल्याच नात्यातील लोकांच्या हत्या पुन्हा एकदा वर्तमानपत्रांत झळकू लागल्या आहेत. त्यात विशेषत: मुलींच्या हत्या असतात. आईवडील मुलीची हत्या करतात, भाऊ बहिणीची करतो, काका पुतणीची करतो. कारण घरच्यांच्या मर्जीविरुद्ध त्यांना आणि त्यांच्या समाजाला मान्य नसणाऱ्या समाजाशी तिने नातं जोडण्याचा प्रयत्न केलेला असतो. सर्वाधिक प्रेमपट निर्माण करणाऱ्या भारत देशात या वास्तव कहाण्या आपण सगळे सोयीस्कर नजरेआड करून चहाच्या शेवटच्या घोटानंतर उष्ट्या कपासोबत बाजूला टाकत असतो.
या हत्या होणं चूक आहे, त्याला सामाजिक परिस्थिती कशी जबाबदार आहे, शिक्षणाचा कसा काही उपयोग नाही वगैरे चर्चा करण्याचा हेतू या लेखात नाही. हा लेख मनाला पडलेल्या एका प्रश्‍नाबद्दल आहे आणि अचानक त्याला मिळालेल्या उत्तराबद्दलही.
तर तो प्रश्‍न असा आहे, की हीच मुलगी जेव्हा लहान होती, दिवसभर खेळून दमून आईच्या पदराची किनार पकडून निश्‍चिंत झोपी जात होती, ती हीच मुलगी होती की दुसरी कोणी? तिच्या बालपणी तिला आई जे जे काही म्हणाली असेल, ज्या ज्या गोष्टींबद्दल तिला आश्‍वस्त केलं असेल, जी जी स्वप्नं दाखवली असतील, जे काही बालपण तिला मिळावं म्हणून ती झटली असेल, ते खरं होतं की खोटं?
घरातील सर्व पुरुषांपासून लपवून ठेवलेला दुधाचा कप किंवा लाडू ज्या आईने तिला भरवताना जे काही सांगितलं असेल ते किती खरं होतं?
मग ती आई कुठे गेली?
ती आई खरी होती की खोटी?
ती मुलगी खरी होती की खोटी?

या प्रश्‍नाचं उत्तर नुकतंच मिळालं.
नुकताच मुंबईत नेहरू सेंटरला हजरत अमीर खुस्रो यांच्या सुफी काव्यरचनांवर आधारित "बनयन ट्री" या संस्थेने आयोजित केलेला "रुहानियत" हा कार्यक्रम पाहिला. हजरत अमीर खुस्रो हे नाव माहीत असू शकतं, पण त्यांच्या काव्यरचना माहीत असतीलच असं नाही. भारतातल्या सुफी परंपरेतील, भाषिक परंपरेतील, संगीत परंपरेतील, साहित्य परंपरेतील हे एक महत्त्वाचं नाव आहे. त्यांनी सितार आणि तबला ही वाद्यं निर्माण केली, फारसी आणि हिंदवी भाषेत विपुल काव्यलेखन केलं.

इथे एक गोष्ट स्पष्ट करणं आवश्‍यक आहे. ती म्हणजे, हिंदवी ही भाषा आजच्या हिंदीच्या आधीची भाषा. काहींना अमीर खुस्रो यांनी उर्दूत लेखन केलं असंही वाटतं. (उदा. या कार्यक्रमात सूत्रसंचालन करणाऱ्या महिलेला.) पण ते शक्‍य नाही. कारण, उर्दू भाषा ही सोळाव्या शतकात निर्माण झाली आणि हजरत अमीर खुस्रो हे तेराव्या शतकात होऊन गेले.

तर हजरत अमीर खुस्रो यांची इथे आठवण येण्याचं कारण म्हणजे त्यांच्या काही रचना स्त्रीच्या दृष्टिकोनातून लिहिल्या गेल्या आहेत. त्यातील दोन रचना या कार्यक्रमात आफोज बानू आणि फरीदा खान या आई-मुलीच्या जोडीने सादर केल्या. दोन्ही रचनांच्या दरम्यान आणि अखेरीस सभागृहातील बहुतेकांच्या हातात रुमाल दिसत होते.

मुलगी लग्न होऊन सासरी निघाली आहे. त्या वेळी ती आपल्या वडिलांपुढे मनातील भावना व्यक्‍त करते, अशी एक रचना आहे.
मुलगी विचारतेय, माझं लग्न लावून तू मला इतक्‍या लांब का पाठवतो आहेस? माझ्यात आणि माझ्या भावात तू भेदभाव का केलास? त्याला तू नवीन घर दिलंस आणि मला परदेश दिला. आणि मी आहे तरी काय तुझ्यासाठी? तुझ्या गोठ्यात बांधलेली गाय, तू जिथे हाकशील तिथे जाणारी. किंवा पिंजऱ्यातलं पाखरू, तू उडवलं तरच उडणारं.

पुढे मुलगी सासरी जाते, सासरी राहते; पण मन माहेरीच रेंगाळत राहतं. श्रावणात ऋतुचक्राची विलक्षण जादू निर्माण होते आणि सण सुरू होतात. अशा वेळी नव्यानेच सासरी आलेल्या मुलीला घरच्यांची तीव्र आठवण येते आणि ती आपल्या आईकडे आपलं मन मोकळं करते.
ती म्हणते, अम्मा, मोरे बाबा को भेजो री, के सावन आया।

तिची आई अर्थातच शहाणी असते. तीही अशीच आलेली सासरी. पहिल्या वर्षी काय घडतं, मन कसं विचलित होतं, गरोदर असली की तिला हे अधिक तीव्रतेने वाटतं, हे तिला नीट माहीत असतं. त्यामुळे तिचं काम आपल्या मुलीला समजावण्याचं असतं. शिवाय ती आपल्या मुलीला नाही म्हणून दुखवूही शकत नाही. त्यामुळे ती चतुर उत्तरं देते.

ती म्हणते, बेटी, तेरा बाबा तो बूढा री।
मुलगी बाबांना पाठव सांगते, तर आई म्हणते, तो तर आता किती म्हातारा झाला! मुलगी म्हणते, मग भावाला पाठव. आई सांगते, अगं, तो किती लहान आहे! एवढा प्रवास कसा करणार एकट्याने? मग मुलगी म्हणते, तर मामाला पाठव की. आई म्हणते, अगं, तो किती भोळा आहे! त्याला तुझ्या सासरी पाठवून कसं चालेल?

आता मुलीचा धीर सुटतो. तिला कळतं, की कोणी येणार नाही. मुलगी लहान आहे. आताच तर न्हाण आलं आणि लग्न झालं. गेल्या श्रावणात तर झुल्यावर झुलत होते, सवंगड्यांसह खेळत होते. बालपण माझं तिथेच राहिलं.
अम्मा, मोरे बचपन को भेजो री, के सावन आया...
आता आईपुढे दुसरा कोणताच मार्ग उरलेला नाही. तिला आता मोठं व्हावंच लागेल. नाही तर कधी होणार ती मोठी?
बेटी, तेरा बचपन तो झूठा री, के सावन आया...
पोरी, तुला बालपण होतंच कुठे जे मी पाठवू? ते बालपण, जे तुला वाटलं की तुला होतं, ते सगळे खोटं होतं. पोरी, तुला नाही बालपण.
त्या क्षणी मुलगी सासरी मोठी होऊन जाते.

अमीर खुस्रो यांनी तेराव्या शतकातील सामान्य स्त्रीच्या मनातील वेदनेची नस पकडली होती. (ते राजकवी असले तरी.) तेव्हापासून सात शतकं उलटली. साम्राज्यं बदलली, पिढ्या बदलल्या, राजवटी बदलल्या, स्त्री बदलली. आधुनिक युगात स्त्री पुरुषांच्याही पुढे गेली.
पण काही गोष्टी तिच्यासाठी कधीच नाही बदलल्या. स्त्रीसाठी बालपण कधीच तिचं राहिलं नाही. तिच्या बालपणावर कुर्ला इथे धुमाकूळ घालणाऱ्या नराधमाने कब्जा केला. नातेवाइकांच्या रूपात वावरणाऱ्या वासनांध स्पर्शांनी कब्जा केला.
त्यातून ती बचावलीच, तर खुद्द आईवडील, भाऊबहिणी, काकापुतण्यांनीच तिचं बालपण खोटं ठरवलं.


अशा उर्वरीत टिप्स वाचा 'तनिष्का'च्या जुलैच्या अंकामध्ये.
अंक मागणीसाठी संपर्क करा - tanishka@esakal.com वर
तनिष्काच्या ऑर्कूट कम्युनिटीवर जॉईन व्हा.
प्रतिक्रिया
On 28/10/2010 03:57 PM vrusha said:
माझे हि असच काही झाल ,म्हणून मला सगळ आठवून गेल .कृपा करून मुलीला तिचे जीवन जगू द्या ,तिला हि हक़्क़ आहे जगण्याचा आनंद घायचा .
On 18/10/2010 10:50 AM Nilesh said:
खूपच छान लेख आहे. शुभेछा
On 9/10/2010 12:49 PM nisha said:
मला लेख खूपच आवडला.अमीर khusro!!!!!!!!
On 9/10/2010 1:50 AM Aditi said:
ha lekh khupch aavadala, mulila aaplya hatatil bahule samaju naye. Tilahi freedom aahe he accept karave. Kavita khup chan vatali
On 9/7/2010 2:19 PM Yogesh said:
रडू येतेय, माझ्या मुलीचे बालपण तरी खोटे ठरायला नकोय.
On 9/6/2010 12:32 PM Jayashree said:
तुम्ही कवितेच रसग्रहण इतक सुंदर केलाय.....कौतुक करावे तितके कमी
On 9/6/2010 12:18 PM Jayashree said:
Hats off to Amir Khusro.....इतकी संवेदन्शीलता एका कविमधेच असू शकते. Thanks इब्राहीम अफगाण आपण हे आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी.
On 05-09-2010 17:55:48 vijaya said:
very good ,heart touching artical.
On 9/5/2010 12:17 PM su said:
खरच मुलीला बालपण नसतच..................................
On 9/5/2010 8:33 AM kanchan said:
khara aahe
On 9/3/2010 9:13 PM saroj p.kole said:
लेख खूपच छान आहे,वाचून डोळ्यात पाणी आले.
On 9/3/2010 2:28 AM scientist said:
ऑनर किलिंग बद्दल काही वास्तव :- भारतामध्ये ९०% ऑनर किलिंग हे एकाच गोत्रातील मुलाने त्याच गोत्रातील मुलीशी विवाह केल्याने होते , कारण वेदाप्रमाणे बर्याच राज्यात असे मानतात की एकाच गोत्रातील मुलगा व मुलगी हे भाऊ-बहिण, काकी-पुतण्या, आजी-नातू अशा प्रकारचे असतात , व विज्ञान असे सांगते की नात्यात विवाह केल्याने अनुवांशिक रोग होण्याव्ही शक्यता अधिक आहे . व डार्विन च्या सिद्धांताप्रमाणे ज्याची अनुवंशिकता निरोगी व प्रबळ आहे तोच या जगात जगू शकतो .
On 01/09/2010 16:33 priyanka said:
खूपचं छान लेख आहे. माझ्या घरातही मला माझ्या इच्छे प्रमाणे लग्न करता येत नाही. आणि मला घरून पळून जाऊन लग्न करायचं नाही. हा लेख माझ्या घरच्यांनी वाचवा. मुख्यता माझ्या वडिलांनी. माझ्या आयुषातली एवढी मोठी इच्छा त्यांना काबुल नाही. समाज , पैसा , मान, हेच त्यांना महत्त्वाचे आहे.
On 9/1/2010 3:05 PM vinodraikar said:
veey good
On 9/1/2010 1:57 PM usha mahajan said:
लेख फारच छान आहे .डोळे भरून आले
On 9/1/2010 5:46 AM Sampada said:
अप्रतिम लेख! स्मिताच्या मताची सहमत! खूप जोरात ओरडावं वाटलं!
On 8/31/2010 10:51 PM satish shah said:
स्त्री नारी आई माता अनेक स्वरूप घेणारी व्यक्ती सहनशीलता शिकवणारी व्यक्ती बदल सुंदर लेख पुरुष पिता बाप भाऊ कोणत्याही स्वरुपात स्त्री ची बरोबरी करू शकत नाही. मुलीला जे काही आईबाप देतात तिच्यात ती खुश असते
On 8/31/2010 2:30 AM rekha said:
लेख खूप छान आहे.आता माझ्या mulila आणायला कोणी नाही.वाचून डोळ्यात पाणी आले.
On 8/30/2010 8:16 PM Smita Kulkarni said:
तेरा बचपन तो झूठा री ..... खूप मोठ्ठ्यांदा ओरडावेसे वाटले ही ओळ वाचून..खूप चटका लावून गेली हि ओळ..अमीर खुस्त्रोना खरोखर सलाम.. लेख खूप सुरेख लिहिलाय!
On 8/30/2010 12:12 PM vachak said:
खूप अप्रतिम लेख.........
On 8/30/2010 10:07 AM Prajakta said:
खूप चं लेख आहे.माझे आई बाबा नेहमी माझ्या सोबत आहेत. त्यांच्या मर्जी विरुद्ध लग्न केले तरीही ते मला खूप आधार देत आहेत.देवाचे शतश आभार...
On 8/29/2010 5:15 AM priyanakn said:
खूप चं छान लेख आहे. माझ्या घरातही अशीच एक लाडकी आहे जिला तिच्या इच्छे प्रमाणे लग्न करता येत नाही. आणि तिला घरून पळून जाऊन लग्न करायचं नाही . हा लेख माझ्या घरच्यांनी वाचवा. मुख्यता माझ्या बाबांनी. लहान असतांना तिची प्रत्येक इच्छा त्यांनी पूर्ण केली पण तिच्या आयुषातली एवढी मोठी इच्छा त्यांना काबुल नाही.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: