भरकटलेल्या तरुणाईची अचूक "पारख'
श्रीपाद ब्रह्मे
Sunday, August 29, 2010 AT 12:00 AM (IST)
नवा चित्रपट - पारध
काळाबरोबर बदलणाऱ्या माणसांचं, माणसांमधल्या बदलत्या नातेसंबंधांचं आणि काळाच्या थपडा खाऊन खाऊन सर्वार्थानं विलयाला गेलेल्या माणसांचं यथार्थ दर्शन दिग्दर्शक गजेंद्र अहिरे त्यांच्या बहुतेक चित्रपटांमधून घडवीत असतात. "पारध' हा त्यांचा नवा चित्रपट असाच, आधुनिक काळाच्या आवर्तनात गरगरा फिरणाऱ्या, त्या गतीशी जुळवून घेता घेता भोवंडलेल्या ग्रामीण तरुणाईचा, अस्वस्थ करणारा आलेख आहे. घट्ट पटकथा, सुरेख संवाद आणि खिळवून ठेवणारा प्रमुख कलाकारांचा अभिनय यांच्या जोरावर गजेंद्र अहिरेंनी केलेली ही "पारध' प्रेक्षणीय ठरली आहे.
गजेंद्रचा कथानायक यशवंत (सिद्धार्थ) हा या भरकटलेल्या तरुणाईचा प्रतिनिधी आहे. अंबादास (मकरंद अनासपुरे) आणि मारुतीबाबा (विनय आपटे) या स्थानिक राजकारण्यांच्या लढाईत यशवंत अंबादासचा कार्यकर्ता बनून पडेल ते काम करीत राहतो. मात्र, अंबादास आणि त्याचा उजवा हात असलेला बाबा (मिलिंद शिंदे) आपला फक्त वापर करून घेत आहेत, हे त्याच्या लक्षात येत नाही. मोठा भाऊ विठ्ठल (रवी काळे), वहिनी (वृंदा गजेंद्र), बहीण इंदू (हेमांगी कवी-धुमाळ) आणि धाकटा भाऊ आनंद (अमोघ) यांच्या कुटुंबात काहीही कामधंदा नसलेल्या यशवंतला स्वतःचं स्थान निर्माण करायचं असतं. अंबादास सांगेल तसंच सांगणाऱ्या सरळ स्वभावाच्या यशवंतला आपली बहीण बाबाच्या नादी लागल्याचंही लक्षात येत नाही. त्यातच अंबादास पक्ष सोडून गेलेल्या अप्पा या बड्या राजकारण्याविरुद्ध यशवंतचा वापर करून अप्पाची बदनामी करतो. त्यातून अप्पा आणि अंबादासचा समझोता होऊन, यशवंतचा जीव अप्पाला "देऊन टाकण्या'चं अंबादास कबूल करतो. त्यानंतर सुरू होतो तो यशवंतचा जीवघेणा पाठलाग...
साधं शेतकरी कुटुंब असलेल्या या घरात आधुनिक काळाचं प्रतीक असलेले टीव्ही, केबल, मोबाईल हे सगळं असतं. मात्र, स्वयंपाक स्टोव्हवरच होत असतो आणि रॉकेलची भ्रांत असते. आधुनिक काळाचं ग्रामीण जीवनावरचं आक्रमण आणि त्यातून यशवंतसारख्या तरुणांची झालेली बिथरल्यासारखी अवस्था याचं प्रभावी चित्रण दिग्दर्शक अशा अनेक प्रसंगांतून करतो. विठ्ठल आणि त्याची पत्नी यांच्यातला "बटाट्याचा' संवाद; तसंच लॉजवर गेल्यावर बाबा ज्या पद्धतीनं इंदूला वश करतो, तो संवाद किंवा शेवटी यशवंतजवळ प्राणांची भीक मागताना बाबा ज्या असहायतेनं वाट्टेल ते बडबडतो तो संवाद... असे काही संवाद या चित्रपटाची उंची वाढवतात.
आपल्याला नेमकं काय सांगायचंय याचं दिग्दर्शकाचं भान पक्कं आहे. त्यामुळंच त्याची सुरवातीपासूनची या चित्रपटावरची पकड कुठंही ढिली होत नाही. आनंदच्या निवेदनातून हा सारा प्रवास उलगडतो. यशवंतसारख्या ग्रामीण भागातील कित्येक तरुणांची प्रातिनिधिक कथाच आपण पाहतो आहोत, असं वाटत राहतं आणि हेच या चित्रपटाचं मोठं यश ठरलं आहे.
अनुराधा तलाठी निर्मित या चित्रपटाचं आणखी एक मोठं बलस्थान म्हणजे कास्टिंग. अहिरे यांनी मकरंदला प्रथमच खलनायकी छटा असलेली भूमिका दिलीय आणि मकरंद त्या भूमिकेत फिट्ट बसलाय. सर्वांत कौतुक करावंसं वाटतं ते रवी काळे या अभिनेत्याचं. एरवी गुंडाच्या किंवा काहीशा राकट थाटाच्या भूमिकांत आपण त्यांना सदैव पाहतो. मात्र, या चित्रपटात विठ्ठल या माळकरी शेतकऱ्याच्या भूमिकेत त्यांनी आपल्या संयमित अभिनयानं असे काही रंग भरले आहेत, की पाहत राहावं! तीच गोष्ट मिलिंद शिंदेची. त्यानं लॉजवर साकारलेला प्रसंग पाहून तर निळू फुले यांच्या अभिनयाच्या दर्जाशी मिलिंदची तुलना करण्याचा मोह होतो. हा फार ताकदीचा अभिनेता असून, त्याला अजूनही त्याच्या क्षमतेच्या भूमिका मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. सिद्धार्थ जाधव सध्या फॉर्मात आहे. त्याच्या खाती आणखी एक वेगळी, आव्हानात्मक भूमिका जमा झाली आहे. ती त्यानं नेहमीच्याच जोशात केलीय. हेमांगी कवी, वृंदा गजेंद्र, विनय आपटे या कलाकारांनीही त्यांची कामं चांगली वठवली आहेत. राहुल रानडे यांचं संगीत आणि चंद्रशेखर अय्यर यांचं छायालेखन चित्रपटाच्या दर्जात गुणात्मक भर घालणारं.
थोडक्यात, अस्सल ग्रामीण कथाबीजाची, सामाजिक आशयाची आणि राजकारण विषयाची आवड असलेल्यांनी चुकवू नये अशी ही "पारध' आहे.