सत्कृत्याचे फळ!
डॉ. राजकुमार शहा, पुणे.
Monday, August 30, 2010 AT 05:10 PM (IST)
समोर उभ्या असलेल्या गृहस्थांची स्थिती खरोखर केविलवाणी होती. त्यांना मदत करायलाच हवी होती. थोडी खात्री करून घेत मी मदत केली आणि ती घटना विसरून गेलो; पण तीन महिन्यांनी माझ्या नावाने सगळ्या रकमेची मनिऑर्डर आली आणि मला आश्चर्य वाटले...
एक आगळा आणि वेगळा अनुभव सर्वांसमोर मांडत आहे. अर्थात हेतू एकच आहे. आपण सत्कृत्य करत राहावे. फळाची अपेक्षा ठेवू नये.
एका रविवारी सकाळी 10-11 च्या सुमारास गुरुवार पेठेतील जैन मंदिरासमोर उभा होतो. एक मध्यमवयीन गृहस्थ - ज्यांचा चेहरा उतरलेला - प्रवासात असतो तसा पेहराव - माझ्याजवळ आले आणि आर्थिक मदतीची अपेक्षा केली. त्यांची बोलण्याची पद्धत प्रामाणिकपणा - दयेची अपेक्षा नसली, तरी मदतीची इच्छा जरूर कळत होती. माझा काही विश्वास बसे ना. मी सविस्तर चौकशी केली. त्यांच्या सांगण्याप्रमाणे ते त्यांच्या कुटुंबाह सोलापूरहून बडोद्याला जात असताना रेल्वेमधील त्यांचे सर्व सामान - पर्स चोरीला गेले. तिकीटही चोरीला गेल्यामुळे त्यांना पुणे रेल्वे स्थानकात उतरावे लागले. स्थानकावरच त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांना ठेऊन ते मदतीच्या अपेक्षेने गुरुवार पेठ - जैनमंदिर येथे चालत आले होते.
त्यांची पुण्याला कोणाशीही ओळख नव्हती. त्यांनी बऱ्याच लोकांना मदत मागितली, पण... त्याच संदर्भात त्यांची माझी भेट झाली. रविवारी दवाखाना बंद असल्यामुळे आणि मला वेळ असल्यामुळे मी त्यांच्या बरोबर रेल्वे स्थानकावर गेलो. (खरे - खोटे याची शंका आली म्हणून) शहानिशा केली. त्यांच्या पत्नी आणि दोन लहान मुलांना भेटलो. बिचारी केविलवाणी चेहऱ्यांनी वडिलांना बिलगली. सगळे जण उपाशी होते. घटना सत्य होती हे नक्की; मग मी कुठलाही विचार न करता त्यांना मदत करण्यास तयार झालो. प्रथम काही खाण्यासाठी त्यांना पैसे दिले. नंतर त्यांनी सांगितलेल्या कार्यक्रमानुसार चारही जणांचे बडोद्याचे तिकीट काढून दिले आणि वरखर्चासाठी 500 रुपये दिले. ही सर्व रक्कम मी एका अनोळख्या माणसाला कुठलीही अपेक्षा न ठेवता (परत येणार नाही असे समजून) दिली. त्याने माझे व्हिजिटिंग कार्ड मागून घेतले. खूप खूप आभार मानले. मी ही गोष्ट विसरूनही गेलो होतो.
परंतु, तीन महिन्यांनंतर माझ्या नावाने त्या संपूर्ण रकमेची मनीऑर्डर आली आणि मला खरोखर फार आश्चर्य वाटले!
म्हणूनच म्हणावेसे वाटते, सत्कृत्य करत राहा - अपेक्षा ठेऊ नका. फळ मिळेल अथवा मिळणार नाही; पण समाधान मात्र नक्की मिळेल. त्या समाधानाची किंमत कधीही मोजता येणार नाही!