केवढा हा योगायोग
विनायक दाणी, पुणे
Monday, August 30, 2010 AT 05:08 PM (IST)
युरोपातल्या ज्या स्टॉपवर बस थांबली, तो भाग भुरट्या चोऱ्यांसाठी प्रसिद्ध होता. चहाच्या स्टॉलजवळ आलो, तर पाकीट सापडेना. बसमध्ये शोधले, पण काही नाही. पण बसमधून उतरताना पाहिले तर आमचे पाकीट शेवटच्या पायरीवर पडलेले...
काही वर्षांपूर्वीची गोष्ट. आम्ही उभयता एका प्रवासी कंपनीबरोबर युरोप सफरीला गेलो होतो. युरोपमध्ये एकेक देशाला भेट देण्यासाठी एक बस आमच्या दिमतीला होती. पोटातले पाणीही हलणार नाही एवढे सुंदर रस्ते, मैलोनमैल पार करत बस चालायची. तास- दोन तासांच्या अंतराने चहासाठी बस थांबायची. अशीच एके ठिकाणी "टॉयलेट स्टॉप'वर बस थांबली. पाय मोकळे करावेत, जमल्यास चहा घ्यावा म्हणून इतर सहप्रवाशांसोबत आम्हीही बसमधून उतरलो.
हा प्रदेश भुरट्या चोऱ्यांसाठी प्रसिद्ध होता असे आम्हास सांगण्यात आले होते. आम्ही नैसर्गिक विधी आटोपून जवळच्याच स्टॉलपाशी चहासाठी आलो. सहज सौ.नी पर्स तपासून पाहिली, पाकीट पाहिले ते दिसेना. मीही खिसे चाचपून पाहिले; परंतु हाती काहीच लागेना. आमच्या दोघांच्याही काळजाचे ठोके चुकले. पायातले बळ गेले. तरीदेखील धीर धरून पाकिटाची शोधाशोध सुरू केली. बसमध्ये येऊन आमच्या सीटच्या आसपास नीट शोधले, काही दिसेना. निराशेने बसमधून उतरावे म्हणून दारापाशी आलो. पायऱ्या उतरताना शेवटच्या पायरीपाशी पाहतो तो तेथे एक पुडके पडलेले दिसले. आम्ही आशेने ते उचलले, उघडले, पाहतो तर काय? ते आमचेच पाकीट होते. ओव्हरकोटचा बोंगा आणि कपड्यांमधून ते कधी खाली पडले ते कळले नाही.
थांब्यावरची माणसांची वर्दळ, तो पंधरावीस मिनिटांचा अवधी असूनसुद्धा आमचे ते पुडके- पाकीट अन्य कुणाच्या नजरेस पडले नाही हे केवढे आश्चर्य. कुठल्या चोराच्या हाती ते लागले नाही ही केवळ देवाची कृपा. आम्ही देवाचे शतशः आभार मानले. पाकिटातील पासपोर्ट, परकीय चलन, व्हिसा अशा सर्व गोष्टी सुरक्षित होत्या. एवढी ही घटना वगळता आमची ही युरोपची सहल अत्यंत आनंदात व मजेत पार पडली, हे सांगायला नकोच.