काही काळापूर्वी पुण्याच्या पर्वती परिसरातील शिवदर्शन भाग म्हणजे आम्हा नागरिकांना अभिमानाने सांगण्याची गोष्ट होती. परंतु गेल्या काही वर्षांत येथील स्थानिक राजकीय महत्वकांक्षेपोटी या भागाची पूर्ण वाट लागणार असे चित्र दिसून येत आहे. महापालिकेतील सत्तारूढ (?) दोन्ही कॉंग्रेसच्या स्थानिक "नेत्यांमध्ये" प्रचंड वाद असल्यामुळे येथील स्थानिक नागरिक प्रचंड हाल अपेष्टा सहन करीत आहोत.
रस्त्यांची दुर्दशा, बेकायदेशीर बांधकामे, त्यांचा राडारोडा, पूरग्रस्त वसाहत मधील परकीयांची घुसखोरी, तेथील दारू गुत्ते, या बद्दल येथील पोलीस, म न पा क्षेत्रीय कार्यालय, येथे वारंवार लेखी/तोंडी तक्रार करूनही काही उपयोग झालेला नाही. मुग गिळून बसलेले नेते, हतबल नगरसेवक व येथील सोसायट्यांमधील "मला काय त्याचे" प्रवृत्ती चे नागरिक या मुळे येथील गुंड प्रवृत्ती वाढली आहे. येथील मुक्तांगण शाळा, तेथील विद्यार्थी व येथील तरुणांवर काय संस्कार होणार? कोटयवधी खर्चून बांधलेले क्रीडा संकुल गेली आठ वर्ष बंद आहे. फुलपाखरू उद्यान, नाला उद्यान केव्हा चालू होणार, देवीच्या मंदिरासमोरील "वादग्रस्त" जागा आहे तेथे राजरोस पणे झोपड्या, काही उद्योग उभे राहिले आहेत. तेथे पडलेला राडारोडा कधी उचलणार, सध्या पुण्यात स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे; या पार्श्व भूमीवर तरी येथील साफसफाई होणार का? स्थानिक आमदार, येथे राहत नसलेले नगरसेवक लक्ष घालतील का? चौकाचौकात वाढदिवसाचे बॅनर लावणारे सर्वपक्षीय "बॅनर्जी" केव्हा "उतरणार" याची आम्ही आतुरतेने वाट पाहात आहोत.