शुल्कवाढ प्रकरणी महिलांचे 'अशोका'ला साकडे
संतोष धायबर (santosh.dhaybar@esakal.com)
Friday, September 03, 2010 AT 03:09 PM (IST)
पुणे - महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांसाठी शिक्षण सुरू केलेल्या फुले वाड्यात पालक महिलांनी आज (शुक्रवार) "अशोका'च्या झाडाची पूजा करून शुल्कवाढीच्या विरोधात हटके आंदोलन केले. आता तरी सरकारला जाग यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
खासगी विनाअनुदानित शाळांच्या शुल्कनिश्चितीसाठी सरकारने काढलेले तीन आदेश (जीआर) उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. १) रद्द केले. त्यामुळे "जीआर'नुसार सरकारला आता शुल्कवाढीवर नियंत्रण ठेवता येणार नसल्याने पुण्यातील महिलांनी आंदोलन केले. यावेळी पर्वती विधानसभेच्या आमदार माधुरी मिसाळ व पालक महिलांनी अशोकाच्या झाडाला हळदी-कुंकू वाहून पूजा केली. यावेळी शुल्कवाढीच्या विरोधात महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री अशोक चव्हाण आता तरी जागे व्हा, "अशोका'च्या झाडाप्रमाणे स्वतः वाढू नका, तर वडाच्या झाडाप्रमाणे वाढून इतरांनाही सामावून घ्या, अशी मागणी करण्यात आली. "अशोका'च्या झाडाची प्रतिकात्मक पूजा करून सरकारला साकडे घालण्यात आल्याचे, पूजा कदम व दीपाली माने यांनी सांगितले.
यावेळी मिसाळ म्हणाल्या, विनाअनुदानित शाळांना सरकार पाठीशी घालत असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या पावसाळी अधिवेशनात शिक्षणविषयक कायदा होण्यासाठी आम्ही विषय उपस्थित केला होता, येत्या अधिवेशनातही आवाज उठविणार आहोत. तमिळनाडू, गुजरात सरकार पालकांच्या बाजूने आहे, तर महाराष्ट्र सरकार विनाअनुदानित शाळांच्या बाजूने आहे. एका बाजूने शिक्षणाविषयी सरकारला किती काळजी आहे, हे दाखवायचे तर दुसऱ्या बाजूने विनाअनुदानित शाळांना पाठीशी घालायचे, अशी सरकारची भूमिका आहे. शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांना या विषयात लक्ष घालायला वेळ नाही, तर मुख्यमंत्र्यांना शिक्षण हा विषय दुय्यम वाटत असल्याचा आरोप त्यांनी केला.
रोझरी पालक संघटनेचे अध्यक्ष अजय साठे म्हणाले, तमिळनाडू सरकारप्रमाणे महाराष्ट्रात शिक्षणाविषयी कायदा पाहिजे. असा कायदा असता तर निकाल शाळांच्या बाजूने लागला नसता. महाराष्ट्र सरकारचा निषेध करून येत्या पावसाळी अधिवेशनात चलो नागपूर असा मोर्चा काढणार आहोत. शिक्षणमंत्री पुण्यात असताना पालक संघटना त्यांना घेराव घालणार आहे.
यावेळी पुण्यातील विविध शाळांचे पालक उपस्थित होते.