Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

अन्नयोग : आमटी
डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, September 03, 2010 AT 12:00 AM (IST)

अळवाची आमटी वात, तसेच कफदोषाचे शमन करते, अग्नीला प्रदीप्त करते व पाचक असते. पंचामृत अतिशय रुचकर, भूक वाढविणारे असते, सर्दी, खोकला, दमा वगैरे कफदोषामुळे झालेल्या रोगात अतिशय हितकर असते.

वरण चविष्ट असले तरी त्यात फारसे मसाल्याचे पदार्थ नसतात. हिंग, तूप, मीठ व हळद अशा मोजक्‍या गोष्टी वरणात असतात, मात्र आमटी त्यापेक्षा निराळी असते. सध्या ज्याला सांबार म्हटले जाते, त्याला जवळच्या दोन पाककृती आपण पाहणार आहोत.

ग्रन्थयोलूकपर्णानां साङ्‌कुराश्‍च कलायकाः ।नारिकेलस्य खण्डानि चार्द्रा निष्पावदालिका ।।
समभागमितं ग्राह्यं पाच्ये लवणयुक्‍तिदम्‌ ।पश्‍चात्‌ इच्छामितं देयं जलं साम्लं विपाचयेत्‌ ।।
पश्‍चात्तु नारिकेलस्य रसं च सजलं तथा ।सौरभं चाणके पिष्टं तन्दुलानां तु चाल्पकम्‌ ।।
घोलयित्वा च पूर्वोक्‍ते निक्षिप्य विनिपाचयेत्‌ ।दर्व्या विचाल्य बहुशो द्रवं लेहो यथा भवेत्‌ ।।
उत्तार्य नारिकेलस्य स्वरसं च प्रदापयेत्‌ ।प्रदीप्तं तिलतैलं च हिसर्षपसंयुतम्‌ ।।...निघण्टु रत्नाकर

अळवाच्या पानांच्या गाठी, मोड आलेले वाटाणे, नारळाचे तुकडे, डाळ हे सर्व मीठ घालून शिजवावे. फार आंबट होणार नाही अशा बेताने चिंच कोळून पाणी काढावे व आटू द्यावे. नंतर नारळाचा रस, गरम मसाला, चण्याचे पीठ व थोडेसे तांदळाचे पीठ एकत्र कालवून त्याला कढवावे. सर्व व्यवस्थित शिजले, की त्यात पुन्हा नारळाचे दूध घालावे आणि तेलासह हिंग-मोहरीची फोडणी द्यावी. हे सांबार / आमटी अतिशय रुचकर असते, वात तसेच कफदोषाचे शमन करते, अग्नीला प्रदीप्त करते, पाचक असते.

रक्‍तालाब्वास्तु खण्डानि चार्द्राचणकदालिका ।लवणेन युता सम्यक्‌ पाच्या च सजला पुनः ।।
तस्मिन्‌ चिंचोदकं पिष्टं चणकानां च सौरभम्‌ ।गुडं च कटुकं चैव दत्वा दर्व्या विचालयेत्‌ ।।
पाच्यं पश्‍चात्‌ तदुत्तार्य तैलं तप्तं सहिुकम्‌ ।

तांबड्या भोपळ्याचे तुकडे व चण्याची डाळ बेताचे मीठ घालून वेगवेगळे शिजवून घ्यावे. नंतर त्यात चिंचेचा कोळ, थोडेसे चण्याचे पीठ, मसाला, गूळ, तिखट हे सर्व पदार्थ मिसळून शिजवावे, तेल तापवून त्यात हिंग घालून फोडणी द्यावी. हे सांबार / आमटीसुद्धा रुचकर असते, पाचक असते, वात-कफदोषांना शमवते, भूक लागण्यास मदत करते.

पंचामृत चटणी
देवाला प्रसाद म्हणून जे पंचामृत दाखवितात ते गोड असते. तिखट पंचामृताचीही अनेकांना माहिती असेल पण आयुर्वेदातील पंचामृताची पाककृती त्याहूनही वेगळी आहे.
षट्‌कर्षमार्द्रमरिचं किंचित्‌ छिन्नं च कारयेत्‌ ।तैलपक्वं च तत्कार्यं तथा मेध्यर्धटंकिका ।।
निशा शाणमिता चैतदपि तैलं विपाच्य च ।कज्जलेन समं पिष्टं रसो जलयुतस्तथा ।।
अम्लिका हिंगु लवणं सर्वं संमेलयेत्ततः ।तप्ततैले विनिक्षिप्य मन्दं दर्व्या विचालयेत्‌ ।।
किंचित्‌ विपाच्य पश्‍चात्तु नारिकेलरसं पुनः ।दत्वा क्षणेन वोत्तार्यं तत्‌ पंचामृतमुच्यते ।।...निघण्टु रत्नाकर

60 ग्रॅम ओली मिरची घेऊन तिचे तुकडे करावेत. एका नारळाचे दूध काढावे, त्यात आवश्‍यकत तेवढे पाणी मिसळावे, त्यात मिरचीचे तुकडे, चिंच, हिंग, मीठ वगैरे घालावे. तेल तापवून त्यात 5 ग्रॅम मेथ्या व थोडी हळद घालून फोडणी तयार करावी.

फोडणीत वरील पातळ मिश्रण ओतावे. पळीने ढवळून थोडे शिजवावे, वरून नारळाचे दूध घालावे, क्षणभर झाकण ठेवून उतरावे. ह्याला पंचामृत म्हणतात. हे पंचामृत अतिशय रुचकर, भूक वाढविणारे असते, सर्दी, खोकला, दमा वगैरे कफदोषामुळे झालेल्या रोगात अतिशय हितकर असते.
 
- डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405
www.ayu.de 
डॉ. श्री बालाजी तांबे यांचा ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्‍लिक करा... 
(डॉ. श्री. बालाजी तांबे यांचे सुप्रसिद्ध पुस्तक 'आयुर्वेदिय गर्भसंस्कार' आता ऑनलाईन मिळतेय...!)
प्रतिक्रिया
On 25/09/2010 11:43 PM Poonam said:
मिश्र डाळीची आमटी खाणे कितपत योग्य आहे?
On 25-09-2010 06:57 PM archana said:
तुरीच्या डाळीने पित्त वाढत का.
On 16/09/2010 16:55 sasonkar yardena israel said:
माझा आवडीचा पाधार्थ म्हणजे वालाची आमट्टी सफेद भात पापड आणि सोबत लोनचा मिसेस सासोन्कर यार्देना इस्राईल
On 9/9/2010 8:13 PM ashwini said:
मला मुलीची स्मरण शक्ती वाढवण्यासाठी उपाय सांगा. तिचे वय २ वर्ष पूर्ण आहे


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: