एकतर्फी प्रेमातून पिंपरीत तरुणीचा खून
सकाळ वृत्तसेवा
Friday, September 03, 2010 AT 10:41 AM (IST)
पिंपरी - येथील आकुर्डी रेल्वेस्थानकाजवळ एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने आज (शुक्रवार) सकाळी एका तरुणीवर आणि तिच्या मैत्रिणीवर चाकूने हल्ला केला. यात तरुणी जागीच ठार झाली, तर मैत्रीण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोत्स्ना बादल असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. तिची मैत्रिणी आणि रुममेट साधना बोडसे ही गंभीररीत्या जखमी झाली आहे. तर योगेश बच्छाव या तरुणाने त्या दोघींवर हल्ला केला होता. जोत्स्ना ही योगेशची मामेबहिण आहे. ती डीवाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होती. तर योगेश टाटा मोटर्समध्ये कामाला आहे. ते दोघेही मूळचे नाशिक येथील रहिवासी असल्याचे कळते.
जोत्स्ना आणि साधना सकाळी कॉलेजला जात असताना वाल्हेकर वाडीतील गुरुद्वाराजवळ (आकुर्डी रेल्वेस्थानक) योगेशने त्यांच्यावर चाकूने वार केले. यात जोत्स्ना जागीच ठार झाली, तर साधना गंभीर जखमी झाली. त्यानंतर योगेशने त्याच चाकूने स्वतःवर वार केले. त्यात तोही गंभीर जखमी झाला आहे. साधना आणि योगेशला निगडीतील पारस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.