भारतातील परंपरेत पशूंना 'धन' समजले जाते. संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी दूध ही अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट आहे. पण याचा जेव्हा विसर पडतो, तेव्हा नाना तऱ्हेचे रोग उत्पन्न होतात व आरोग्य ढासळायला सुरवात होते. सध्याच्या संगणकाच्या युगात अत्यंत महत्त्वाचे जर काही असेल, तर ते "पशुधन'. सध्या संगणकाच्या एकूणच विस्ताराबरोबर सुवर्णप्रेरित पैसा नामक धनाची प्राप्ती सोपी झाली, अनेक मंडळींच्या हातात खूप पैसा आला. एकूणच मनुष्य पैशाच्या पाठीमागे धावू लागला. सुवर्णाचे आकर्षण कुणाला नसते? पण त्यासाठी पैसा म्हणजेच सुवर्ण हेच जीवनाचे एकमेव ध्येय ठरविल्यास ते मनुष्याच्या विनाशाला कारणीभूत ठरू शकेल. "हात लावीन तेथे सोने होईल' असा वर मिळालेल्या मनुष्याला शेवटी परत परमेश्वराकडे जाऊन मला हा वर नको, माझा वर परत घ्या, मला सोने नको असे म्हणायची पाळी आली, ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत असते. असा वर मिळालेल्या मनुष्याने अन्नाला हात लावल्यावर अन्नाचे रूपांतर सोन्यात झाले, तर सोने खाणार कसे व पचविणार कसे?
भारतातील परंपरेत धन केवल सोन्यात मोजले जात नसे. भारतातील परंपरेत आपली मुले-बाळे, जमीन-जुमला, स्वतःची, समाजाची व देशाची प्रतिष्ठा या धनाबरोबरच पशुधनाला महत्त्व दिलेले दिसते. मुख्य म्हणजे भारतातील परंपरेत पशूंना "धन' समजले जात असे हे लक्षात घ्यायला पाहिजे. ज्यावेळी या पशूंना गौण समजून त्यांना एकूणच दैनंदिन जीवनापासून दूर करून समाजाने केवळ पैशाचा ध्यास घेतला, त्यावेळी रसायनांपासून दूध तयार होऊ लागले. रसायनांपासून बनविलेल्या दुधामुळे व त्यापासून बनविलेल्या दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनामुळे जेव्हा माणसे मरतात, तेव्हा आपल्या पूर्वजांनी पशूंना धन का म्हटले ही गोष्ट लक्षात येते. आशीर्वाद देत असताना धन-धान्य-पशू वगैरे सर्व धनाचा उल्लेख का केला गेला होता हे लक्षात येते.
पशू म्हटल्यावर घराच्या जवळ येऊन राहिलेले कुत्रा, मांजर, गाय, बैल, उंट, हत्ती वगैरे पशू आपल्या नजरेसमोर येतात. सप्तपर्वत असलेल्या भारतासारख्या डोंगराळ देशात आजच्या यंत्रयुगातही शेतीसाठी बैलांचे महत्त्व मोलाचे आहे. त्वचा, केस, दात, मुख्य म्हणजे शरीरातील वीर्यधातू, एकंदरच संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी दूध ही अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट आहे. त्याची उपलब्धता घराजवळ असलेल्या गाय, म्हैस, बकरी यापासूनच होऊ शकते. दूध फार वेळ टिकू शकत नाही, त्याला अधिक काळ टिकविण्याच्या हेतूने त्यावर केलेल्या प्रक्रियांमुळे दुधाचा दूधपणाच संपून गेला आहे. अशा दुधाच्या सेवनाने त्रास होतो असे लक्षात आल्यावर दूध पिणेच बंद झाले. असे दूध पिणे ज्या ज्या देशात बंद केले गेले, तेथे नाना तऱ्हेचे रोग उत्पन्न झाले व आरोग्य ढासळायला सुरुवात झाली. दूध पिणे वाईट नसते, पण ते ताजे व प्रक्रिया न केलेले पाहिजे. तापवल्यावर दूध एक दिवस टिकू शकते. दूध जास्त टिकविण्यासाठी त्याचे दह्यात, लोण्यात वा तुपात रूपांतर केले जाते. पण आहारातून दूध वर्ज्य केले व त्याचबरोबर गाय, बैल, म्हशी, बकऱ्या यांना राहत्या घरापासून खूप दूर पाठविले, ज्या ठिकाणी त्यांना दूध देण्याचे यंत्र समजून, नंतर हे दूध अधिक काळ टिकण्यासाठी त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या गेल्या व असे प्रक्रियायुक्त दूध लोकांना पुरवले गेले जाऊ लागले. गाय म्हणजे दूध देण्याचे एक यंत्र अशी प्रवृत्ती दिसू लागली, अशा वेळी त्यांना पशुधन कसे म्हणावे असे प्रश्न पडला तर नवल नाही.
माणसाची प्रकृती चांगली असली व त्याची इतरांशी मिळून मिसळून राहण्याची प्रवृत्ती जागृत असली, त्याच्यात प्रेमभाग जागृत असला तर त्याच्याकडे इतर कुठलेही धन नसले तरी फार काही बिघडत नाही. म्हणूनच "शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्' असे म्हटलेले आढळते. सर्वात प्रथम पाहिजे ते आरोग्य. माणसाचे हे आरोग्य पशुधनावरच अवलंबून असते हे विसरून चालणार नाही. दैनंदिन जीवनात पशूंना आपल्याबरोबर सन्मानाने ठेवल्यास त्यांचा आपल्याला उपयोग होऊ शकतो, ही कल्पना काळाच्या ओघात मागे पडली. कत्तल करून त्यांचे मांस खाण्यासाठीच पशूंचा उपयोग होतो अशी विचारधारा रुजू लागली. अशा वेळी पशूंवर प्रेम करण्याचा विचारही मनात येणे शक्य नव्हते. कारण ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला मारून आपण खाऊ शकत नाही.
अशा परिस्थितीत पशूंवर प्रेम करावे, त्यांनाही भावना असतात. पशूवरील अत्याचार दूर व्हावेत म्हणूून संस्था स्थापन झाल्या, पण हे सर्व एक ढोंग आहे किंवा कोठल्यातरी एका विशिष्ट फायद्यासाठी रचलेले षड्यंत्र आहे असेच दिसू लागले. घोडे रेसकोर्सवर धावले तर चालते, पण तेच घोडे सर्कसच्या रिंगणात धावले तर त्यांच्यावर अत्याचार होतो अशा कल्पना वर येऊ लागल्या. मानवासाठी पशू कुठल्याही प्रकारे उपयोगाचे नाहीत, पण निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पशूंना वाढू द्यावे अशा तऱ्हेची भ्रामक संकल्पना अस्तित्वात आली. कोल्हे, लांडगे, बिबटे भर वस्तीत येऊन माणसांना त्रास देऊ लागले, तर त्यांचे काय करायचे यावर चर्चा सुरू झाली. कुठल्याही वस्तूचा उपयोग नसेल वा त्यांचा जीवनात सहभाग नसेल तर त्यांना जवळ कोण करणार व त्यांच्यावर प्रेम कसे काय केले जाणार?
म्हणूनच भारतीय परंपरेने पशू हे धन असे समजून पशूंना खूप वरचा दर्जा दिला व त्यांना जीवनात समाविष्ट करून घेतले. पुरुषार्थसाधन करून मनुष्याला जे काही मिळवायचे, त्यात पशुधनाचा उल्लेख केला. इतकेच नाही तर गोदान सर्वात मोठे मानण्यात आले. ज्या परंपरेवर भारतीय संस्कृती उभी राहिली, त्या दिलीपराजाने केलेल्या गो-सेवेच्या कथा महत्त्वाच्या ठरल्या.
गारुड्याने सापाला पकडून आणून नागपंचमीच्या दिवशी लोकांना सापाविषयी माहिती देण्यात, लोकांना साप दाखवायचा आणि सर्प हा प्राणी सुद्धा हाताळता येतो हे दाखविण्यात, त्याच्यातही देवत्व असते, दिसल्याबरोबर त्याला मारू नये असा संदेश लोकांपर्यंत पोचवावा ही याच्यामागची असलेली मूळ संकल्पना. पण यामुळे सर्पांना त्रास होतो व त्यांचा छळ होतो असे मानून अशा प्रथा बंद करण्याच्या मागे लागल्याने साप सुखी झाले आहेत हे कुठल्या विज्ञानाने सिद्ध करता येईल हे कळायला मार्ग नाही. जोपर्यंत प्राण्यांना स्वतःचा अधिकार आहे, त्यांच्यात जोपर्यंत देवत्व आहे, आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून हे प्राणी आपल्याबरोबर असणे ही पृथ्वीची व एकूण मानवजातीची संपत्ती आहे हे पटल्या-पटवल्याशिवाय प्राण्यांवरचे प्रेमही वाढणार नाही व त्यांच्यावरील अत्याचारही कमी होणार नाहीत. जोपर्यंत कोंबडी, बकरी, गाय, डुक्कर वगैरेंना मारून खाण्यावर बंदी नसेल, तोपर्यंत प्राण्यांचा छळ होतो असा कांगावा करून केलेले नाना प्रकारचे कायदे किती ढोंगी असतील हे सहज लक्षात येते.
भारतीय संस्कृतीत पशुधनाला खूप महत्त्व दिलेले आहे. गाय, बकरी, कुत्रा, मांजर वगैरे पाळीव प्राण्यांवर केलेल्या प्रेमाच्या अनेक कथा, त्यांना देवघरापर्यंत दिलेले मानाचे स्थान जर लक्षात घेतले व त्याचबरोबर सध्या जरी रोजच्या स्वारीसाठी हत्ती-घोडे उपयोगात येत नसले तरी वाघ, सिंहांना कुठल्यातरी देवतेचे वाहन म्हणून दिलेला मान लक्षात घेतला तर त्यांच्यावरचे मनुष्यमात्राचे प्रेम लक्षात येते व हे एक नैसर्गिक धन आहे ह्याची जाणीव होईल, प्राणिमात्रांना अभय मिळेल म्हणजेच हे पशुधन सुरक्षित राहील.
बैलपोळ्याच्या निमित्ताने भारतीय संस्कृतीतील पशूंचे महत्त्व उमगले, माणसाचे आणि पृथ्वीचे आरोग्य टिकविण्यासाठी पशूंची असलेली भूमिका लक्षात घेऊन त्यांना प्रेम देण्याचे आश्वासन मिळाले, तर पशुत्वाच्या पलीकडची माणसाची माणुसकी उजळून दिसेल !
- डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलनव्हिलेज,
कार्ला 410 405
www.ayu.de डॉ. श्री बालाजी तांबे यांचा ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा...
(डॉ. श्री. बालाजी तांबे यांचे सुप्रसिद्ध पुस्तक 'आयुर्वेदिय गर्भसंस्कार' आता ऑनलाईन मिळतेय...!)