Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

जागतिक नेमबाजी स्पर्धेसंदर्भात चौकशी करू
सकाळ न्यूज नेटवर्क (snn.nsk@esakal.com)
Friday, September 03, 2010 AT 01:00 AM (IST)
Tags: delhi,   national,   snn,   m s gill,   sports,   shooter
नवी दिल्ली - जागतिक नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाल्याचे कळवून अखेरच्या क्षणी खेळाडूंना स्वतःचा खर्च स्वतःच करा, असे सांगण्याच्या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्‍वासन केंद्रीय क्रीडामंत्री एम. एस. गिल यांनी दिल्याचे खासदार सुमित्रा महाजन यांनी आज सांगितले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची धावपळ सुरू असली तरी ही चौकशी लवकर होऊन या उदयोन्मुख नेमबाजांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेती नेमबाज तेजस्विनी सावंत हिचे लोकसभेने अभिनंदन केले. यानंतर लोकसभेत खासदार महाजन यांनी विक्रांत घैसास व अन्य उदयोन्मुख खेळाडूंवर भारतीय क्रीडा महासंघाकडून झालेल्या अन्यायाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. शून्यकाळात त्यांनी सांगितले की, तेजस्विनीचे यश देदीप्यमान व समस्त भारतीयांसाठी अभिमानास्पद असे आहे. मात्र, त्याच वेळी विक्रांतसह अन्य उदयोन्मुख नेमबाजांवर झालेल्या अन्यायाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण, हेच खेळाडू आपल्या देशाचे भवितव्य आहेत. त्यामुळे क्रीडा मंत्रालयाने त्यांना झालेल्या खर्चाच्या परताव्याची रक्कम देणे अपेक्षित व उचित आहे.

श्रीमती महाजन म्हणाल्या, भारतीय रायफल संघटनेकडून जागतिक स्पर्धेसाठी नावे मागविण्यात आली. त्यातील 50 खेळाडूंची स्पर्धेसाठी निवड झाल्याचे कळविण्यात आले. या खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिरही झाली. मात्र, स्पर्धेला अवघे 15 दिवस बाकी असताना यातील फक्त 15 खेळाडूंचाच खर्च सरकार करणार आहे. उर्वरित खेळाडूंनी स्पर्धेसाठी जायचे असल्यास स्वतःचा खर्च स्वतः करावा, असे सांगण्यात आले. ही काय पद्धत झाली? तुमचे खर्चाचे नियोजन नव्हते, तर खेळाडूंऐवजी काही अधिकाऱ्यांची संख्या कमी करता आली असती. नेमबाजी हा महागडा खेळ आहे. उदयोन्मुख खेळाडूंना सरावासाठी सरकार फारशी मदतही करीत नाही. त्यामुळे गुणवान नेमबाजांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेला पाठविण्याचा खर्च तरी सरकारने उचलणे अपेक्षित आहे. दुसरीकडे, "राष्ट्रकुल'साठी सरकार हजारो कोटींचा खर्च करीत आहे. तेथे 30 ते 35 लाखांचा खर्च करणे सहज शक्‍य होते.

या प्रकाराबाबत आपण श्री. गिल यांना सविस्तर पत्र लिहिले असून, त्यांच्याशी आपली दूरध्वनीवरून चर्चा झाली असल्याचे महाजन यांनी सांगितले. या प्रकाराची चौकशी करून आपण योग्य निर्णय घेऊ. सध्या "राष्ट्रकुल'ची तयारी सुरू आहे. त्यामुळे आपल्याला थोडा वेळ द्या, असे गिल यांनी सांगितल्याची महाजन यांनी माहिती दिली. मात्र, हा विषय आपण सोडून दिलेला नसून क्रीडा मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे महाजन यांनी नमूद केले.
प्रतिक्रिया
On 9/3/2010 7:23 PM vikramsinh-------usa said:
खेळाच्या प्रोछाहानासाठीसरकारने वेगळे मंत्रीव मंत्रालय केले .डिरेक्टर म्हणून आय .ए .एस अधिकारी नेमले परंतु त्याचा फारसा उपयोग झालेला दिसूनयेत नाही . मग एवढा खर्च कश्या साठी ?वेगळी यंत्रणा उभी करून खेळाडूना सोयी पुरविल्या जातील हे पाहावे .


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: