डॉ. श्री बालाजी तांबे
आम्ही व्यवसायानिमित्त आखाती देशात राहतो. "चातुर्मासातील व्रते' हा आपला लेख वाचून मला प्रश्न पडला, की भारतात जेव्हा पावसाळा सुरू असतो तेव्हा येथे उन्हाळा असतो. तरीही चातुर्मासातील नियम तंतोतंत पाळणे योग्य होईल का?... सौ. स्वाती, आखाती देशउत्तर - चातुर्मासातील जीवनशैली, व्रते वगैरे त्या ऋतुनुरूप सुचविलेली आहे आणि त्यामागे आरोग्यरक्षण व अनुशासन हे मुख्य उद्देश आहेत असे दिसते. त्यामुळे आयुर्वेदाने सांगितलेली ऋतुचर्या एकदा समजावून घेतली, की त्यानुसार जगभरात जेथे जेथे जसे ऋतू असतील, त्यानुसार आहार-आचरणात बदल करता येतात. भारतात चातुर्मास चालू असताना तुमच्या देशात उन्हाळा असेल तर तेव्हा चातुर्मासातील नाही, तर उन्हाळ्यातील ऋतुचर्या सांभाळायला हवी. अर्थात आकाशस्थ वातावरण व इतर ग्रहनक्षत्रे ह्यांचा काळ व परिणाम फायदेशीर व्हावा म्हणून काही संस्कार-सूचना असतील तर त्या आचरणात आणण्यास हरकत नाही.
मी 18 वर्षांचा आहे. माझे गुडघे व पाय दुखतात. डॉक्टरांनी संधिवात असल्याचे सांगितले आहे. कृपया उपाय सुचवावा...श्री. केवल पाटील
उत्तर - संधिवात या नावातच वात असल्याने वातशामक औषधोपचारांची आवश्यकता आहे. गुडघे व पायाचे सांधे दुखत आहेत, त्यावर "शांति तेल' नियमित तेल लावण्याचा उपयोग होईल. हे तेल वातशामक औषधांचा संस्कार केलेले आहे व हलक्या हाताने लावले तरी आतपर्यंत जिरणारे आहे याची खात्री असू द्यावी. बरोबरीने सिंहनाद गुग्गुळ, वातबल गोळ्या, "प्रशांत चूर्ण' यासारखी वातशामक औषधे घेण्याचा आणि घरी बनविलेल्या चार - पाच चमचे साजूक तुपाचा आहारात समावेश करण्याचा उपयोग होईल.
वाताचे विकार उतारवयात होणे काही प्रमाणात स्वाभाविक असते, आपल्या बाबतीत इतक्या कमी वयात सांधे दुखण्याचे कारण शोधण्याचाही खूप आवश्यकता आहे. त्या दृष्टीने तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घ्यावा व आहार-आचरणात आवश्यक ते बदल करावेत.
- डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलनव्हिलेज,
कार्ला 410 405
www.ayu.de डॉ. श्री बालाजी तांबे यांचा ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा...
(डॉ. श्री. बालाजी तांबे यांचे सुप्रसिद्ध पुस्तक 'आयुर्वेदिय गर्भसंस्कार' आता ऑनलाईन मिळतेय...!)