नवी दिल्ली - माझ्या २१ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कारकिर्दीत मी कधीही कोणत्याही सटोडियाने (बुकी) भारतीय खेळाडूंशी संपर्क साधल्याचे ऐकलेले नाही, असे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटले आहे.
पाकिस्तानच्या खेळाडूंवर झालेला स्पॉट फिक्सिंगचा आरोपांमुळे क्रिकेटविश्व अडचणीत आले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने याची सखोल चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्याने शुक्रवारी केली.
पाकिस्तानच्या सलमान बट्ट, महंमद आसिफ आणि महंमद आमिर या तीन खेळाडूंवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप करण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना तेंडुलकरने आपले मत मांडले. या तिन्ही खेळाडूंवर करण्यात आलेले आरोप खरे असल्यास त्यामुळे क्रिकेटविश्वाची मोठी बदनामी होणार असल्याचे त्याने सांगितले.