धाप लागणे...
डॉ. ह. वि. सरदेसाई
प्रकृती स्वास्थ्य ढळल्यावर धाप लागण्याची बरीच कारणे असू शकतात. धाप लागत असणाऱ्या व्यक्तीमधील धाप लागण्याची कारण शोधून त्यावर कारणपरत्वे उपचार करणे आवश्यक असते. श्वसनाचे अवयव आणि श्वसनाचा ताबा ठेवणारी केंद्रे यांपैकी नेमक्या कोणत्या जागी व कोणत्या प्रकारचा दोष निर्माण झाला आहे, हे जाणणे नितांत महत्त्वाचे असते.
दम लागणे, धाप लागणे, श्वास जलद होणे या स्थितीत श्वास घेण्याकरिता कष्ट पडत असल्याची जाणीव रुग्णाला होत असते. ही भावना नकारात्मक असते. नकोशी वाटत असते. चांगल्या प्रकृतीतदेखील खूप श्रम केले किंवा खूप उंच ठिकाणी (विरळ हवेत) आपल्याला धाप लागते. प्रकृती स्वास्थ्य ढळल्यावर धाप लागण्याची बरीच कारणे असू शकतात. धाप लागत असणाऱ्या व्यक्तीमधील धाप लागण्याची कारण शोधून त्यावर कारणपरत्वे उपचार करणे आवश्यक असते. श्वसनाचे अवयव आणि श्वसनाचा ताबा ठेवणारी केंद्रे यापैकी नेमक्या कोणत्या जागी व कोणत्या प्रकारचा दोष निर्माण झाला आहे, हे जाणणे नितांत महत्त्वाचे असते. नाक, नाकाच्या बाजूच्या "सायनस'च्या पोकळ्या, दमा, श्वासनलिका, फुफ्फुसे, छातीचा पिंजरा, पोट आणि छाती यातील पडदा व श्वसनाला मदत करणारे इतर स्नायू हे श्वसनाचे अवयव असतात.
श्वसनाचा मुख्य ताबा मेंदूतील मेड्युला ऍबलॉंगेटा या भागातील काही केंद्रात असतो. तेथून व मज्जारज्जूतून विविध चेतातंतूंच्या शिरा छातीच्या पिंजऱ्यातील स्नायू व छाती आणि पोट यामधील पडद्याकडे जातात. श्वसनाची केंद्रे काही रासायनिक आणि काही विद्युत उद्दिपकांनी उद्दिपीत होतात व काहींनी अकार्यक्षम होतात. केंद्रे उद्दिपीत झाली की श्वसन जलद आणि खोल (दीर्घ) व्हावे या दृष्टीने श्वसनाचे अवयव कार्य करू लागतात. रक्तातील प्राणवायू, कार्बनडाय ऑक्साईड, आम्लता आणि काही औषधी रेणू या यंत्रणेत महत्त्वाचे कार्य करतात. त्याचप्रमाणे फुफ्फुसाच्या कोशांच्या अहस्तरीय स्वीकारक मेंदूकडे ज्या संवेदना पाठवितात, त्याही महत्त्वाचे कार्य बजावीत असतात. या विविध भागांतील कार्यापुढे फुफ्फुसाचे कार्य शरीराच्या गरजेनुसार होत राहते. त्वचेचे तापमानदेखील श्वसनाची गती ठरविण्यात भाग घेते. ताप आला, शरीर गरम झाले की श्वसनाची गती वाढते. मानवी मेंदूचा एक भाग भावना व विचार यांच्याशी संबंधित असतो. या भागाचासुद्धा श्वसनाच्या गती व खेळी ठरविण्यात सहभाग असतो. काही प्रमाणात श्वसन ऐच्छिक असते. आपल्या भावनांचा आपल्या श्वसनावर मोठा परिणाम होतो.
उपनिर्दिष्ट फुफ्फुसातील स्वीकारकांचे उद्दीपन प्रत्येक श्वासानिशी श्वास घेतलेल्या स्थितीत व श्वास सोडलेल्या स्थितीत होत राहते. फुफ्फुसाच्या अनेक विकारांत या स्वीकारांवर दाब येतो. त्यापुढे श्वसन सुरू झाल्या झाल्या मेंदूकडे जाणाऱ्या संवेदना तीव्र होतात व श्वास घेण्याची क्रिया थांबविली जाते. उलटपक्षी श्वास सोडतानादेखील या स्वीकारकांकडून मेंदूकडे चेतना गेल्यामुळे उच्छ्वासदेखील लगेच थांबतो. परिणामी, श्वसन जलद होऊ लागते. रक्तातील प्राणवायू कमी पडणे, हे श्वास जलद होण्याचे कारण सहसा नसते; उलटपक्षी रक्तातील कार्बनडाय ऑक्साइडचं प्रमाण वाढणं हे श्वसन जलद होण्याचे महत्त्वाचे कारण असते. याचा संबंध रक्तातील एच आयन्च्या प्रमाणाशी असतो. हालचाल करताना, व्यायाम करताना, धावताना, चल पद्धतीचे व्यायाम करताना शरीरातून हृदयाकडे रक्त जाऊ लागते. परिणामी फुफ्फुसातील नीला व केंद्रवाहिन्या यांतील दाब वाढतो. या दाबाचा परिणाम फुफ्फुसाच्या कोशांतील स्वीकारकांवर होतो. या स्वीकारकांकडून मेंदूकडे जाणाऱ्या सूचनांमुळे श्वसन जलद होते. शांत स्थितीत शरीराकडून हृदयाकडे जाणारा रक्ताचा प्रवाह संथावतो; त्यामुळे स्वीकारकांवरील दबाव कमी होतो, श्वसन संथावते.
दम लागण्याची अनेक कारणे असू शकतात. प्रत्येक खेपेस रक्तातील प्राणवायूची कमतरता हे कारण नसते. किंबहुना रक्तात प्राणवायू कमी झाल्याने मेंदूतील श्वसनावर ताबा ठेवणाऱ्या केंद्रालादेखील प्राणवायू मिळत नाही. परिणामी हे सर्व केंद्र अकार्यक्षम बनते. रक्तात कार्बनडाय ऑक्साइर्डचे प्रमाण जास्त झाल्याने हे केंद्र उद्दिपीत होते व श्वसन जोरात व जलद होऊ लागते. समुद्रसपाटीपासून बऱ्याच उंच ठिकाणी हवा विरळ असते. तेथे मात्र प्राणवायूचे कमी पडणे हा श्वसनाची गती वाढविण्याचा महत्त्वाचा उत्तेजक ठरतो. बहुतेक वेळा फुफ्फुसातील स्वीकारकांवरील दाबामुळे कार्यान्वित झालेली "हिअरिंग ब्राऊर' प्रतिक्षिप्त क्रिया महत्त्वाची असते. फुफ्फुसाच्या बाहेर उतींचा अभाव असतो, त्याला प्लूरल कॅव्हिटी म्हणतात. त्यात पाणी, रक्त, पू किंवा हवा साचल्यास फुफ्फुसावर दाब येतो. रुग्णाला धाप लागते. ही धाप प्राणवायू देण्याने थांबत नाही. परंतु, पाणी काढून टाकण्याने (दाब कमी करण्यात) लगेच थांबते. जेव्हा फुफ्फुसाच्या कार्यात मोठा अडथळा येतो, तेव्हा रक्तातील रिड्युस्ड् हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. जेव्हा हे प्रमाण प्रतिडेसिलिटर रक्तात 5 ग्रॅमपेक्षा जास्त असते, तेव्हा रुग्णाची नखे, ओठ व डोळ्यांवरील स्पेशल त्वचेचे आवरण निळसर होते. या वेळी प्राणवायू दिला जातो. परंतु, असे निळे होण्याचे कारण दुरुस्त करणे अधिक तातडीचे असते. कधी तर फुफ्फुसाचा आजार वाढल्याने हा निळसरपणा जातो.
तेव्हा निळसरपणा जाणे म्हणजे रोग जाणे, असा अर्थ चुकीचा निघण्याचा संभव आहे. श्वासनलिका अरुंद झाल्या की श्वासोच्छ्वासाला अडथळा येऊ लागतो व रुग्णाला धाप लागू लागते. दम्याचा झटका येतो, तेव्हा असे होते. इतरही कारणांमुळे श्वासनलिका अरुंद होऊ शकतात. नेहमीच्या श्वसनात श्वास घेताना श्वासनलिका रुंदावतात व उच्छ्वास (श्वास बाहेर टाकताना) करताना श्वासवाहिन्या अरुंद होतात. त्या आजाराने अरुंद झालेल्या असल्यास उच्छ्वासाच्या वेळेस अधिकच अरुंद होतात. या अरुंद नलिकांमधून हवा बाहेर पडताना सूं-सूं असा आवाज येऊ लागतो. दीर्घकालीन श्वासनलिकांच्या अरुंद पडणाऱ्या आजारात ही स्थिती बहुतेक सर्व काळ आढळते.
अशा व्यक्तीला बसलेले असताना धाप जाणवत नाही. थोडे जरी चालले तरी त्याला दम लागतो. ही स्थिती एम्फिसीमा या आजारात होते. धूम्रपान हे या विकाराचे सर्वांत महत्त्वाचे कारण असते. रक्तक्षय झाल्याने रक्तवाहिन्यांतील आकार फुगतो. अशा वेळीदेखील अल्पशा शारीरिक कामांनी धाप लागू लागते. थायरॉईड ग्रंथीचे कार्य वाढले की नाडीची गती जलद होते. रक्तवाहिन्यांच्या आतील स्वीकारकांना चेतावनी मिळते. या चेतावनीमुळे श्वसन जलद होते. थोड्या श्रमांनी धाप लागू लागते. हृदयविकाराच्या काही प्रकारांत हृदयाकडून शरीराकडे रक्त पोचविण्याचे कार्य संथावते. रक्त फुफ्फुसात व मोठ्या नीलांत साचू लागते.
अल्प श्रमांनी या रक्ताच्या आकारात वाढ होते. ज्या श्रमांनी नेहमी धाप लागत नाही, त्यांनी आता धाप लागते. हृदयविकाराच्या दुसऱ्या प्रकारात रात्रीच्या पहिल्या भागात रुग्ण झोपेतून जागा होतो व रुग्णाला आडवे झोपता येत नाही. रुग्ण उठून बसतो किंवा खिडकीपाशी जाऊन कठड्याला धरून उभा राहतो. याला ऑर्थोप्लिया म्हणतात. डाव्या बाजूच्या हृदयाच्या अकार्यक्षमतेतून असे घडते. हृदयविकाराच्या झटक्याचे हे एक प्रमुख लक्षण असू शकते. फुफ्फुसाच्या कर्करोगाची सुरवात फुफ्फुसातील श्वासनलिकांच्या आकुंचनाच्या झटक्याने होऊ शकते. रुग्णाला दम्याचा झटका आला आहे असे वाटण्याची शक्यता असते.
दमा हा विकार लहान वयात सुरू होतो. एखाद्या मोठ्या व्यक्तीला आयुष्यात पन्नाशीनंतर प्रथमच दम्याचा झटका आल्यास तो हृदयाचा (कार्डियाक उरीवळरल) किंवा कर्करोगाचा आविष्कार तर नाही ना हे पाहणे आवश्यक असते. मूत्रपिंडे अकार्यक्षम झाल्याने रक्तातील आम्लता वाढू लागते. याने धाप लागू लागते. काही आंतड्यांतील जंतांमुळे ऍलर्जी येते, यामुळे रक्तातील इओझिनोफिल पेशींचे प्रमाण वाढते. या व्यक्तींना दम्यासारखे झटके येऊ लागतात. श्वासनलिकेचा दाह अनेक कारणांनी होऊ शकतो. वातावरणातील प्रदूषण, विषाणू, जिवाणू, धूर, धूळ यांनी झालेल्या दाहामुळे श्वासनलिका चटकन आकुंचित होतात. घरात साचलेल्या धुळीत काही कीटक (Dust mites) असतात. ऍलर्जी हे दीर्घकाळ होत राहणाऱ्या सर्दीचे व दम्याचे एक प्रमुख कारण असते. दम लागणे हा विकार नाही, हे कोणत्या तरी विकाराचे लक्षण आहे. विकार शोधून त्यावर उपचार होणे आवश्यक असते.